राणी इंदुमती : (६ डिसेंबर १९०६ – ३० नोव्हेंबर १९७१). कोल्हापूर संस्थानातील शैक्षणिक व सामाजिक सुधारणांच्या पुरस्कर्त्या. त्यांचा जन्म सासवड येथे शंकरराव पांडुरंग जगताप व जानकीबाई या दाम्पत्यापोटी झाला.  त्यांचे माहेरचे नाव जमना. पुढे त्यांचा विवाह कोल्हापूर संस्थानचे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे सुपुत्र राजकुमार (प्रिन्स) शिवाजी यांच्याशी झाला (६ जून १९१७). लग्नानंतर त्यांचे नाव इंदुमती राणीसाहेब छत्रपती असे झाले.

राजकुमार शिवाजी यांचा एका शिकारी दरम्यान अपघाती मृत्यू झाला (१२ जून १९१८). अकाली वैधव्य प्राप्त झालेल्या इंदुमतींना राजर्षी छ. शाहू महाराजांनी तत्कालीन सामाजिक रूढी-परंपरा यांच्या विरोधात जाऊन शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भार्गवराव कुलकर्णी, पुजारी, जोगळेकर, देव व कोडोलीकर गुरुजी या पाच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली इंदुमती यांचे शिक्षण सुरू झाले. पुढे राजर्षी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर मिस क्रेंड्रिक या इंदुमती यांच्या सहचारी पालक झाल्या व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी पुढील शिक्षण पूर्ण केले. १९२० मध्ये कोल्हापूरला प्लेग या महामारीचा संसर्ग वाढला. त्या वेळी सोनतळी छावणी (कँप) मधील व खासगी खात्यातील नोकरचाकरांच्या बायका-मुलांना व राजघराण्यातील काही स्त्रियांना सुरक्षित स्थळी पोहोचवणे, तसेच त्यांच्या राहण्या-जेवणाची व लसीकरणाची (इनॉक्युलेशनची) जबाबदारी इंदुमती यांनी लीलया पार पाडली. इंदुमती यांचे स्वतंत्र बोधचिन्ह होते. बोधचिन्हाच्या मधोमध एक भग्न नौका व बोधचिन्हाच्या शिरोभागी ‘सत्याय सज्ज:’ असा उल्लेख होता.

राजर्षी छ. शाहू महाराज यांनी इंदुमती यांच्या भविष्यातील तरतुदीसाठी स्वत:चे मृत्युपत्र करून घेतले (१९२१). महाराजांच्या स्नुषा या नात्याने ‘वनिता समाज’ या मंडळात इंदुमतींची भूमिका महत्त्वाची आहे. पूर्वेकडील सरंजामदारांच्या व पश्चिमेकडील मिशनरी स्त्रियांचा हा वैशिष्ट्यपूर्ण मेळावा असे. इंदुमती या मेळाव्यातील दुवा होत्या. अखिल भारतीय मराठा महिला शिक्षण परिषदेच्या सहाव्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तसेच कोल्हापूर येथे अखिल भारतीय मराठा महिला परिषदेच्या अधिवेशनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून इंदुमती राणीसाहेब, तर बडोद्याच्या महाराणी शांतादेवी गायकवाड परिषदेच्या अध्यक्ष होत्या (१९५३). यावेळी इंदुमती यांनी आपल्या भाषणातून स्त्री शिक्षणाचे महत्त्व विशद करून ‘मुलांच्या व पुरुषांच्या बरोबरीने स्त्री शिकली पाहिजे, तिच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले तर चालू परिस्थिती बरीचशी आहे तशीच राहील’, अशी भूमिका मांडली.

इंदुमती यांनी घेतलेली सातवी अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषद अनेक दृष्टीने संस्मरणीय ठरली. त्यात स्त्रियांसाठी एक शिक्षणसंस्था काढायचे ठरवले. त्यानुसार ‘ललित विहार’ या संस्थेची त्यांनी स्थापना केली (४ एप्रिल १९५४). आनंदीबाई शिर्के यांनी या संस्थेचे उद्घाटन केले. महिलांनी एकत्र येऊन विचार-विनिमय करावा या उद्देशाने ही संस्था काढली गेली. ही संस्था स्त्रियांना शिक्षण देऊन आत्मनिर्भर करणारी होती. तसेच ‘महाराणी शांतादेवी गायकवाड गृहशास्त्र शिक्षण संस्था’ (१९ एप्रिल १९५४), ‘महाराणी विजयमाला छत्रपती गृहिणी महाविद्यालय’, ‘औद्योगिक कला भवन’, विद्यार्थिनींसाठी वसतिगृह, ‘मॉडेल हायस्कूल फॉर गर्ल्स’, ‘पूर्व प्राथमिक अध्यापिका विद्यालय’ व बालमंदिर आदी शैक्षणिक संस्थांची स्थापना करून त्यांनी स्त्री शिक्षणाला चालना दिली. असोसिएशन माँटेसरी इंटरनॅशनल या संस्थेच्या त्या अध्यक्ष होत्या.

कोल्हापूर येथे त्यांचे निधन झाले.

संदर्भ :

  • पवार, जयसिंगराव; पवार, मंजुश्री, संपा., राजर्षी शाहू : पंचखंडात्मक स्मारक ग्रंथ, महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी, कोल्हापूर, २०१९.
  • सावंत, इंद्रजित; पाटील, देविकाराणी, राजर्षी शाहू छत्रपती : रयतेच्या राजाचे चित्रमय चरित्र, सह्याद्री इतिहास संशोधन केंद्र, कोल्हापूर, २०१४.
  • सूर्यवंशी, कृ. गो., इंदुमती राणीसाहेब, प्रकाशक ग. ल. ठोकळ, पुणे, १९७६.

समीक्षक : अरुण भोसले