शेवंड हे कवचधर म्हणजेच क्रस्टेशिया वर्गात,  आर्थ्रोपोडा संघात आणि (कवचधर-संधिपाद)  पॅलिन्युरिडी कुळातील प्रजाती म्हणून प्रसिद्ध आहे. याला असणाऱ्या देशी मागणीमुळे आणि परदेशी निर्यातीमुळे यांची मोठ्या प्रमाणात मासेमारी झाली. त्यामुळे यांच्या प्रजातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. भारतामध्ये तमिळनाडू आणि केरळ या किनाऱ्याने शेवंडाचा मोठ्या प्रमाणात मत्स्यव्यवसाय होतो. महाराष्ट्र तसेच गुजरात किनाऱ्याने देखील शेवंडाच्या विविध जाती मिळतात.

आ. १. शेवंड : (१) काटेरी शेवंड (पॅन्युलिरस होमॅरस) आणि (२) स्लिपर शेवंड (थीनस ओरिएंटॅलिस ).

प्रजाती : शेवंडाच्या एकूण तीन प्रजाती पॅन्युलिरस पॉलिफॅगस  (Panulirus polyphagus ), पॅन्युलिरस होमॅरस  (Panulirus homarus) आणि  थीनस ओरिएंटॅलिस  (Thenus orientalis ) या भारतीय समुद्रकिनाऱ्यालगत  आढळतात पॅ. होमॅरस थी. ओरिएंटॅलिस  या दोन प्रजाती जास्त प्रमाणात आढळतात. थीनस प्रजातीच्या शेवंडाला स्थानिक लोक फटफटी असे म्हणतात.

अधिवास : पूर्ण वाढ झालेला काटेरी शेवंड (Spiny lobster) हा २० – २५ सेंमी. इतका लांबीचा होतो. त्याचा अधिवास १ – ५ मी. इतक्या उथळ समुद्रकिनाऱ्यालगत असतो. शक्यतो मातकट व खडकाळ किनाऱ्याने जिथे लाटांचा मारा होऊन फेस पसरतो अशा ठिकाणी राहणे पसंत करतो.  त्याचप्रमाणे गढूळ पाण्यात देखील तो आढळतो. हे प्राणी निशाचर असून कळपांनी राहतात.

आ. २. शेवंड : शरीररचना

शरीररचना : शेवंडाचे शरीर निमुळते व लंबगोलाकार असून त्याच्या अंगावर काटे दिसून येतात. त्यांच्या शरीराचे मातकट रंगाचे शिरोवक्ष आणि उदर असे दोनच भाग असतात. त्याच्या कडेला सहा पांढुरके ठिपके आढळून येतात. अंत्यखंड (Telson) आणि पश्चपाद (Uropod) तांबड्या  रंगाचे असतात. उदरीय उपांगे  फिकट रंगाची असतात.  वक्षाच्या बाजूने निघालेले पाय गडद रंगाचे असतात. उदर मऊसर असून सहा खंडापासून बनलेले असते. तुंड (Rostrum) तेवढे स्पष्ट दिसत नाही. स्पृशा खूप लांब असतात. त्यांचा शरीराच्या बाजूचा तळ भक्कम असून त्यावर काटे दिसतात. फटफटी शेवंड इतर शेवंडापेक्षा वेगळा दिसतो. एकेकाळी मुंबईच्या समुद्रात यांचे मोठ्या प्रमाणावर वास्तव्य होते.

अन्न : खाण्याच्या बाबतीत यांची फार निवड नसते.  कुजणाऱ्या मांसावर देखील त्यांची गुजराण होते. काही  मृदुकाय प्राण्यांना तो मारून खातो. अन्नग्रहण करताना ते  दृष्टीऐवजी गंध इंद्रियाचा विशेष वापर करतात. स्पर्शज्ञानासाठी स्पर्शिकेचा (Antennule) वापर करतात. अन्न भक्षण मुखांगे आणि उपांगांच्या साहाय्याने होते. ऊर्ध्वहनुपाद (Maxillipedes) आणि अधोहनू  (Mandibles) यांच्या साहाय्याने अन्नाचे बारीक चूर्ण केले जाते. शेवंडाच्या उदरपोकळीत जठर  पेषणी (Gastric mill) असते. पेषणीमध्ये अन्नाचे पेस्टसारखे स्वरूप होते.

