ज्वालामुखी उद्रेकाच्या माध्यमातून भूगर्भातील शिलारस (मॅग्मा) व इतर लाव्हाजन्य पदार्थांचे भूपृष्ठावर संचयन होऊन जो पर्वत तयार होतो, त्याला ज्वालामुखी पर्वत असे म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील तप्त शिलारस बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायूलोट आणि राखेसदृश्य असे खडकांचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात. शिलारसात विरघळलेल्या वायूंच्या प्रमाणानुसार शिलारसाचा उद्रेक कमीअधिक स्फोटक स्वरूपाचा असतो. मध्यवर्ती निर्गम द्वारातून लाव्हा आणि अग्निदलिक पदार्थ बाहेर फेकले जाऊन त्यांचे आलटून पालटून थर ज्वालामुखी कुंडाभोवती (विवराभोवती) साचू लागतात आणि त्यांपासून शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होतो, त्यालाच ज्वालामुखी पर्वत म्हणतात. लाव्हा व अग्निदलिक पदार्थ साचून या पर्वतांची निर्मिती होत असल्यामुळे त्यांना संचयी पर्वत असेही म्हणतात. उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यांचा जास्तीत जास्त संचय मध्यवर्ती निर्गम द्वाराभोवती होऊन तयार होणाऱ्या पर्वताची शंकूसारखी आकृती अनेकदा सममितीय (एखाद्या अक्षाभोवती सारखे भाग होणारी) असते. जपानमधील फूजियामा हा ज्वालामुखी पर्वत त्याच्या सुबक आकृतीसाठी प्रसिद्ध आहे.

ज्वालामुखी पर्वताचा आकार आणि उंची ही उद्रेकाच्या वेळी बाहेर पडणाऱ्या लाव्हा आणि लाव्हाजन्य पदार्थांच्या स्वरूपावर अवलंबून असते. ज्वालामुखी पर्वत शंकूच्या आकाराचे असतात. शिलारस दोन प्रकारचा असतो; त्यावरून शिला-शंकू पर्वताचे दोन प्रकार पडतात. ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर पडणारे पदार्थ जर जास्त घन व घट्ट असतील, तर ते दूरवर वाहत न जाता त्याचा संचय ज्वालामुखी कुंडाभोवतीच होऊन तेथे अधिक उंचीचा व तीव्र उताराचा लाव्हाशंकू तयार होतो. या प्रकारे तयार होणाऱ्या पर्वतांना ‘अ‍ॅसिड लाव्हा शंकू’ म्हणतात. या प्रकारच्या लाव्ह्यात सिलिकाचे प्रमाण जास्त असल्याने तो अधिक घट्ट असतो; त्यामुळे या प्रकारचे पर्वत जास्त उंच, घुमटाकार व शीघ्र उताराचे असतात. काही वेळेस ज्वालामुखीचा उद्रेक कमी स्फोटक स्वरूपाचा असतो आणि त्याच्या विवरातून प्रामुख्याने प्रवाही अथवा पातळ बेसिक प्रकारचा लाव्हा बाहेर पडतो. बेसिक लाव्ह्यात सिलिकाचे प्रमाण कमी असल्याने तो पातळ असतो. म्हणून त्याच्यापासून निर्माण झालेले पर्वत अधिक विस्ताराचे, कमी उंचीचे व मंद उताराचे असतात. या पर्वतांना ‘बेसिक लाव्हा शंकू’ म्हणतात.

