मुर, स्टॅनफर्ड : (४ सप्टेंबर १९१३ — २३ ऑगस्ट १९८२).

अमेरिकन जीवरसायनशास्त्रज्ञ. प्रथिनांच्या रेणवीय संरचनेविषयी केलेल्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल १९७२ सालचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मुर व विल्यम हॉवर्ड स्टाइन (William Howard Stein) यांना मिळून अर्धे आणि क्रिस्तीआन बोहेमर आनफिन्‌सेन (Christian B. Anfinsen) यांना अर्धे असे विभागून मिळाले.

मुर यांचा जन्म शिकागो येथे झाला. त्यांनी पीबॉडी डेमाँस्ट्रेशन स्कूल (आताचे युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ नॅशव्हिले) येथे प्रवेश केला. व्हॅनडरबिल्ट युनिव्हर्सिटीच्या सुमा कम लाउडमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले (१९३५). तेथेचे ते फी-कॅप्पा-सिग्मा यांचे सदस्य होते. विस्कॉन्सिन ॲल्युम्नी रिसर्च फाऊंडेशन फेलोशीपच्या मदतीने मुर यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्बनी रसायनशास्त्रातील पीएच.डी. पदवी मिळविली (१९३८). कार्ल पाऊल लिंक (Karl Paul Link) हे मुर यांचे मार्गदर्शक होते. त्यांचे सुरुवातीचे संशोधन हे ओ-फिनॉलेमिडायमाईनच्या (o-phenylenediamine) मोनोसॅकॅराइड बरोबरच्या प्रक्रियेतून तयार होणार्‍या स्फटिकीय बेन्झिमायडॅझॉलचे (benzimidazoles) संश्लेषण आणि गुणधर्म यांवर झालेले आहे. याच संशोधनातून ठराविक मोनोसॅकॅराइडच्या विश्लेषणाची आणि संख्या परिमाणन यांची नाविन्यपूर्ण पद्धत उदयास आली. याच संशोधनामुळे बेन्झिमायडॅझॉलच्या स्वरूपात कर्बोदकांची ओळख झाली. त्यानंतर ते रॉकफेलर इन्स्टिट्यूटमध्ये रुजू झाले आणि नंतर रॉकफेलर विद्यापीठातच आयुष्यातील सर्वाधिक काळ घालविला. १९५२ साली तेथे त्यांची प्राध्यापक पदावर नियुक्ती झाली.

युरोपमध्ये असताना मुर यांनी केंब्रिज विद्यापीठात काही कालावधी घालवला. जेव्हा ते न्यूयॉर्कला परतले त्यानंतर त्यांनी विल्यम हॉवर्ड स्टाइन यांच्यासह रिबोन्यूक्लिएजमधील (ribonuclease) ॲमिनो आम्लांचा क्रम ठरविण्यासाठी ॲमिनो आम्लाच्या विश्लेषणाची नवीन कार्यप्रणाली शोधण्यास सुरूवात केली. या दोन शास्त्रज्ञांच्या एकत्रित संशोधनातून क्लिष्ट रासायनिक स्वरूप असलेल्या प्रथिन रेणूंचे विशेषत: रिबोन्यूक्लिएज या विकरासंदर्भात स्पष्टीकरण देणारे उपकरणीय तंत्र विकसित केले गेले.

मुर हे रॉकफेलर विद्यापीठात संशोधन करीत राहिले. मुर यांनी त्यांची मालमत्ता रॉकफेलर संस्थेला जीवरसायनशास्त्रात संशोधन करणाऱ्यांसाठी देऊ केली. नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त मुर यांना अमेरिकन केमिकल सोसायटीचे रिचर्ड्स पदक (१९७२), लिडंरस्ट्राम-लांग पदक (१९७२) वगैरे बहुमान मिळाले. ते अमेरिकन सोसायटी ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स या संस्थेचे अध्यक्ष (१९६६), तसेच अमेरिकन केमिकल सोसायटी, नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस, ब्रिटनची बायोकेमिकल सोसायटी, हार्व्ही सोसायटी वगैरे संस्थांचे सदस्य होते. जर्नल ऑफ बायॉलॉजिकल केमिस्ट्स या नियतकालिकाच्या संपादकीय मंडळाचे ते सदस्य होते. ब्रुसेल्स विद्यापीठ, पॅरिस विद्यापीठ आणि विस्कॉन्सिन विद्यापीठ यांच्या डॉक्टरेट पदव्या देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. बेल्जिअम बायॉलॉजिकल सोसायटी आणि बेल्जिअम रॉयल ॲकेडमी ऑफ मेडिसीन या संस्थांचे ते सन्माननीय सदस्य होते.

मुर यांचे न्यूयॉर्क येथे निधन झाले.

कळीचे शब्द : #प्रथिन #रेणू #रसायनशास्त्र #नोबेलपारितोषिक #१९७२ #विकर

संदर्भ :

 समीक्षक – श्रीराम मनोहर