कॅरिबियन समुद्रातील वेस्ट इंडीज बेटांमधील अनेक बेटांचा समूह. वेस्ट इंडीजमधील बहामा वगळता उर्वरित सर्व बेटांना अँटिलीस या नावाने ओळखले जाते. अँटिलीस बेटे दक्षिणेस व पश्चिमेस कॅरिबियन समुद्राने, वायव्येस मेक्सिकोचे आखाताने, तर उत्तरेस व पूर्वेस अटलांटिक महासागराने वेढली आहेत. ही बेटे ग्रेटर अँटिलीस व लेसर अँटिलीस या दोन गटांत विभागली आहेत. त्यांपैकी पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या बेटांना ग्रेटर अँटिलीस, तर पूर्वेस उत्तर-दक्षिण दिशेत पसरलेल्या गटाला लेसर अँटिलीस या नावाने ओळखले जाते. ग्रेटर अँटिलीसमध्ये क्यूबा, हिस्पॅनीओला, जमेका आणि प्वेर्त रीको या प्रमुख बेटांचा समावेश होतो. हिस्पॅनीओला बेट राजकीय दृष्ट्या डोमिनिकन प्रजासत्ताक व हैती अशा दोन देशांमध्ये विभागले आहे. क्यूबा बेटाने या द्वीपसमूहाच्या एकूण क्षेत्रफळापैकी जवळजवळ निम्मे क्षेत्र व्यापले आहे. प्वेर्त रीको बेटापासून दक्षिणेस त्रिनिदाद व टोबॅगोपर्यंत वक्राकार पसरलेली असंख्य लहान बेटे लेसर अँटीलीसमध्ये येतात. व्हर्जिन बेटे, अँग्विला, सेंट कीट्स व नेव्हिस, अँटिग्वा व बारबूडा, माँटसेरात, ग्वादलूप, डोमिनिका, मार्तीनीक बेटे, सेंट लुसीया, सेंट व्हिन्सेंट व ग्रेनेडीन्झ, बार्बेडोस, ग्रेनेडा या बेटांचा समावेश लेसर अँटिलीसमध्ये होतो.

लेसर अँटीलीसमधील उत्तरेकडील बेटांना लीवर्ड बेटे, तर दक्षिणेकडील बेटांना विंडवर्ड बेटे असे संबोधले जाते. दक्षिण अमेरिकन सागरमग्न खंडभूमीवर पूर्वेस त्रिनिदादपासून पश्चिमेस आरूबापर्यंत पसरलेली बेटेही लेसर अँटिलीसमध्येच मोडतात. व्हेनेझुएलाच्या किनाऱ्यावर पसरलेल्या या बेटांमध्ये त्रिनिदाद व टोबॅगो, मार्गारीटा, बॉनॅर, कुरासाऊँ व आरूबा या प्रमुख बेटांचा समावेश होतो. अँटिलीस बेटांमधील काही बेटे स्वतंत्र देश आहेत, तर काही बेटे इतर देशांचे सागरपार प्रांत आहेत. यूरोपीयन नव्या जगात पोहोचण्यापूर्वी यूरोपच्या साधारणपणे पश्चिमेस, अटलांटिक महासागर पार करून असलेली ही एक रहस्यमय भूमी असल्याचे मानले जात होते. तिला अँटालिया म्हणून ओळखले जात असावे. मध्ययुगीन तक्त्यांमध्ये काही वेळा खंड किंवा मोठे बेट म्हणून, तर काही वेळा द्वीपसमूह असा उल्लेख आढळतो. क्रिस्तोफर कोलंबस यांनी वेस्ट इंडीजचा शोध लावल्यानंतर या नव्या भूमीसाठी अँटिलास ही स्पॅनिश संज्ञा वापरण्यात आली, तर अनेक यूरोपीयन भाषांमध्ये कॅरिबियन समुद्राला ‘अँटिलिसचा समुद्र’ हे पर्यायी नाव वापरले जाई.

वेस्ट इंडीज बेटे म्हणजे इतिहासपूर्व काळात उत्तर व दक्षिण अमेरिका यांना जोडणाऱ्या जलमग्न पर्वतश्रेणींचाच एक भाग आहे. दोन मुख्य पर्वतश्रेण्यांमुळे वेस्ट इंडीज बेटांची निर्मिती झालेली आहे. त्यांपैकी पूर्व-पश्चिम दिशेत पसरलेल्या पहिल्या श्रेणीमुळे ग्रेटर अँटिलीस बेटांची, उत्तर-दक्षिण दिशेत वक्राकार पसरलेल्या दुसऱ्या श्रेणीमुळे पूर्वेकडील लेसर अँटीलीस बेटांची निर्मिती झालेली आहे.

अँटिलीस बेटे उष्ण कटिबंधात येतात. विषुववृत्ताजवळच्या स्थानामुळे व समुद्रसान्निध्यामुळे या बेटांवरील हवामान उष्णकटिबंधीय सागरी स्वरूपाचे असते. ऋतुनुसार हवामानात विशेष बदल होत नाही. हवामान उष्णकटिबंधीय असले, तरी अटलांटिक महासागर व त्यावरून वर्षभर वाहणारे ईशान्य व्यापारी वारे यांमुळे येथील उष्णतेची तीव्रता कमी होते. त्यामुळे वर्षभर येथील हवामान सौम्य राहते. बाष्पयुक्त व्यापारी वाऱ्यांमुळे वातसन्मुख बाजूकडील बेटांवर जोरदार पर्जन्यवृष्टी होते. वर्षभर सापेक्ष आर्द्रता जास्त राहते. ऋतू व पावसाचे प्रमाण यांतही बरीच प्रादेशिक भिन्नता आढळते.

संदर्भ : Monkhouse, F. J., Principles of Physical Geography, New York, 1970.

समीक्षक : सुरेश फुले


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.