वेस्कमन, सेल्मन आब्राहम : (२२ जुलै १८८८ – १६ ऑगस्ट १९७३).

युक्रेनमध्ये जन्मलेले अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ आणि सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ. त्यांनी मातीतील सूक्ष्मजीवांचे विघटन यावर सखोल आणि यशस्वी संशोधन केले, त्यातूनच विविध प्रतिजैविके (Antibiotic) आणि स्ट्रेप्टोमायसीनचा (streptomycin) शोध लागला. क्षयरोगावर (Tuberculosis) परिणामकारक अशा स्ट्रेप्टोमायसीन या पहिल्या प्रतिजैविकाच्या संशोधनाबद्दल १९५२ सालातील शरीरक्रियाविज्ञान वा वैद्यक विषयाचे नोबेल पारितोषिक त्यांना देण्यात आले.

वेस्कमन यांचा जन्म रशियातील प्रिलुका येथे झाला. त्या काळात रशियात ज्यू यांना सरकारी शाळेत शिकता येत नसे. म्हणून घरीच अभ्यास करून वेस्कमन यांनी सरकारी शाळेतून बाहेरून परीक्षा देऊन मॅट्रिक डिप्लोमा घेतला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेत स्थलांतर केले.तिथे रुट्गर्स विद्यापीठात कृषिशास्त्र विषयात बी.एस्सी. (१९१५) आणि एम. एस्सी. (१९१६) या पदव्या घेतल्या. त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएच.डी. मिळवली (१९१८). नंतर ते रुट्गर्स विद्यापीठात व्याख्याते म्हणून रुजू झाले.

वेस्कमन रुट्गर्स येथे विद्यार्थी दशेत असतांनाच त्यांना ॲक्टिनोमायसीटीज (Actinomycete) या जीवाणूंमध्ये रस निर्माण झाला होता. या बाबतचे संशोधन त्यांनी पुढेही चालू ठेवले. मातीमधील जैवरासायनिक प्रक्रियांमध्ये ॲक्टिनोमायसीटीजचे स्थान, वनस्पती-जनावरांचे अवशेष कुजवण्यामध्ये इतर जीवाणूंबरोबर असलेला त्यांचा सहभाग, मातीमध्ये काळा धागायुक्त पदार्थ (Humous) निर्मितीचे कार्य, ॲक्टिनोमायसीटीजचे वर्गीकरण, जीवाणू आणि बुरशी यांच्या वाढीस प्रतिबंध करण्याची त्यांची क्षमता या सर्वांचा अभ्यास त्यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रुट्गर्समध्ये केला. अनेक वर्षं ॲक्टिनोमायसीटीजमध्ये संशोधन केल्यानंतर वेस्कमन यांनी १९२४ मध्ये यूरोपभर अभ्यास दौरा करून तिथल्या विद्यापीठांत आणि प्रयोगशाळांत होणाऱ्या मृदाशास्त्राच्या आणि रसायनशास्त्रातील संशोधनाची माहिती घेतली. या शास्त्रांचा स्वतंत्रपणे अभ्यास करणे उपयोगाचे नाही, त्यांचा एकत्रित अभ्यास केला पाहिजे ही गोष्ट ते या दौऱ्यात शिकले.

वेस्कमन यांनी प्रतिजैविक निर्माण करणाऱ्या जीवाणूंचा शोध घेण्यासाठी पद्धतशीरपणे प्रयोग सुरू केला. या प्रयोगांमध्ये मातीचे अनेक नमुने तपासले. मातीतील जीवाणूमध्ये रोगकारकजंतूंना प्रतिबंधक क्षमता आहे की नाही याचा अभ्यास त्यांनी टप्प्याटप्प्याने केला. या प्रतिबंधक प्रतिजैविकांचा मानवी शरीरावर दुष्परिणाम होणार नाही याची कसून तपासणी केल्यावर त्यांच्या हाती जवळपास वीस प्रतिजैविके लागली. त्यातली काही प्रमुख प्रतिजैविके अशी –ॲक्टिनोमायसीन (Actinomycin), क्लॅव्हासीन (Clavacin), स्ट्रेप्टोथ्रिसीन (Streptothricin), स्ट्रेप्टोमायसीन (Streptomycin), निओमायसीन (Neomycin), कँडिसीडीन (Candicidin) इत्यादी. त्यामध्ये त्यांना स्ट्रेप्टोमायसीन हे प्रमुख प्रतिजैविक सापडले (१९४३). त्या काळात क्षय रोगाने जगभर हाहाकार माजवला होता. त्यावर स्ट्रेप्टोमायसीन हे पहिलेच प्रभावी औषध ठरले.

वेस्कमन यांना नोबेल पारितोषिकासोबतच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आले. रक्कम आणि स्वामित्त्वधनाच्या रकमेचा मोठा भाग त्यांनी फाउंडेशन ऑफ मायक्रोबायॉलॉजी (Foundation  of Microbiology) या संस्थेच्या स्थापनेसाठी दिला. वेस्कमन यांनी लिहिलेल्या अनेक पुस्तकांपैकी प्रिन्सिपल्स ऑफ मायक्रोबायॉलॉजी (Principles of Microbiology; १९२७) आणि आत्मचरित्रपर माय लाइफ विथ मायक्रोब्स (My Life with Microbes; १९५४) हे विषयांवर आधारित दर्जेदार पुस्तके आहेत.

वेस्कमन यांचे अमेरिकेतील मॅसॅचूसेट्समधील हाइअॅनस येथे निधन झाले.

संदर्भ:

  • https://www.nobelprize.org/prizes/medicine/1952/waksman/facts/
  • Introduction to microbiology,2nd edition,J.L.Ingraham,C.A.Ingraham

समीक्षक – रंजन गर्गे

#जीवरसायानाशास्त्रज्ञ, #प्रतिजैविके, #सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, #अॅक्टिनोमायसीन, #क्लेव्हेसीन, #स्ट्रेप्टोव्हायसीन, #स्ट्रेप्टोमायसीन, #निओमायसिन, #केंडीसायडीन, #१९५२ चा नोबेल पुरस्कार, #क्षयरोग.

प्रतिक्रिया व्यक्त करा