प्राचीन उंच पठारी किंवा पर्वतीय प्रदेशाचे विदारण आणि झीज (क्षरण/अपक्षरण) होऊन तयार झालेल्या किंवा उर्वरित (शिल्लक राहिलेल्या) पर्वतास ‘अवशिष्ट पर्वत’ असे म्हणतात. याला अवशेष पर्वत असेही म्हणतात.
पृथ्वीच्या अंतर्गत शक्तींनी निर्माण होणाऱ्या भूसांरचनिक व ज्वालामुखी या भूहालचालींनी पृथ्वीवर पर्वतांचे वेगवेगळे प्रकार निर्माण होतात. सर्व प्रकारचे पर्वत भूसांरचनिक किंवा ज्वालामुखी प्रक्रियेतून निर्माण झालेले असतात; फक्त अवशिष्ट पर्वतच दीर्घकालीन विदारण किंवा क्षरण क्रियेतून (झीज आणि भर) निर्माण होतात. भूसांरचनिक किंवा ज्वालामुखी प्रक्रियेतून पर्वतांची निर्मिती झाल्यानंतर त्यांवर पृथ्वीवरील बाह्यशक्ती कार्य करतात. या बाह्यशक्तींची निर्मिती वातावरणातून होते. या शक्ती ऊन, वारा, पाऊस, हिम, वाहते पाणी इत्यादी कारकांच्या साहाय्याने भूपृष्ठावर निर्माण झालेल्या पर्वतांच्या आकारात बदल घडवून आणतात. बाह्यशक्तींची ही कारके त्यांच्या अनाच्छादन कार्यामुळे म्हणजेच दीर्घकालीन विदारण आणि क्षरण क्रियेमुळे पर्वत किंवा पठार यातील मृदू खडकांचे थर झिजवतात व कठीण खडकांचे भाग जसेच्या तसे मूळ जागी शिल्लक राहतात. या कठीण खडकांच्या भागापासून अवशिष्ट पर्वतांची निर्मिती होते. पठारावरून किंवा पर्वतीय प्रदेशांतून वाहणाऱ्या नद्यांमुळे तेथील मृदु खडकांची झीज जास्त होते आणि कठिण (प्रतिरोधक) खडक तसेच शिल्लक राहतात. कालांतराने त्या पठारी व पर्वतीय प्रदेशाचे डोंगराळ प्रदेशात रूपांतर होते. नद्या पठारावरून उतारांच्या दिशेने वाहत असताना त्या आपापल्या मार्गांत दऱ्या खोदतात. त्यामुळे दोन दऱ्यांच्या मधला कमी झीज झालेला भाग अवशिष्ट रूपाने उंचावलेला राहून त्यापासून डोंगर, कटक व शिखरे यांची निर्मिती होते.
सामान्यत: या प्रकारे निर्माण झालेल्या वेगवेगळ्या पर्वतांच्या वैशिष्ट्यांमध्ये साम्य आढळते. दीर्घकालीन झीज क्रियेमुळे उर्वरित भूमिस्वरूपांची उंची कमी झालेली असते. टेकड्या गोलाकार किंवा सपाट माथ्याच्या असतात आणि त्यांचा उतार मंद असतो. तरुण पर्वतांच्या तुलनेत अवशिष्ट पर्वतांची उंची कमी असते. अवशिष्ट पर्वतांच्या प्रदेशात बहुतेक पर्वताचे माथे जवळजवळ सारख्याच उंचीचे असतात. भूमिस्वरूपांच्या या वैशिष्ट्यांवरून तेथे दीर्घकालीन विदारण व झीज कार्य घडल्याचे प्रतिबिंबित होते. मूळचा पठारी प्रदेश जितका जास्त उंच आणि क्षरण घडवून आणणारे कारक जितके जास्त प्रभावी असतात, तितके त्या डोंगररांगांचे व दऱ्यांचे स्वरूप अधिक उठावदार दिसते. स्थलीप्राय (मैदानी) प्रदेशात एकाकी उभे राहिलेले प्रतिकारक्षम खडकांचे अवशिष्ट शैलही याच प्रकारचे होत. उर्वरित कठिण खडकांचीही भविष्यात हळूहळू झीज होऊन त्यांची उंची व आकार कमी कमी होत जातो. अवशिष्ट पर्वतावरील वरचा मातीचा थर वारा आणि वाहत्या पाण्यामुळे वाहून गेलेला असतो. त्यामुळे बराचसा भाग खडकाळ व ओसाड दिसतो आणि त्यावर वनस्पती विरळ आढळतात. अवशिष्ट पर्वत मुख्यत्वे ग्रॅनाइट, नीस आणि क्वॉर्ट्झाइट यांसारख्या खडकांचे बनलेले असतात.
ज्या प्रदेशाचा भूसांरचनिक क्रियेचा इतिहास दीर्घकालीन असतो, अशा प्रदेशांत अवशिष्ट पर्वत वैशिष्ट्यपूर्ण रीतीने आढळतात. भारतातील विंध्य पर्वत, सातपुडा, निलगिरी पर्वत, अरवली पर्वत, पूर्व घाट, पश्चिम घाट, पारसनाथ डोंगर (बिहार), राजमहाल टेकड्या, गिरनार डोंगररांग, पूर्व घाटातील नल्लमलई टेकड्या (आंध्र प्रदेश व तेलंगणा), महेंद्रगिरी (ओडिशा), वेलिकोंडा (आंध्र प्रदेश), जावाडी डोंगररांगा (तमिळनाडू) इत्यादी डोंगररांगा हे अवशिष्ट पर्वतांचेच प्रकार आहेत. अरवली पर्वत हा तर जगातील सर्वांत जुन्या पर्वतांपैकी एक आहे. जर्मनीतील ब्लॅक फॉरेस्ट, स्पेनमधील सिएरा नेव्हाडा, संयुक्त संस्थानातील अॅपालॅचिअन पर्वत, मेसास, रशियातील उरल पर्वतश्रेणी, दक्षिण आफ्रिकेतील ड्रेकन्सबर्ग पर्वत ही या प्रकारची उदाहरणे आहेत.
संदर्भ : Lake, Philip, Physical Geography, London, 1959.
समीक्षक : शंकर चौधरी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.