एर्नो, आनी : (१ सप्टेंबर १९४०). नोबेल पुरस्कार प्राप्त फ्रेंच लेखिका. पूर्ण नाव आनी तेरेज ब्लाँश द्युशांस – एर्नो. साहित्याचे नोबेल पारितोषिक प्राप्त पहिली फ्रेंच स्त्री (२०२२). त्यांचे बालपण नॉर्मंडी प्रांतातल्या इव्होत या एका लहान खेड्यात गेले. त्यांचे आईवडील एक छोटेसे कॅफे चालवत, त्यात थोडेफार वाणीसामानही विकत. परिस्थिती गरिबीचीच होती, पण आनी यांनी मन लावून अभ्यास केला व साहित्यातील पदवी मिळवली. सुरुवातीला आनसी या गावी शिक्षिकेची नोकरी केली व नंतर राष्ट्रीय दूरशिक्षण केंद्रात काम करू लागल्या.

आनी यांची पहिली कादंबरी ‘लेझार्म्वार व्हिद’ (Les armoires vides) (१९७४) ही आहे. त्यातील दनिज लेझ्यूर ही १८ वर्षांची नायिका गर्भपात कायदेशीर नव्हता, त्या काळात तो करवून घेण्यासाठी जे दिव्य करते त्याची कहाणी आहे. पुढे त्यांनी ललितलेखन करण्यापेक्षा आत्मचरित्रपर लिखाणच अधिक केले. ‘सकिल दिझ उ ऱ्यँ’ (Ce qu’ils disent ou rien) या १९७७ मध्ये प्रकाशित झालेल्या कादंबरीत त्यांचे तारुण्याच्या उंबरठ्यावरील जीवन आढळते. ‘ला फाम जले’ (La femme gelée) (१९८१) ही कादंबरी त्यांच्या वैवाहिक जीवनावर प्रकाश टाकते. ‘ला प्लास’ (La Place) (१९८४) लिहून त्यांनी आपल्या आई-वडिलांच्या कॅफे-बारमुळे दिसलेले पुरुषांचे नमुने दाखवले. याचे इंग्रजी भाषांतर ‘मॅन्स प्लेस’ या नावाने प्रसिद्ध झाले. यानंतर आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या जीवनावर त्यांनी ‘यून फाम’ (Une femme) (१९८८) या कादंबरीत लिहिले. त्यात परिस्थितीला तोंड देत खंबीरपणे उभी राहणारी, मुलीच्या शिक्षणाची आच असणारी प्रातिनिधिक स्त्री आपल्याला भेटते.
पुढील काळात १९९७ मध्ये आनी यांच्या दोन कादंबऱ्या आल्या, एक आईच्या अल्झायमर झाल्यानंतरच्या अवस्थेबद्दल ‘ज न स्वी पा सॉर्ती द मा न्वी’ (Je ne suis pas sortie de ma nuit) आणि दुसरी आपल्या आईवडिलांबरोबर घालवलेल्या ओढग्रस्तीच्या काळाबद्दल ‘ला ऑन्त’ (La honte) हे पुस्तक आले, तर पुढे आपल्या गर्भपाताबद्दल ‘आर्म्वार व्हिद’ या अवगुंठित गोष्टीचा पुढचा भाग म्हणावा असे कथन अधिक थेटपणे L’événement) ‘लेव्हेनमाँ’ मधून त्यांनी केले (२०००). त्यावर आधारित एक चित्रपट ऑड्री दिवान यांनी काढला (२०२१). त्याचा व्हेनिस चित्रपट महोत्सवात सुवर्णसिंह देऊन गौरव झाला.
आनी यांना पुढे कॅन्सर झाला. त्याबद्दल २००५ साली ‘ल्युझाज द ला फोतो’ (L’usage de la photo) हे बरेचसे स्वानुभव व त्यावरील चिंतनपर कथन लिहिले. २००८ साली आलेल्या ‘लेझाने’ (Les années) या त्या ज्याला ‘प्रातिनिधिक आत्मकथन’ म्हणतात अशा साहित्यकृतीत त्यांनी आपले बालपण ते सन २००० पर्यंतचे सगळे जीवन उलगडले आहे. हे जीवन उलगडताना त्यात घेतलेला काळाचा, सामाजिक स्थित्यंतरांचा भेदकपणे आढावा घेतला आहे. पुढे २०१८ साली ते इंग्रजीतही प्रसिद्ध झाले. २०११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘लोत्र फीय’ (L’autre fille) मध्ये कधी न पाहिलेल्या, बालपणीच मरण पावलेल्या आपल्या मोठ्या बहिणीला उद्देशून लिहिलेली पत्रे आहेत. २०१४ साली ‘रगार्द ले ल्युम्येर मोंनामूर’ (Regarde les lumières mon amour) द्वारे त्यांनी वर्षभर सुपरमार्केट, त्याहून मोठ्या हायपरमार्केट (एकच अवाढव्य दुकान किंवा एका छताखालील अनेक दुकाने) येथे गेले असतानाची लिहिलेली दैनंदिनीच वाचकांसमोर ठेवली आहे. २०२२ साली त्यांची ‘जsनॉम’ (Jeune Homme) ही शेवटची कादंबरी आली. यामध्ये आपल्या आयुष्यात आलेल्या आपल्याहून ३० वर्षांनी लहान असलेल्या एका पुरुषाबद्दल त्यांनी लिहिले आहे.
आनी यांचे एकूणच हे ललितलेखन प्रातिनिधिकही ठरते, कारण आपल्या अनुभवाचे सामान्यीकरण करण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत. त्यांनीच आपल्या या लिखाणाचे वर्णन ‘अ-व्यक्तिगत आत्मचरित्र’ असे केले. गरीब, अर्धशिक्षित वातावरणातून उच्चशिक्षित व सुखवस्तू वर्गाकडे त्यांचा प्रवास होताना एक प्रकारचे तुटलेपण, दुरावलेपण आणि तरीही काहीसे उपरेपण असा अनुभव त्यांना आला. लिखाणातील सातत्य, साधेपणा तसेच समाजशास्त्र आणि इतिहास यांना छेद देणाऱ्या त्यांच्या साहित्याने समकालीन आयुष्यातील स्थित्यंतरांवर सामान्य स्त्रीच्या दृष्टिकोनातून प्रकाश टाकला. आनी यांच्या लिखाणाची शैली साधी सरळ आहे. फ्रेंच साहित्यात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ज्या प्रकारे प्रसिद्ध फ्रेंच कादंबरीकार मार्सेल प्रूस्त (१८७१-१९२२) यांनी आपल्याच आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवरचा लेखाजोखा संवेदनशीलतेतने व समर्थपणे मांडला तशा प्रकारचे हेही लेखन आहे.
नोबेल साहित्याचा पुरस्कार देताना निवड समितीने म्हटले, ‘आनी या अत्यंत धाडसाने, तटस्थ तीक्ष्णपणे त्या व्यक्तिगत स्मृतींची मुळे, दुरावा आणि सामूहिक मर्यादा उलगडून दाखवतात.’
संदर्भ :
- Ernaux, Annie, Regarde les lumières mon amour, Seuil, Paris. 2014
- www.annie-ernaux.org
समीक्षक : जयंत धुपकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.