दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकातील मुख्य पर्वतरांग. ड्रेकन्सबर्ग इस्कार्पमेंट किंवा क्वाथलंबा म्हणूनही ती ओळखली जाते. ही पर्वतरांग दक्षिण आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्याशी समांतर, नैर्ऋत्य-ईशान्य या दिशेत पसरली असून तिची लांबी १,१२५ किमी. आहे. पर्वताचा विस्तार दक्षिणेस ईस्टर्न केप प्रांतातील स्टॉर्मबर्ग पर्वतश्रेणीपासून उत्तरेस लिंपोपो प्रांतातील वॉकबर्ग पर्वतश्रेणीपर्यंत झालेला आहे. कड्यांच्या सलग मालिका असलेले ‘ग्रेट इस्कार्पमेंट’ हे दक्षिण आफ्रिकेतील एक वैशिष्ट्यपूर्ण भूमिस्वरूप आहे. या भूमिस्वरूपाचा अर्धवर्तुळाकार विस्तार दक्षिण आफ्रिकेच्या पश्चिम, दक्षिण आणि पूर्व किनार्‍याला समांतर झालेला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या मध्यवर्ती उंच व विस्तृत पठारी प्रदेशाची किनार्‍याकडील कड या इस्कार्पमेंटने सीमित केलेली आहे. परिणामत: दक्षिण आफ्रिकेचा मध्यवर्ती पठारी प्रदेश आणि कमी उंचीचा किनारपट्टीचा प्रदेश हे दोन प्राकृतिक विभाग या इस्कार्पमेंटमुळे अलग झाले आहेत. ड्रेकन्सबर्ग पर्वतरांग म्हणजे या ग्रेट इस्कार्पमेंटचाच विस्तारित भाग आहे. त्यामुळे या पर्वतरांगेमुळेही दक्षिण आफ्रिकेचा मध्यवर्ती पठारी भाग पूर्व किनाऱ्यावरील मैदानी भागापासून अलग झालेला आहे. या पर्वतरांगेला अनुसरून  लेसोथो या देशाची आग्नेय व पूर्व सरहद्द बनली आहे. मालूती (ड्रेकन्सबर्गचा विस्तारित भाग) व तिच्या उपशाखा लेसोथोच्या मध्यभागाकडे पसरल्या आहेत. या पर्वतरांगेची सस. पासून उंची ३,४७५ मी. पेक्षा जास्त असून लेसोथोमधील तबाना एंतलेनयाना (उंची ३,४८२ मी.) हे या रांगेतील सर्वोच्च शिखर आहे. याशिवाय माँटोसूर्स (उंची ३,२९९ मी.), जायन्ट्स कॅसल (उंची ३,३१५), शॅम्पेन कॅसल (उंची ३,३७७), अन्जेसुथी (उंची ३,४०८) ही अन्य शिखरे आहेत. या पर्वतरांगेतील सॅनी ही प्रमुख खिंड आहे.

या पर्वतरांगेची निर्मिती सुमारे १५० द. ल. वर्षांपूर्वी ज्वालामुखी उद्रेकांच्या वेळी, प्रचंड प्रमाणात बाहेर पडलेल्या लाव्हारसाच्या संचयनातून झाली आहे. येथे कठीण अशा बेसाल्ट खडकाचे क्षितीजसमांतर थर आढळतात. विशेषत: लेसोथोच्या पूर्व व दक्षिण भागात वालुकाश्मांच्या पायावर विदारित बेसाल्टचे आच्छादन आढळते. दक्षिण आफ्रिकेतील हा प्रमुख

तूगेला धबधबा

जलोत्सारक असून त्यामुळे अटलांटिक व हिंदी महासागर यांना मिळणाऱ्या अशा दोन नदीप्रणाली निर्माण झाली आहेत. या पर्वतरांगेत कॅलडन, तूगेला, ऑरेंज, ईलान्ट्स इत्यादी नद्या उगम पावल्या आहेत. तुगेला नदी खोल घळईतून वेगाने वाहत असून तिच्या प्रवाहमार्गात प्रपातमालिका निर्माण झाली आहे. ही जलप्रपातमाला तूगेला फॉल्स म्हणून ओळखली जाते. तूगेला धबधब्याची उंची ९४८ मी. असून व्हेनेझुएलातील एंजेल धबधब्याखालोखाल हा जगातील दुसर्‍या क्रमांकाचा  उंच धबधबा आहे.

डच वसाहतकर्‍यांनी पाहिलेल्या येथील पर्वतशिखरांना ‘होम ऑफ ड्रॅगन’ किंवा ‘ड्रॅगन मौंटन’ असे संबोधले. त्यावरूनच या पर्वताला ड्रेकन्सबर्ग हे नाव पडले. दक्षिण आफ्रिकेतील झूलू व सोथो लोक यास क्वाथलंबा असे संबोधतात. या पर्वतरांगेच्या वाळू गुंफात (सँड केव्ह) सॅन, बुशमन जमातींचे लोक राहत होते. त्यांनी येथील गुहांत हजारो वर्षांपूर्वी काढलेली सुंदर चित्रे अजूनही आढळतात. १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेतील क्वाझूलू-नाताळ प्रांतात उखलांबा / ड्रेकन्सबर्ग उद्यानाची स्थापना करण्यात आली. सुमारे २,४२८ चौ. किमी. क्षेत्रांत विस्तारलेल्या या उद्यानाचा यूनेस्कोने २००० मध्ये जागतिक वारसा स्थळांत समावेश केला आहे. लेसोथो या देशातील आणि क्वाझूलू-नाताळ या प्रांताच्या क्षेत्रातील ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेतील शिखरे हिवाळ्यात बर्फाच्छादित असतात. ड्रेकन्सबर्ग पर्वतरांगेतील शिखरे गिर्यारोहकांच्या दृष्टिने आव्हानात्मक आहेत. या पर्वतरांगेतील काही शिखरांवर तेथील अवघड चढणींमुळे गिर्यारोहक अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. या पर्वतश्रेणीत आढळणार्‍या नैसर्गिक स्टेपसारख्या प्रदेशात शेती केली जात नाही किंवा तो विकसित नाही; परंतु तेथे ठिकठिकाणी पर्वतीय रिझॉर्ट व प्रवासी विश्रांतीचे तळ आढळतात.

समीक्षक : अविनाश पंडित; वसंत चौधरी