आधुनिक काळात वैश्विक स्तरावरती ज्या बौद्ध संस्थांचा प्रामुख्याने उल्लेख होतो, त्यांपैकी त्रिरत्न बौद्ध महासंघ ही एक होय. ही एक धार्मिक चळवळ असून, पाश्चिमात्य राष्ट्रांत या संस्थेला ‘दि त्रिरत्न बुद्धिस्ट कम्युनिटी’ या नावाने ओळखले जाते. भारतात या संस्थेला ‘त्रैलोक्य बौद्ध महासंघ सहायक गण’ या नावाने ओळखले जात होते. त्रिरत्न हा संस्कृत शब्द असून, त्याचा अर्थ तीन रत्ने असा होतो. ती तीन रत्ने म्हणजे बुद्ध, धम्म आणि संघ होत. बुद्ध ज्याचा अर्थ स्वतःच्या प्रज्ञेने विकास पावलेली व्यक्ती, धम्म म्हणजे बुद्धांनी दिलेली शिकवण किंवा मार्ग आणि संघ म्हणजे या शिकवणींचे अनुकरण करणार्या लोकांचा समुदाय.
या महासंघाची स्थापना ७ एप्रिल १९६७ रोजी उर्गेन संघरक्षित (पूर्वीचे नाव–डेनिस लिंगवूड) यांनी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लंडनस्थित एका लहानशा खोलीत आपल्या काही सहकार्यांच्या मदतीने या महासंघाची सुरुवात झाली. त्या वेळी लंडनमध्ये या महासंघाचे नाव ‘फ्रेण्ड्स ऑफ दि वेस्टर्न बुद्धिस्ट ऑर्डर’ म्हणून प्रचलित होते. प्रामुख्याने महासंघातील अनुयायांना बौद्ध धर्म, आर्य अष्टांगिक मार्ग, धम्मअभ्यास यांविषयी शिकविले जाते. तसेच या संदर्भात अनेक शिबिरांमध्ये सांगोपांग चर्चाही होते. स्वतःच्या विकासाबरोबरच सामाजिक विकासावर महासंघात भर दिला जातो. सुरुवातीच्या सहकार्यांपैकीच बारा व्यक्तींनी आपली निष्ठा त्रिरत्नांवरती जाहीर केली आणि त्यांच्या विनंतीनुसार ८ एप्रिल १९६८ रोजी ‘दसशील उपासक’ (धम्मचारी-धम्मचारीणी) म्हणून उर्गेन संघरक्षित यांनी त्यांना दीक्षा दिली.
दीक्षा घेतलेल्या धम्मचारी-धम्मचारीणींसोबत १९७७ साली धम्मचारी लोकमित्र (जेरमी गुडी) हे पुण्यातील अय्यंगार योगा इन्स्टिट्यूटमध्ये योगाभ्यास शिकण्यासाठी आले होते. त्यानंतर सोबत आलेले धम्मचारी-धम्मचारीणी इंग्लडला परतले; मात्र लोकमित्र हे उत्तर प्रदेशातील श्रावस्ती येथे गेले आणि तिथे त्यांनी सात आठवडे एकांतवास केला. त्यानंतर पुण्याला परतत असताना ते नागपूरला पोहोचले. धम्मदीक्षेचे (धर्मांतराचे) ते एकविसावे वर्ष होते. दीक्षाभूमीवरील बाबासाहेबांच्या अस्थींकलशाला अभिवादन करण्यासाठी आलेला जनसागर पाहून त्यांनी निश्चय केला की, बुद्धधम्माच्या प्रसार आणि प्रचारासाठी ही योग्य भूमी आहे. त्यानंतर ते इंग्लडला गेले आणि उर्गेन संघरक्षितांशी चर्चा केली आणि बुद्धधम्माच्या प्रसार-प्रचाराची परवानगी घेऊन ते परत भारतात आले. ऑगस्ट १९७८ साली त्यांनी पुण्यातील एका ख्रिस्ती महिलेच्या घरात, वाहनतळाच्या ठिकाणी, त्रिरत्न बौद्ध महासंघाची सुरुवात अभ्यास वर्गाने केली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने यवत, अहमदाबाद, औरंगाबाद आणि मुंबई येथे १९८१ मध्ये महासंघाचे कार्य सुरू झाले. तत्पूर्वी भारतात फेब्रुवारी १९७९ साली उर्गेन संघरक्षित यांनी ‘त्रैलौक्य बौद्ध महासंघ साहाय्यक गण’ या नावाने संघाची अधिकृत नोंदणी केली होती.
बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९५५ साली स्थापन केलेल्या ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’च्या ध्येय-उद्दिष्टांनुसार महासंघाचे कार्य जवळपास जगातील पाच खंडांमध्ये, ५५ हून अधिक देशांमध्ये अव्याहतपणे चालू आहे. आज या महासंघाची ओळख सद्यकालीन जगामध्ये बुद्धांनी सांगितलेल्या शिकवणींचे पालन करणार्या लोकांचा समूह म्हणून प्रसिद्धी पावला आहे. जे निव्वळ विहारवासीय भिक्षू किंवा भिक्षूणी नाहीत आणि निव्वळ गृहस्थाश्रमाला प्राधान्य देणारे सर्वसामान्यसुद्धा नाहीत, तर कुटुंबासोबत राहून धम्मजीवन जगण्याचा काटेकोर प्रयत्न करणारे हे लोक आहेत.
धम्मचारी, धम्ममित्र, आणि धम्मसाहाय्यक असे स्तर आहेत. त्यामध्ये ‘दहाशील’ म्हणजे दसशील आचरणाची ज्यांनी जबाबदारी घेतली आहे, त्यांना धम्मचारी संबोधले जाते. धम्ममित्र जो धम्मचारी होण्याचा आचरणशील प्रयत्न करत आहे आणि धम्मसाहाय्यक म्हणजे बौद्धधम्माबदद्लची प्राथमिक माहिती असणारा, परंतु अधिक जास्त धम्माचरण आणि अभ्यासात न गेलेला, परंतु तशी इच्छा असलेला समविचारी व्यक्ती. अशा सर्वांचा मिळून हा त्रिरत्न महासंघ मानला जातो. आजपर्यंत ५५४ पुरुष, तर १८५ महिला असे एकूण मिळून ७३९ धम्मचारी-धम्मचारीणी भारतात प्रशिक्षित झालेले आहेत.
त्रिरत्न बौद्ध महासंघाने बौद्धधम्मातील शिकवणीनुसार धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. विशेषत: पुण्याच्या दापोडी परिसरातील झोपडपट्टीत राहणार्या गरीब व गरजू लोकांसाठी मोफत वैद्यकीय सेवा सुरू केली. याकरिता महासंघाने १९८४ साली बहुजनहिताय ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून ‘जीवक प्रकल्पां’तर्गत लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांसाठी सेवाभावी कार्य करण्यात आले. त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांसाठी पाळणाघर, बालवाडी; विद्यार्थ्यांसाठी गणित, इंग्रजी, विज्ञान या विषयांसाठी मोफत शिकवणीवर्ग; युवकांसाठी संगणक प्रशिक्षण, इंग्रजी विषयाचा अभ्यास आणि नोकरीपूर्व प्रशिक्षण; महिलांसाठी शिवणकाम, तसेच १०० बचतगटामार्फत महिलांना लघूद्योगासाठी कर्जवाटप; प्रौढांसाठी प्रौढ-शिक्षणवर्ग, बहुजन हिताय वसतिगृहे इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविले गेले. तसेच भारतभर धम्मचक्र प्रवर्तन महाविहार निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले.
महासंघाची उद्दिष्ट्ये व्यापक असून, त्यानुसार कार्य करण्यासाठी प्रशिक्षित असे धम्मचारी घडविण्याचे काम अतिशय नियोजनपूर्वक केले जात आहे. त्यासाठीचा एक प्रयत्न म्हणजे कुटुंबापासून दूर राहून धार्मिक आचरण अधिक सखोल करता यावे या उद्देशाने महिलांचे आणि पुरुषांचे स्वतंत्र कुल निर्माण केलेला आहे. ध्यानसाधनेचे वैज्ञानिक महत्त्व ओळखून शिबिर केंद्रांची निर्मितीदेखील महासंघाने केलेली आहे. त्या ठिकाणी घ्यानसाधना आणि धम्माचरणाचा सराव करून घेतला जातो, तसेच मनःस्वास्थ्यासाठी प्रशिक्षण आणि कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
महासंघामध्ये सहकारी तत्त्वावरती पूर्वी काही लहान-मोठे उद्योगही सुरू करण्यात आले होते. नंतर गरीब कुटुंबातील मुले, विशेषतः एकच पालक असलेले आणि अनाथ अशी मुले, शैक्षणिकदृष्ट्या वंचित राहू नयेत या उद्देशाने हस्तिनापूर, आग्रा, अहमदाबाद, सोलापूर, हैद्राबाद, औरंगाबाद, कोल्हापूर, वर्धा, लोहगांव, उमरगा, दापोली, नागपूर, लातूर, गोवा, तमिळनाडू या ठिकाणी मुलांचे; तर विश्रांतवाडी, नागपूर, अमरावती, लातूर, गोवा, कच्छ, चेन्नई अशा अनेक ठिकाणी मुलींसाठी निवासी वसतिगृहांची निर्मिती करण्यात आली.
