अकेरलॉफ, जॉर्ज ऑर्थर (Akerlof, George Arthur) : (१७ जून १९४०). सुप्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ व अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराचा सहमानकरी. प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ ॲन्ड्र्यू मायकेल स्पेन्स (Andrew Michael Spence)जोसेफ यूजेन स्टिग्लिट्झ (Joseph Eugene Stiglitz) यांच्या बरोबरीने २००१ मध्ये अर्थशास्त्राचा नोबेल स्मृती पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांचा जन्म अमेरिकेतील कनेक्टिकट प्रांतातील न्यू हेवन या शहरात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रोझेली ग्रबर व आईचे गोस्टा अकेरलॉफ होते.

अकेरलॉफ यांनी १९६२ मध्ये येल विद्यापीठातून बी. ए.ची पदवी प्राप्त केल्यानंतर १९६६ मध्ये मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (M. I. T.) येथून अर्थशास्त्र विषयातील पीएच. डी. मिळविली. पीएच. डी. संशोधनादरम्यान त्यांनी केन्सियन स्थूल अर्थशास्त्रात सखोल असे संशोधन केले. डॉक्टरेटनंतर त्यांची कॅलिफोर्निया विद्यापीठ, बर्कलीमध्ये सहायक प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. अकेरलॉफ यांनी १९६७-६८ मध्ये नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनकार्य केले. शेजारच्या धरणातील पाण्याचे वितरण दिल्ली शहरात समपद्धतीने कसे करता येईल, याचा आराखडा त्यांनी विकसित केला. त्याचबरोबर मागणी-पुरवठा यांतील तफावत व बेरोजगारी यासंदर्भातही संशोधन केले. १९६९ मध्ये ते अमेरिकेला परतले व १९६९ – १९७७ या काळात बर्कली विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात अध्यापन केले. १९७७ मध्ये त्यांची वॉशिंग्टन डीसी येथे फेडरल रिझर्व्ह बोर्डावर नेमणूक झाली. नंतर काही काळ लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे त्यांनी प्राध्यापकी केल्यानंतर १९८० मध्ये पुन्हा बर्कली विद्यापीठात परतले. तेथे १९८० – १९९४ या काळात त्यांनी अध्यापन व संशोधन केले. १९९४ मध्ये त्यांची वॉशिंग्टन डीसी येथे फेडरल रिझर्व्हच्या बोर्ड ऑफ गव्हर्नरवर संचालक म्हणून नियुक्ती झाल्याने आपली अर्थतज्ञ पत्नी व २०१३ मध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या जेनेट येलेन हिच्यासोबत तिकडे प्रयाण केले. १९९९ मध्ये पुन्हा दोघेही बर्कली विद्यापीठात परतले. तेव्हापासून ते अर्थशास्त्राचे कोशलँड मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

अकेरलॉफ यांनी वस्तूंच्या गुणवत्तेविषयी विक्रेत्याला खरेदीदाराच्या तुलनेत अधिक माहिती असते, अशा भिन्न बाजारपेठांचा अभ्यास केला. माहितीच्या अभावामुळे बाजारपेठांच्या कामकाजावर विपरीत परिणाम होतो व त्याचे प्रतिकूल परिणाम संभवतात, हे अभ्यासाने त्यांनी सिद्ध केले. वरील परिस्थितीत ग्राहकांकडून चूकीच्या वस्तूंची खरेदी होऊ नये यासाठी हितसंबंधी अर्थसंस्था अगर मध्यस्थ कार्यरत होऊन ग्राहकांचा आत्मविश्वास वाढावा, यासाठी वस्तू/सेवांच्या-गुणवत्तेबाबत हमी देतात. अविकसित देशात कर्जदारांच्या बाजारातील पतीसंदर्भात अपुरी माहिती असल्याने वित्तीय संस्था वा ऋणदाते चढ्या दराने व्याजाची आकारणी करतात, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले. समाजातील गुन्हेगारी, भेदाभेद, कौटुंबिक समस्या, वित्तीय बाजारपेठा, स्थूल अर्थशास्त्र, चलनविषयक धोरण, दारिद्र्य व बेरोजगारी असे अनेक विषय त्यांनी अभ्यासले. १९७० मध्ये जर्नल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये  प्रसिद्ध झालेल्या ‘दि मार्केट फॉर लेमन्स’ या शोधनिबंधामुळे त्यांना विशेष प्रसिद्धी मिळून ते नोबेल स्मृती पारितोषिकाचे मानकरी ठरले. २००२ मध्ये उपरोक्त जर्नलमध्ये लिहिलेल्या दुसऱ्या एका लेखात लोकांच्या वस्तू व सेवांच्या निवडी केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक व मानसशास्त्रीय घटकांवरही अवलंबून असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. अमेरिकेत गर्भपाताला वैध ठरविण्यात आल्यानंतर १९९० च्या सुमारास अकेरलॉफ यांनी ‘रिप्रॉडक्टिव टेक्नॉलॉजी शॉक’ असा एक लेख लिहून कुटुंबनियोजनाची साधने व लैंगिक क्रांतीमुळे विवाहबाह्य संबंधांचे प्रमाण कसे वाढीला लागते व ते कसे अहितकारक आहे यांबद्दलही भाष्य केले. १९९३ मध्ये नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ पॉल मिशेल रोमर (Pol Michael Romer) यांच्या सहकार्याने लिहिलेला ‘लूटिंग : दि इकॉनॉमिक अंडरवर्ल्ड ऑफ बँकरप्सी फॉर प्रॉफिट’ या लेखात विशिष्ट परिस्थितीत मालक आपली कंपनी वाढविण्यापेक्षा ती दिवाळखोरीत ढकलून व्यक्तिगत फायद्यासाठी दिवसाढवळ्या दरोडे घालतात, त्यासाठी हिशेबात घोळ करणे, नियमांचे उल्लंघन करणे, कर्जाची परतफेड न करणे या गोष्टींचा आधार घेतला जातो. विशेषत: ज्या कंपन्यांना कर्जासाठी शासन हमी देते त्यांच्याबाबतीत हे प्रमाण अधिक असते, हे त्यांना सप्रमाण दाखवून दिले.

अकेरलॉफ यांनी विपुल लेखन केलेले असून त्यात साठ संशोधनपर लेख, तेरा शोधनिबंध तसेच पुढील ग्रंथांचा समावेश आहे : ॲन इकॉनॉमिक थिअरी बुक ऑफ टेल्स (१९८४), इफिसियन्सी वेज मॉडेल्स ऑफ दि लेबर मार्केट (१९८६-सहलेखन), एक्प्लोरेशन इन प्रॅग्मॅटिक इकॉनॉमिक्स (२००५), ॲनिमल स्पिरिट्स : हाउ ह्यूमन सायकॉलॉजी ड्राइव्हज दि इकॉनॉमी ॲण्ड व्हाय इट मॅटर्स फॉर ग्लोबल कॅपिटॅलिझम (२००९-सहलेखन), आयडेंटिटीज इकॉनॉमिक्स-हाउ ॲडोंटिटिज शेप अवर वर्क, वेजेस ॲण्ड वेलबिइंग (२०१०-सहलेखन), फिशिंग फॉर फूल्स : दि इकॉनॉमिक्स ऑफ मॅनिप्युलेशन (२०१५).

समीक्षक – संतोष दास्ताने

प्रतिक्रिया व्यक्त करा