इस्लामी किंवा मुसलमानी विधीच्या प्रमुख चार मूलस्रोतांपैकी कियास हा चौथा मूलस्रोत. सतर्क युक्तिवाद किंवा सदृश ‘परिस्थिती’तून तर्काने अनुमान काढण्याचे तत्त्व म्हणजे कियास. यालाच ‘कयास’ किंवा ‘किया’ असेही म्हटले जाते. इस्लामी न्यायशास्त्राच्या विकासात मानवी बुद्धीचे स्थान त्यामुळे अधोरेखित झाले आहे. सुन्नी कायदेपंडितांच्या सिद्धांताप्रमाणे तर्कसंगत अनुमान काढण्यासाठी व त्याला न्यायिक नियमाचे स्वरूप प्राप्त होण्यासाठी पुढील चार घटकांची पूर्तता होणे आवश्यक असते :
- कायदेशीर निर्णय देण्यासाठी किंवा निष्कर्ष काढण्यासाठी नवीन प्रकरण समोर असले पाहिजे.
- ‘कुराण’, पैगंबरीय प्रथापरंपरा आणि सहमती यांवर आधारित निर्णय घेण्यात आलेले प्रकरण समोर असले पाहिजे.
- मुख्य प्रकरणात घेण्यात आलेल्या निर्णयामागे किंवा काढण्यात आलेल्या निष्कर्षामागे असलेले प्रभावी कारण आणि
- पूर्वीच्या आणि नव्या प्रकरणातील साधर्म्य.
वरील साधर्म्य असलेल्या प्रकरणात घेण्यात आलेला निर्णय किंवा काढण्यात आलेला निष्कर्ष ज्या प्रभावी घटकाच्या आधारे काढण्यात आला असेल, त्याचाच आधार नव्या प्रकरणात घेऊन निर्णय घेण्यात आलेल्या प्रक्रियेस कियास म्हणतात. अर्थात, अशा प्रक्रियेत विवेकबुद्धीचा वापर अपरिहार्य असतो. उदा., इस्लामी आचारसंहितेनुसार मद्यपान करणे किंवा मादक पदार्थांचे सेवन करणे हे निषिद्ध मानले आहे. या नियमाचा आधार घेऊन कियासचा अर्थ समजून घेता येईल. मद्यप्राशन केल्याने नशा चढते हे सर्वज्ञात वास्तव आहे; पण त्याऐवजी दुसऱ्या कोणत्याही पदार्थाच्या सेवनाने नशा चढत असेल, तर तेथेही हा नियम लागू होतो. या दोन्ही पदार्थांच्या सेवनाने नशा चढणे हे यांतील साधर्म्य आहे. त्यामुळे पहिल्या प्रकरणासंबधीचा निर्णय येथेही लागू होतो. म्हणजेच दोन प्रकरणांतील साधर्म्यामुळे पहिल्या प्रकरणात लावलेला नियम, मानवी विवेकबुद्धीच्या आधारे दुसऱ्या प्रकरणालाही लावता येतो.
मुहमंद पैगबरांच्या निधनानंतरच कियासला न्यायशास्त्राचे एक साधन म्हणून मान्यता मिळाली. पैगंबरोत्तर काळात इस्लामचा प्रसार आजुबाजूच्या प्रदेशांत झाला होता. त्या प्रमाणात नव-धर्मांतरितांच्या समस्या व त्यांची गुंतागुंतही वाढली होती; पण या बाबतीत मार्गदर्शन करायला पैगंबर हयात नव्हते. परिणामत: आठव्या शतकापासून नंतरच्या काळात कियास या साधनाचा वापर समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या प्रमाणात होऊ लागला; पण त्याचबरोबर त्याला प्रखर विरोधही होत होता. ‘कुराण’ आणि हदीस या इस्लामी न्यायशास्त्राच्या मूलभूत स्रोतांत न्यायशास्त्रासंबंधीचे सर्व विषय आलेले आहेत. या दैवी साधनांच्या सर्वसमावेशकतेमुळे या बाबतीत मानवी बुद्धीचा वापर करण्यास स्थानच नाही, असा विरोधकांचा युक्तिवाद होता.
कियासच्या पुरस्कर्त्यांनी या टीकेला उत्तर दिल्याचेही इस्लामी न्यायशास्त्राच्या इतिहासात नमूद आहे. पैगंबरांनी सहमतीचा (इज्मा) उघडपणे दिलेला पाठिंबा व मान्यता आणि त्यांच्या सहकार्यांनी साधर्म्य आणि विवेकबुद्धी यांचा समतोलपणे वापर करून काढलेले निष्कर्ष या दोन्ही बाबी कियासच्या पुरस्कर्त्यांना माहीत होत्या. त्यांचा आधार घेऊनच त्यांनी विरोधकांच्या टीकेला समर्पक उत्तर दिले.
शाफीयाह पंथाचे मुख्य प्रेरक व इस्लामी कायद्याचे थोर अभ्यासक इमाम शाफी (७६७–८२०) यांनी ‘रिसाला’ या ग्रंथामध्ये इस्लामी धर्माची मूलतत्त्वे (उसूल) यांबद्दल अतिशय तर्कशुद्ध विवेचन केले आहे. त्यामुळेच इस्लामी न्यायशास्त्राचे जनक म्हणून त्यांना ख्याती प्राप्त झाली. कियास किंवा विवेकवादी साधर्म्याच्या सिद्धांताला न्यायशास्त्राचे एक अभिजात साधन म्हणून त्यांनी मान्यता मिळवून दिली.
कियासचे इंग्रजी विधीमधील विधिकल्पिताशी (फिक्शन ऑफ लॉ) बरेच साम्य आहे, असे सुप्रसिद्ध ब्रिटिश विधिवेत्ते सर हेन्री मेन (१८२२–८८) यांचे मत आहे. कियासच्या वचनकारकतेसंबंधी सर्व मुस्लिम पंथांमध्ये एकवाक्यता नाही. उदा., हनबलचा पारंपरिक संप्रदाय कियासला फारसे महत्त्व देत नाही; कारण त्याला ‘कुराण’-सुन्नांसारख्या ईश्वरेच्छेचा दुजोरा नाही. फक्त इमामच विधीमध्ये सुधारणा करू शकतात या कारणास्तव शियापंथीय कियासला मूलस्रोत मानीत नाहीत.
संदर्भ :
- Husain, Athar, ‘Prophet Muhammad and His Mission’, New Delhi, 1967.
- Kidwai, Mohammad Asif, ‘What Islam Is’?, Lucknow, 1967.
- Salahi, M. A. ‘Muhammad : Man and Prophet’, Massachusetts, 1995.
- Watt, W. Montgomery, ‘Muhammad : Prophet and Statesman’, Edinburgh, 1960.
- अबुल हसन अली नदवी, ‘इस्लाम : एक परिचय’, नई दिल्ली, २०१६.
- केळकर, श्रीपाद, अनु. ‘इस्लामची सामाजिक रचना’, पुणे, १९७६.
समीक्षक : अन्वर राजन
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.