बुद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी महासंघामार्फत ‘बुद्धयान’ (मराठी) आणि ‘धम्ममेघ’ (इंग्रजी) ही त्रैमासिके (१९७९), तर ‘बुद्धवाणी’, ‘त्रिरत्न ग्रंथमाला’ आणि ‘सिंहनाद’ ही प्रकाशने चालविली जातात.
त्रिरत्न बौद्ध महासंघाची इंग्लंडमध्ये अनेक केंद्रे आहेत, जी पाश्चात्त्य समाजाला अनुरूप अशा पद्धतीने बौद्ध धम्माची शिकवण देतात. त्यांपैकी अधिष्ठान हे इंग्लंडमधील हेरफर्डशर येथे असलेले एक आंतरराष्ट्रीय बौद्ध केंद्र आहे. हे त्रिरत्न समुदायाच्या जागतिक कार्याचे हृदय मानले जाते. या ठिकाणीच या संघाचे संस्थापक ऊर्गैन संघरक्षित यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांचे ते शेवटचे निवासस्थान होते आणि तेथे त्यांचे स्मृतिस्थळही आहे. येथे अनेक ध्यानसाधना शिबिरे आयोजित केली जातात, जी मनाला वैज्ञानिक आधारावरती प्रशिक्षित करण्यासाठी असतात. त्यानंतर लंडनमधील लंडन बुद्धिस्ट सेंटर हे नावलौकिक प्राप्त केंद्र आहे. जिथे पाश्चात्त्य लोकांसाठी ध्यान, बुद्धांच्या शिकवणुकीचा अभ्यास आणि विविध उपक्रम आयोजित केले जातात. हे त्रिरत्न बौद्ध चळवळीचे एक महत्त्वाचे केंद्र आहे. पद्मलोक आणि अलफॉक्सटन पार्क ही काही अन्य प्रमुख शिबिर केंद्रे आहेत, जिथे लोक काही काळ जगापासून दूर राहून धम्माचा सखोल अभ्यास आणि ध्यानसाधना करतात. पद्मलोक हे शिबिर केंद्र विशेषतः पुरुषांच्या शिबिरांसाठी प्रसिद्ध आहे.
थोडक्यात, त्रिरत्न बौद्ध महासंघ हा बुद्धांच्या शाश्वत शिकवणीवर आधारित, जागतिक शांतता, मैत्रीपूर्ण साहचर्य आणि खऱ्या बंधुभावासाठी एक सक्रिय आंतरराष्ट्रीय चळवळ म्हणून कार्यरत आहे. व्यक्तिगत आणि सामाजिक स्तरावर परिवर्तनाद्वारे हा महासंघ भेदभावविरहित समाजाच्या निर्मितीसाठी कटिबद्ध आहे, जिथे प्रत्येक व्यक्तीचा शांततापूर्ण विकास साधला जातो.
संदर्भ :
- Vajragupta, ‘The Triratna Story’, Cambridge, 2010.
- आंबेडकर, भीमराव रामजी, ‘बुद्ध और उनके धम्म का भविष्य’, तैवान, १९९७.
- आंबेडकर, भीमराव रामजी, ‘भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म’, धम्मशासन विश्वविद्यापीठ, चंद्रपूर, १९९७.
- ‘दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया’, ‘कामकाज नियम और उपनियम’, चैत्यभूमी मुंबई, २००८.
- ‘बुद्धयान’, ‘त्रैमासिक’ जुलै-सप्टेंबर, नागपूर, २०१५.
- महास्थविर (संघरक्षित), ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि बौद्धधम्म’, तैवान, १९८६.
- महास्थविर (संघरक्षित), ‘माझ्या शरणगमनाचा इतिहास’, पुणे, १९९१.
- महास्थविर (संघरक्षित), ‘क्षितिजभेद’, पहिली आवृ., पुणे, १९९२.
- लामा, दलाई, ‘माझा देश माझी माणसं’, दुसरी आवृ., पुणे, २००८.
- शर्मा, तुलसीदास, ‘महायान बौद्धधर्म की रुपरेखा’, तैवान, २००७.
- सांकृत्यायन, राहुल, ‘बौद्ध संस्कृती’, सहावी आवृ., औरंगाबाद, २०११.
- साळुंखे, आ. ह. ‘सर्वोत्तम भूमिपुत्र गोतम बुद्ध’, चवथी आवृ., सातारा, २०१०.
समीक्षक : सुधीर मस्के
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.