क्रोनिन, जेम्स वॉटस : (२९ सप्टेंबर १९३१ – २५ ऑगस्ट २०१६).

अमेरिकन कण भौतिकशास्त्रज्ञ.

के – ‍मेसॉन (Neutral K-Meson) चे ऱ्हास होतांना मूलभूत सममितीचे आणि अविनाशित्वाचे तत्त्व पाळत नसल्याचे त्यांनी संशोधन केले, या शोधाबद्दल त्यांना १९८० चे भौतिकी विषयाचे नोबेल पारितोषिक व्हाल लॉग्सडन फिच (Val Logsdon Fitch) यांच्यासमवेत विभागून देण्यात आले.

क्रोनिन यांचा जन्म शिकागो (Chicago) येथे झाला. त्यांचे शालेय व पदवीपर्यंतचे शिक्षण डॅलस, टेक्सस (Dallas, Texas) येथे झाले. सदर्न मेथॉडिस्ट विद्यापीठातून (Southern Methodist University) त्यांनी १९५१ साली गणित आणि भौतिकी या विषयात पदवी मिळविली, तर १९५५ मध्ये शिकागो विद्यापीठातून पीएच.डी. (Ph.D.) पदवी मिळविली. तेथे त्यांना एन्रीको फेर्मी (Enrico Fermi), मरी गेल-मान (Murray Gell-Mann), सुब्रह्मण्यन् चंद्रशेखर (Subrahmanyan Chandrasekhar) यांच्यासारखे शास्त्रज्ञ शिक्षक म्हणून लाभले. प्रिन्स्टन विद्यापीठात फिच यांच्याबरोबर त्यांनी के-मेसॉन या मूलकणांच्या ऱ्हास होण्याच्या क्रियेचा अभ्यास केला. या प्रयोगातून आत्तापर्यंत भौतिक शास्त्रज्ञांना मान्य असलेल्या व प्रस्थापित अशा अविनाशित्वाच्या (Conservation laws) आणि सममितीच्या (Symmetry Principles) कल्पनांना धक्का बसला. या कल्पनेचे सूतोवाच यांग (Yang) आणि ली (Lee) या चिनी शास्त्रज्ञांनी १९५६ मध्येच केले होते. या नवीन क्रांतिकारी प्रयोगाच्या निष्कर्षासाठी क्रोनिन आणि फिच यांना नोबेल पारितोषिक विभागून दिले गेले. क्रोनिन यांनी १९७१ पर्यंत प्रिन्स्टन विद्यापीठात अध्यापन केले, तर पुढे १९९७ मध्ये निवृत्त होईपर्यंत शिकागो विद्यापीठात ज्येष्ठ मानद प्राध्यापक म्हणून ते कार्यरत होते.

मूलकणांमधील घडणारी एखादी आंतरक्रिया आणि स्वतंत्रपणे त्यांच्याच प्रतिकणांमधील आंतरक्रिया (C charge conjugation symmetry) या तंतोतंत एकसारख्या असत नाहीत. तसेच एखाद्या प्रक्रियेची परावर्तित प्रक्रिया (P parity symmetry) मूळ प्रक्रियेसारखी असत नाही. काही मूलकणांच्या आंतरक्रिया हे सममितीचे तत्त्व झुगारून देतात (सीपी व्हॉयलेशन; CP violation) हाच त्यांच्या प्रयोगाचा निष्कर्ष होता.

सध्याच्या विश्वात प्रतिद्रव्यापेक्षा (antimatter) द्रव्य (matter) खूपच मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात आहे. महाविस्फोटापासून पहिल्या काही सेकंदात सममितीची वरील तत्त्वे पाळली गेली नसल्यानेच ही द्रव्य-प्रतिद्रव्य असमानता निर्माण झाली असली पाहिजे. क्रोनिन यांचे संशोधन या निरीक्षणाला पुष्टी देते.

क्रोनिन यांना फ्रँक्‍लिन इन्स्टिट्यूटचे विदरिल मेडल (Wetherill Medal)-१९७५, तर १९७७ मध्ये लॉरेन्स ॲवॉर्ड (Lawrence Award) देऊन गौरव करण्यात आले. १९९९ साली नॅशनल मेडल ऑफ सायन्स (National Medal of Science) त्यांना बहाल करण्यात आले.

क्रोनिन यांचे ‍मिनेसोटा येथे निधन झाले.

संदर्भ:

समीक्षक – हेमंत लागवणकर

प्रतिक्रिया व्यक्त करा