पोवार, दत्तोबा संतराम : (? १८९९ – २१ मे १९७२). महाराष्ट्रातील एक थोर सामाजिक कार्यकर्ते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आईचे नाव गंगुबाई. वडील संतराम पोवार हे कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या राजघराण्यात पादत्राणे, घोड्याची खोगिरे, लगाम, चाबूक आदी बनविणे तसेच रथाचे चामडेकाम करीत असत. दत्तोबा दहा-अकरा वर्षांचे असताना संतराम यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर शाहू महाराजांनी गंगुबाई यांना दोन रुपये निवृत्तीवेतन सुरू केले व दत्तोबांची वडिलांच्या जागी कामावर नाममात्र हजेरी लावण्यासाठी ५ रुपये महिना पगार देऊन नेमणूक झाली. त्यांच्या शिक्षणासाठी मिस क्लार्क वसतिगृहात राहण्याची परवानगी मिळाली. दत्तोबांनी १९१८ साली इंग्रजी चौथीची परीक्षा उत्तीर्ण केली. मिस क्लार्क वसतिगृहात त्यांनी प्राथमिक, तर दक्षिण महाराष्ट्र प्रायव्हेट हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
दत्तोबा पोवार हे राजर्षी छ. शाहू महाराजांसोबत मुंबईला गेल्यानंतर शिवतरकर गुरुजी, पी. बाळू, वि. व. केळशीकर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांची पहिली भेट झाली (१९१८). पुढे त्यांनी चांभार-ढोर विद्यार्थी बोर्डिंगची स्थापना केली (१९१९). दत्तोबा पोवार यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घडवून आणली (१७ डिसेंबर १९१९). छ. शाहू महाराजांनी दत्तोबा पोवार यांना वकिलीची सनद दिली (१९२०). ‘मूकनायक’ या बहिष्कृत चळवळीच्या मुखपत्रास दत्तोबा पोवार यांनी सातत्याने ‘लोकमान्य जोडे व पैजरा’ अशी कोल्हापुरी चपलेची जाहिरात देऊन आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न केला. माणगाव येथील दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृत परिषद आयोजनात दत्तोबा पोवार यांचे योगदान महत्त्वाचे आहे. या परिषदेत राजर्षी छ. शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह दत्तोबा पोवार यांचेही भाषण झाले (१९२०). तसेच त्यांनी छ. शाहू महाराजांसोबत नागपूरच्या अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषदेतही सहभाग घेतला (१९२०). अस्पृश्य समाजातून महानगरपालिकेचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना प्राप्त झाला (१९२१-१९२४). तसेच बहिष्कृत हितकारिणी सभेमध्ये पंचमंडळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांची सदस्य म्हणून निवड केली (१९२४). श्री रोहिदास को. ऑप. सोसायटीची त्यांनी स्थापना केली.
दत्तोबा पोवार यांनी ‘आत्मोद्धार’ हे साप्ताहिक सुरू केले (१९२९). त्यांनी गोलमेज परिषदेहून मायदेशी परतलेल्या डॉ. आंबेडकरांचे मुंबईत बोटीवर जाऊन स्वागत केले होते (१९३२). करवीर इलाका पंचायतीच्या शिक्षण मंडळात सदस्य म्हणून त्यांनी काम केले (१९३३), तसेच करवीर इलाका बहिष्कृत परिषदेत त्यांनी सहभाग घेतला. पोवार यांनी चांभार-ढोर मुलांसाठी असलेल्या देवी इंदुमती बोर्डिंगचा पहिला विद्यार्थी महादेव धर्माजी गायकवाड यास वकिलीच्या (बॅरिस्टर) शिक्षणासाठी लंडनला पाठवले.
दत्तोबा पोवार यांनी छ. राजाराम महाराज यांना मानपत्र देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली (१९३८). चांभार समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक परिस्थितीमध्ये बदल व्हावा म्हणून सातत्याने ते कार्यरत राहिले. दत्तोबा पोवार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि चर्मकार समाजातील इतर समाजसुधारक यांचा पत्रव्यवहार चांभार समाज आणि दलित चळवळीच्या इतिहास लेखनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा मानला जातो. यांमधील बरीच पत्रे उपलब्ध आहेत.
दत्तोबा पोवार यांची वेंगुर्ले येथे मामलेदार पदावर नेमणूक झाली (१९४७). पुढे त्यांनी मामलेदार पदाचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षात प्रवेश केला (१९५१). हातकणंगले राखीव मतदार संघातून त्यांनी निवडणूक लढविली. काँग्रेस पक्षाचे कोल्हापुरातील अस्पृश्य समाजाचे पहिले उमेदवार म्हणून ते १९५२ साली निवडून आले. भुसावळ येथील खानदेश चर्मकार परिषदेचे ते अध्यक्ष होते (१९५४). १९५६ साली संयुक्त महाराष्ट्रप्रश्नी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. परंतु तो मान्य झाला नाही. त्यांनी मौजे मुडशिंगी येथे काँग्रेस हरिजन परिषदेचे आयोजन केले. त्यांच्यावर राजर्षी छ. शाहू महाराजांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचे मित्रत्वाचे नाते होते.
कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.
संदर्भ :
- पोवार, सुधीर, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्नेही दत्तोबा पोवार’, विनिमय पब्लिकेशन, मुंबई, २०१७.
- पोळ, गं. य., ‘गंगाधर यशवंत पोळ राहणार कोल्हापूर यांचे आत्मवृत्त उर्फ सचित्र चरित्र’, कोल्हापूर, १९८१.
समीक्षक : प्रशांत गायकवाड
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.