ज्वालामुखीचा उद्रेक जेव्हा अधिक स्फोटक स्वरूपाचा असतो, तेव्हा ज्वालामुखीतून लाव्हारसाबरोबर खडकाचे लहानमोठे तुकडे, राख व इतर पदार्थ वर आकाशात फेकले जातात. त्यांचा नंतर भूपृष्ठावर संचय होऊन त्या संचयनापासून ज्वालामुखी पर्वताची निर्मिती होते. खडकांचे तुकडे व राख यांपासून निर्माण होणाऱ्या अशा ज्वालामुखी शंकूंना ‘अंगारक शंकू’ असे म्हणतात. हवाई बेटावरील ज्वालामुखी क्रिया हे या प्रकारचे उदाहरण आहे. खुद्द हवाई बेटावरील माउनलोआ ज्वालामुखी समुद्रतळापासून सुमारे १०,००० मी. उंच असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची ४,१६९ मी. आहे. त्याच्या घुमटाची लांबी १२० किमी. व रुंदी १०३ किमी. असून त्याच्या ज्वालामुखी महाकुंडाचे क्षेत्र १५ चौ. किमी. आणि खोली १८० मी. आहे. समुद्रसपाटीशी त्याचा घेर १६० किमी. आहे.

कधी कधी ज्वालामुखीच्या उद्रेकाच्या वेळी लाव्हा, तसेच राख व खडकाचे तुकडे एकामागोमाग भूपृष्ठावर येतात. अशा रीतीने जेव्हा या दोन्ही पदार्थांच्या संचयनाने विशिष्ट प्रकारच्या लाव्हा शंकूची निर्मिती होते, तेव्हा त्यांना ‘संमिश्र शंकू’ म्हणून ओळखतात. बहुतेक या पर्वतांच्या शिखरावर म्हणजेच मुखाशी ज्वालामुखी कुंड किंवा विवराची निर्मिती झालेली असते. या प्रकारच्या शंकूची उंची जास्त असते व त्याचा उतार सर्व बाजूंनी सारखा असतो. या पर्वतांची उंची त्यांच्या पायथ्यापासून सुमारे २,४०० मी. पेक्षा जास्त असते. जगातील बरेचसे ज्वालामुखी पर्वत या संमिश्र शंकूंनी बनले आहेत.

जगातील बहुतेक ज्वालामुखी पर्वत पॅसिफिक महासागराच्या किनाऱ्यालगतच्या भागात व महासागरी बेटांच्या प्रदेशात आढळतात. त्यातील बहुतेक ज्वालामुखी जागृत असल्यामुळे या पट्ट्याला ‘पॅसिफिकचे अग्निकंकण’ असे म्हणतात. या पट्ट्यात फूजियामा (जपान), कोटोपाक्सी, चिंबोराझो (एक्वादोर), मौंट शॅस्टा (कॅलिफोर्निया), हूड (ऑरेगन), मौंट सेंट हेलेन्झ आणि मौंट रेनीयर (वॉशिंग्टन), अर्जेंटिनातील ॲकन्काग्वा इत्यादी महत्त्वाच्या ज्वालामुखी पर्वतांचा समावेश होतो. मेक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखी पर्वत अगदी अलीकडचा असून त्याची निर्मिती इ. स. १९४३ ते १९५२ या केवळ ९ वर्षांतील उद्रेकातून झालेली आहे. १९५२ नंतर हा ज्वालामुखी निद्रितावस्थेत गेला आहे. तसेच यूरोप आणि आशिया खंडांच्या मध्यभागातून – भूमध्य समुद्रावरून म्यानमारपर्यंत पसरलेल्या आशियाच्या मध्यभागातील वली पर्वतरांगांना अनुसरून इंडोनेशिया द्वीपसमूहापर्यंत पसरलेल्या पट्ट्यात प्रसिद्ध ज्वालामुखी पर्वत आढळतात. यातील काही ज्वालामुखी अजूनही जागृत आहेत. यात व्हीस्यूव्हिअस, एटना, स्ट्राँबोली (इटली), मौंट पोपा (म्यानमार), क्राकाटाऊ (इंडोनेशिया) इत्यादी ज्वालामुखी पर्वत प्रसिद्ध आहेत. भारतात अंदमान समुद्रात बॅरेन बेटावर बॅरन हा एकमेव जागृत ज्वालामुखी व ज्वालामुखी पर्वत आहे. आफ्रिकेतील टांझानियात किलिमांजारो ज्वालामुखी पर्वत आहे.

संदर्भ : Monkhouse, F. J., Principle of Physical Geography, New York, 1970.

समीक्षक : शंकर चौधरी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.