सुब्रा,  विल्मा : (१ जानेवारी १९४३). अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ व लढाऊ पर्यावरणवादी. सुब्रा यांनी आपले आयुष्य पर्यावरणाच्या परिणामांबद्दल चिंतित असलेल्या नागरिकांना मदत करण्यासाठी समर्पित केले आहे. त्यांचा जन्म लुइझिॲनातील मॉर्गन सिटी येथे झाला. लुइझिॲनाच्या मॉर्गन सिटी हे गाव दक्षिण किनारपट्टीजवळील दलदलीच्या प्रदेशात उंचवट्यावर वसलेले आहे. त्यांचे शिक्षण लाफायेत, लुइझिॲनातच पार पडले. त्यांनी सूक्ष्मजीवशास्त्र आणि रसायनशास्त्रात पदवी (१९६५) आणि जीवरसायनशास्त्रात पदव्युत्तर पदवी (१९६७) संपादन केल्यात.

सुब्रा या जनहितासाठी लढणाऱ्या वैज्ञानिक आहेत. पर्यावरणातील फेरफार आणि विविध उद्योगांमुळे होणारे प्रदूषण यांचा जनसामान्यांना होणारा त्रास, तसेच त्यांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी त्या लढा देतात. नोर्को आणि दक्षिण इलिनॉयच्या किनारापट्टीवरील दलदलीच्या नजीक गरीब वस्त्यांजवळ तेल कंपन्या आणि पेट्रोलजन्य रासायनिक उद्योगांची विषारी अपशिष्टे उघड्यावरच टाकली जातात. या बहुतेक गरीब वस्त्या गैर गौरवेतरांच्या आहेत. सुब्रांनी अशी ८०० प्रकरणे उघडकीस आणली असून, अमेरिकेच्या पर्यावरण रक्षण संस्थेकडून या वस्त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. ही प्रकरणे केवळ इलिनॉय राज्यापुरतीच मर्यादित नाहीत, तर टेक्सास, वायोमिंग, उत्तर डकोटा तसेच दक्षिण कॅलिफोर्नियाच्या आणि लॉस एन्जेल्सच्या किनाऱ्यावरील बंदरातून तेलवाहू जहाजांकडून होणाऱ्या प्रदूषणापर्यंत त्याची व्याप्ती आहे.

प्रदूषण नियंत्रणाबद्दल जागृती करणाऱ्या संस्थांना ज्या वेळी अनुदाने मिळू लागली, त्या वेळी पेट्रोल आणि पेट्रोलजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या संस्थांनी सुब्रांपुढे मैत्रीचा हात पुढे केला. त्यांनी प्रदूषण होऊ नये म्हणून काही प्रमाणात प्रयत्न सुरू केले. अशा संस्थांच्या मदतीने सुब्रा यांनी प्रदूषणाचे प्रश्न सोडवायला सुरुवात केली.

डीप वॉटर होरायझन ऑइल रीगचा स्फोट (२० एप्रिल, २०१०) हा  अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी पर्यावरणासंबंधित दुर्घटना होती.  या दुर्घटनेत पसरलेल्या तेलाच्या तवंगाची व्याप्ती काही लक्ष चौ.किमी. असावी. त्यातच वादळी वाऱ्यांनी हा तवंग सागरावर आणखी पसरवला. हा तवंग पसरू नये म्हणून जे रसायन वापरण्यात आले, त्यामुळे या रसायनाचे कोरेक्सिटच्या आणि तवंगाच्या मिश्रणाने तेलमिश्रित कोरेक्सिटचे गोळे तिथल्या सागरतळी विसावले. यामुळे तिथल्या पारिस्थितीकीचे दीर्घकालीन नुकसान झाले. या गोळ्यांच्या घातक परिणामांमुळे अनेक सागरी जीव नष्ट होत आहेत. इथले जैविक संतुलन बिघडले आहे. या तवंगामुळे या भागातील भूजलाचे साठे विषारी बनले आहेत. परिणामी या तवंगांचा निचरा करण्यासाठी काम करणारे तेलनिर्मिती कंपनीचे कर्मचारी, त्यांना मदत करणारे कार्यकर्ते आणि त्या भागातले स्थानिक असे सु. एक लाख ७५ हजार लोक अनेक प्राणघातक आजारांची शिकार बनले आहेत.

सुब्रा ह्या अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सन्मानांच्या मानकरी आहेत, त्यांना पर्यावरण संरक्षण विषयात काम केल्याबद्दल मॅकआर्थर फेलोशिप, लुइझिॲनाच्या राज्यपालांतर्फे पर्यावरण रक्षणासंबंधीचा पुरस्कार, मार्टिन ल्युथर किंग इ. पुरस्कार मिळाले. त्यांनी राष्ट्रीय पर्यावरण समितीच्या (आंपीए) उपाध्यक्ष आणि या संस्थेच्या पर्यावरण-प्रदूषण प्रश्नांसंबंधी प्रमुख सल्लागार म्हणून काम केले आहे. सध्या त्यांचे न्यू आयबिरिया या गावात वास्तव्य असून त्या पर्यावरणाच्या परिणामाबाबत काम करत असलेल्या सुब्रा कंपनीच्या अध्यक्षा आहेत.

कळीचे शब्द : #पर्यावरण #डीप वॉटर होरायझन ऑइल रीगचा स्फोट.

संदर्भ :

  • मार्सा, लिंडा, पीपल्स सायंटिस्ट, विल्मा सुब्रा, डिस्कव्हर,  नोव्हेंबर २०१३.

समीक्षक : अ. पां. देशपांडे

 


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.