आ. ३. फायलोसोमा डिंभक

प्रजनन : वाढताना शेवंड कात टाकतो. ६ सेंमी. पेक्षा लांब शेवंड परिपक्व होतो आणि त्यानंतर नर आणि मादी निरनिराळे ओळखू येतात. नराच्या पाचव्या पायावर जननरंध्रे दिसतात. यावर असणाऱ्या कपासारख्या अवयवाचा बाह्य लैंगिक अवयवाप्रमाणे वापर होतो. तिसरा पाय सर्वांत लांब असून समागमाच्या वेळी मादीला पकडण्यासाठी वापरला जातो. मादीच्या तिसऱ्या पायाच्या उंचवट्यावर जननरंध्रे असतात. तिच्या पाचव्या पायावर डेंगा दिसून येतो. डेंगा वापरून मादी शेपटाला चिकटलेली अंडी सांभाळते. असे डेंगे नरात नसतात. एक मादी २-४ लाख अंडी घालते. २०० मिमी. लांबीचा नर आणि २२० मिमी. लांबीची मादी परिपक्व होते. प्रजनन ८ – १८ मी. खोल पाण्यात होते.

शेवंडाच्या डिंभकांना फायलोसोमा असे म्हणतात. ही अवस्था बारीक चपटी आणि पारदर्शी शरीराची असते. त्यात स्पृशा, स्पृशिका आणि डोळे अशा जोड्या दिसतात. १२-१५ वेळेस कात टाकल्यानंतर त्याचे रूपांतर प्य्रूरुलस अवस्थेत होते. ही अवस्था पारदर्शी असते, मात्र इतर बाबतीत शेवंडासारखीच दिसते. या दोन्ही अवस्था पोहू शकतात. मात्र प्य्रूरुलसपासून शेवटी तयार झालेले शेवंड-पिलू तलस्थ (Benthic) बनते. नर शेवंड मादीपेक्षा जलद वाढतो. दहा वर्षांचे नर शेवंड ३१२ मिमी. तर मादी ३०२ मिमी. असते.

एक खाद्य प्रजाती म्हणून शेवंड ओळखला जातो. नांगर आकडा (Anchor hook) आणि डोण जाळे (Scoop net) या साहाय्याने शेवंडे पकडली जातात. तसेच जुन्या जाळ्यांचे तुकडे व बुडी जाळी वापरून शेवंड पकडतात. पाश्चात्त्य देशातून सतत मागणी असल्यामुळे त्याचे उत्पादन फार वाढले. शेवंडाच्या गोठवलेल्या शेपट्या परदेशी निर्यात होतात. मोठ्या संख्येने होणाऱ्या मासेमारीमुळे शेवंडाच्या प्रजाती धोक्यात आल्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न शासकीय पातळीवर सुरू झाले आहेत. विशेषकरून केंद्रीय समुद्री मत्स्यसंस्थेने शेवंड संवर्धन, प्रयोगशालेय संगोपन आणि मासेमारी करणाऱ्यांमध्ये नैसर्गिक अधिवासातील शेवंडाचे महत्त्वपूर्ण स्थान याबद्दल जनजागृती अशा प्रकारची कार्ये सुरू केली आहेत.

 

संदर्भ : १. बाळ, डॉ. द. वा. ; देशमुख, डॉ. नंदिनी महाराष्ट्राची सागरी मत्स्य संपत्ती  – नोंद क्र. १०९, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ, १९९३.

https://sahitya.marathi.gov.in/%E0%A4%87-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1/

2. E. V. Radhakrishnan; V. D. Deshmukh; Mary K. Manisseri; M. Rajamani; Joe K. Kizhakudanr Thangaraj Status of the major lobster fisheries in India

New Zealattd Journal of Marirw atld Fresh~laterResear-ch,2005. Vol. 39: 723-732
0028-8330/05/3903-0723 O The Royal Society of New Zealand, 2005.

समीक्षक :  कुलकर्णी, किशोर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.