चार्नेस,अब्राहम  (४ सप्टेंबर १९१७ — १९ डिसेंबर १९९२)

अमेरिकन गणितज्ञ आणि संक्रियात्मक अन्वेषणतज्ञ. चार्नेस यांनी बहिर्वक्री बहुपृष्ठकाचे चरम बिंदू आणि एकघाती अनावलंबन, प्रसंभाव्य कार्यक्रमण, खेळ सिद्धांत, अपूर्णांकी कार्यक्रमण, उद्देशीय प्रायोजन या शाखांत काम केले.

चार्नेस यांचा जन्म होपवेल, व्हर्जिनिया येथे झाला. त्यांनी गणितात बी.ए.(१९३८), एम्.एस्. (१९३९) आणि पीएच्.डी.(१९४७) या सर्व पदव्या अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ इलिनॉय अॅट अर्बाना-शाम्पेन येथून मिळविल्या. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील अनेक नामवंत विद्यापीठांत गणित, उपयोजित गणित आणि प्रवर्तन संशोधन या विषयांचे अध्यापन केले. मात्र १९६८ पासून मृत्यूपर्यंत (१९९२) ते अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस अॅट ऑस्टिन येथे युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सस सिस्टिम प्रोफेसर आणि जेस एच्. जोन्स प्रोफेसर ऑफ बायोमॅथॅमेटिक्स अँड मॅनेजमेंट सायन्स असे कार्यरत होते.

प्रवर्तन संशोधन (Operational Research) हा विषयाला अमेरिकेत विकसित करण्यात चार्नेस यांचे योगदान महत्त्वाचे मानले गेले आहे. तसेच गणितीय पद्धतीवर आधारित व्यवस्थापन विज्ञान स्थापण्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. मूलभूत आणि उपयोजित गणित, एकघाती आणि नैकघाती कार्यक्रमण (Linear and Nonlinear Programming) आणि व्यवस्थापन विज्ञानाच्या अनेक शाखांसाठी नवीन पद्धती विकसित करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्यासाठी ऑपरेशनल रिसर्च सोसायटी ऑफ अमेरिका आणि द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या संस्थांचे संयुक्त आणि अतिशय मानाचे असे जॉन फॉन न्यूमान थिअरी पारितोषिक १९८२ मध्ये चार्नेस यांना मिळाले. दुसऱ्या महायुद्धात आणि त्यानंतरही अमेरिकन नौदलासाठी वेळोवेळी केलेल्या गणितीय योगदानासाठी १९७७ सालचे अमेरिकन नौदलाचे नागरिकांसाठी असलेले सर्वोच्च पारितोषिक चार्नेस यांना देण्यात आले. १९६० मध्ये द इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस या संस्थेचे ते अध्यक्ष म्हणूनही निवडले गेले होते.

चार्नेस यांनी बहिर्वक्री बहुपृष्ठकाचे चरम बिंदू (Extreme Point of Convex Polyhedron) आणि एकघाती अनावलंबन (Linear Independence) या घटकांमध्ये प्रस्थापित केलेले गणितीय संबंध हे त्यांचे सुरुवातीचे एक मूलभूत कार्य आहे. याशिवाय प्रसंभाव्य प्रायोजन (Stochastic Programming), व्यापक व्यस्तता(Generalised Inverses) आणि खेळ सिद्धांत (Game Theory) यांमध्ये त्यांनी मोलाची भर घातली. १९६० च्या दशकात अपूर्णांकी प्रायोजन (Fractional Programming) या नावाची नैकघाती कार्यक्रमणाची एक शाखा चार्नेस यांनी डब्ल्यू. डब्ल्यू. कूपर यांच्याबरोबर संशोधन करून स्थापन केली. नैकघाती कार्यक्रमणामुळे व्यवस्थापन, अर्थ आणि वित्तीय क्षेत्रांतील विविध प्रश्न सोडविणे सुलभ झाले.

चार्नेस यांनी उद्देशीय प्रायोजन (Goal Programming) ही आणखीन एक नवी कल्पना कूपर यांच्यासोबत मांडून गणितीय प्रायोजन या एकूण विषयालाच एक वेगळी दिशा दिली. उद्देशीय प्रायोजनाच्या विशिष्ट गणितीय संरचना आणि त्या सोडविण्याच्या पध्दती यांमुळे गणितीय प्रायोजनाच्या चौकटीतील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अवश्य मिळू शकते. ही एक मोठी उपलब्धी आहे. असे उत्तर उपयोजनेसाठी फार महत्त्वाचे असते आणि व्यवस्थापनाला इष्टतम निर्णय घेण्यात अनेक प्रकारे मदत करते.

त्यानंतर चार्नेस यांनी कूपर आणि ई. रोह्ड्स यांच्यासोबत आधारसामग्री परिस्पर्शी विश्लेषण (डीईए) (Data Envelopment Analysis – DEA) हा एक नवीन गणितीय विषय विकसित केला आणि त्याची उपयुक्तता अनेक उपयोजनांमार्फत सिद्ध केली. या विषयातील संकल्पना आणि तंत्र व्यावसायिक तसेच सामाजिक क्षेत्रातील संस्थांचे मूल्यमापन करण्यात फार उपयोगी पडत आहेत. या सगळ्या बाबी विचारात घेऊन द इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ऑपरेशनल रिसर्च सोसायटीच्या हॉल ऑफ फेम या यादीत २००४ मध्ये चार्नेस यांचे नाव सामील करण्यात आले. हा  संक्रियात्मक संशोधन विषयातील सर्वोच्च सन्मान आहे आणि तो २०१५पर्यंत जगातील केवळ २३ व्यक्तींना दिला गेला आहे. डीईए या लक्षणीय गणितीय आणि उपयोजन कार्यांबद्दल २००६ मध्ये त्यांना मानाचे असे आयएनएफओआरएमएस इम्पेक्ट पारितोषिक मरणोत्तर प्रदान केले गेले.

चार्नेस लिखित आणि सहलिखित ४०० पेक्षा अधिक शोधलेख आहेत. त्यांनी कूपर यांच्यासोबत १५० पेक्षा अधिक दर्जेदार शोधलेख प्रसिद्ध केले, जो सहलेखनाचा एक कीर्तिमान उच्चांक मानला जातो. याशिवाय सात पुस्तके त्यांच्या नावावर आहेत. त्यातील मॅनेजमेंट मॉडेल्स अँड इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑफ लिनिअर प्रोग्रॅमिंग (Management Models and Industrial Applications of Linear Programming) हे कूपरसोबत प्रसिद्ध झालेले चार्नेस यांचे पुस्तक फ़ार महत्त्वाचे आहे. प्रवर्तन संशोधन आणि व्यवस्थापन विज्ञान या क्षेत्रांतील चार्नेस यांचे कार्य पथदर्शक भूमिका बजावत आहे.

चार्नेस यांचे निधन टेक्ससमधील ऑस्टिन येथे झाले.

 

संदर्भ:

समीक्षक – अ. पां. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा