नैसर्गिक पर्यावरणाचा विवेकपूर्ण उपयोग करून त्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी विज्ञान, तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी या शाखांतील तत्त्वांचा उपयोग करण्याची प्रक्रिया म्हणजेच पर्यावरण अभियांत्रिकी होय. मनुष्य आणि इतर सजीवांच्या उपयोगासाठी स्वच्छ जलवायू, भूमी आणि इतर नैसर्गिक संसाधने उपलब्ध करून देणे व पर्यावरणाची गुणवत्ता कायम राखून शाश्वत विकासाचा मार्ग प्रशस्त करणे, हे पर्यावरण अभियांत्रिकीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. टाकाऊ पदार्थांचे व्यवस्थापन, पुनरउपयोग, चक्रीकरण, किरणोत्सारी व इतर प्रकारच्या प्रदूषणांपासून संरक्षण, औद्योगिक सुरक्षा आणि बांधकाम, तसेच इतर कार्यांचा पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास इत्यादी बाबींचा समावेश पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये होतो.

जनस्वास्थ्य अभियांत्रिकी या विषयावरूनच पर्यावरण अभियांत्रिकी हा विषय विकसित करण्यात आला. लंडन येथे इ. स. १९५० मध्ये जोसेफ बझलगेट यांनी पाण्यामधून होणाऱ्या आजारांवर प्रतिबंध घालण्यासाठी मलनिस्सारण प्रणाली तयार केली आणि तेव्हापासून पर्यावरण अभियांत्रिकी या विषयाची उपयोगिता लोकांना समजली. जनस्वास्थ्य रक्षणाबरोबरच पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी पर्यावरण अभियांत्रिकी हा विषय मनुष्यजातीस वरदान ठरला आहे.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान, नागपूर

घातक कचऱ्याचे व्यवस्थापन, त्यास नष्ट करणे अथवा त्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनरउपयोग करणे, पाणी पुरवठा योजना तयार करणे, औद्योगिक कचरा आणि सांडपाण्याच्या चक्रीकरणाकरिता प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून संयंत्र उभारणे, टाकाऊ पदार्थांचे रासायनिक विश्लेषण करून त्यातील घातक रसायनांची विल्हेवाट लावणे, तसेच जागतिक स्तरावरील प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करून जनस्वास्थ्य सुरक्षा प्रदान करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादी महत्त्वपूर्ण बाबी पर्यावरण अभियांत्रिकीमध्ये समाविष्ट आहेत. पर्यावरणाची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवीन संयंत्रांची रचना करून त्यांची स्थापना करण्यासाठी व कमीत कमी खर्चात जनस्वास्थ्यास कल्याणकारी ठरतील असे प्रकल्प उभारतांना पर्यावरण अभियांत्रिकीचा आधार घेतला जातो.

भारतात नागपूर येथे राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान (नॅशनल इन्व्हिरॉनमेंटल इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्युट – निरी) असून या संस्थानामध्ये पर्यावरण पर्यवेक्षण, पर्यावरण जैवऔद्योगिकी, घन व धोकादायक अपशिष्ट प्रबंधन, पर्यावरणीय प्रणाली अनुकूलन, पर्यावरणीय प्रभाव व जोखिम मूल्यमापन आणि पर्यावरण नीती विश्लेषण या सहा बाबींवर विशेष कार्य केले जात आहे.

समीक्षक : उमाजी नायकवडे