फेलिक्स, आर्थर : (३ एप्रिल १८८७ – १७ जानेवारी १९५६).
पोलंडचे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ आणि रक्तद्रव्यतज्ञ (सिरॉलॉजीस्ट; serologist). त्यांनी आंत्रज्वर (typhus) आणि रीकेटसिया (Rickettsia) या जंतूंच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी सहकाही एडमंड वेल (Edmund Weil) यांसोबत वेल-फेलिक्स निदान चाचणी विकसित केली.
फेलिक्स यांचा जन्म आंद्रेहुफ (Andrychow) येथे झाला. त्यांचे वडिल थीओडाेर फेलिक्स यांना वस्त्र छपाईची आवड असल्याने त्यांनी आपल्या मुलास वस्त्रोद्योगात वापरल्या जाणाऱ्या रंगांच्या रसायनांचा अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित केले. फेलिक्स यांनी व्हिएन्नामध्ये रसायनशास्त्राचा अभ्यास करून पीएच्.डी. पदवी संपादन केली. वडिलांच्या वस्त्र छपाईच्या कारखान्यात थोडे दिवस काम केल्यानंतर ते सूक्ष्मजीवशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी व्हिएन्नाला परत आले. व्हिएन्नामध्ये विद्यार्थीदशेत त्यांना इस्रायल राष्ट्रनिर्मितीच्या चळवळीची आवड निर्माण झाली आणि त्यानंतर पॅलेस्टाइनमध्ये ते एक पदाधिकारी झाले.
फेलिक्स आणि एडमंड वेल यांनी रीकेटसिया (Rickettsia) या जंतूंच्या प्रादुर्भावाने होणाऱ्या रोगांच्या निदानासाठी वेल-फेलिक्स निदान चाचणी विकसित केली. सूक्ष्मजीवाशास्त्रातील त्यांचे हे संशोधन अतिशय मोलाचे ठरले. पहिल्या महायुद्धानंतर फेलिक्स ब्रिटनला स्थलांतरित झाले आणि तेथील लिस्टर इन्स्टिट्यूटमध्ये संशोधनाचे काम चालू ठेवले. त्यानंतर त्यांनी बिल्स्को, व्हिएन्ना, प्राग आणि लंडन येथील अनेक नामवंत संस्थांमध्ये संशोधनाचे काम केले. १९२७ ते १९४५ च्या दरम्यान ते हादसाह मेडिकल ऑर्गनायझेशनसाठी जेरूसलेम येथे कार्यरत होते. १९४३ मध्ये त्यांची रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवड करण्यात आली होती.
फेलिक्स यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी इंग्लंड येथे निधन झाले.
कळीचे शब्द : #वेल-फेलिक्स निदान चाचणी
संदर्भ :
- Craigie, J.(1957).Arthur Felix 1887-1956.Biographical Memories of Fellows of the Royal Society,3:52-56
- Wilson G.S.(1957).Arthur Felix.3rd April 1887-4th January 1956.The Journal of Pathology and Bacteriology 73:281-295
समीक्षक – रंजन गर्गे