औद्योगिक सांडपाणी शुद्धीकरणाच्या भौतिक पद्धती, रासायनिक पद्धती आणि जैविक पद्धती यांपैकी सदर नोंदीत रासायनिक व जैविक पद्धतींची माहिती घेण्यात आली आहे.

सामू बदलणे : शुद्धीकरणाच्या ज्या प्रक्रियांमध्ये पाण्याचा सामू हा एक महत्त्वाचा घटक असतो, त्या प्रक्रियांच्या आधी सामू बदलून घेतला जाताे. उदा., पाण्यातील अमोनिया आणि नायट्रोजनचे प्रमाण कमी करणे, वायुजीवी आणि अवायुजीवी शुद्धीकरण पद्धती, निर्जंतुकीकरणासाठी क्लोरीनचा वापर, फॉस्फरसचे प्रमाण कमी करणे, किलाटन करून पाण्यातील आलंबित पदार्थ कमी करणे इत्यादी. वरील प्रत्येक पद्धतीमध्ये सामू योग्य असेल, तर ती पद्धत परिणामकारक ठरते.

सांडपाण्यातील अतिरिक्त अम्लता/अल्कता बदलण्यासाठी वापरली जाणारी काही रसायने म्हणजे गंधकाम्ल, नत्राम्ल, हायड्रोक्लोरिक अम्ल, स्फुरदाम्ल, चुना, सोडियम हायड्रोक्साइड, अमोनिया, धुण्याचा सोडा ह्या रसायनांचे पाण्याबरोबर जितके जास्त मिश्रण होईल तितकी त्यांची परिणामकारकता अधिक होते, तसेच सामू वाढवण्याआधी ज्या सांडपाण्यामध्ये विरघळलेले पदार्थ असतात, ते सामू वाढवल्यास आलंबित स्वरूपात बाहेर पडून गाळाचे प्रमाण वाढवू शकतात हेसुद्धा ध्यानात घेणे आवश्यक असते. वरील रसायनांपैकी कोणते रसायन आणि किती प्रमाणात वापरावे ह्यासाठी प्रयोगशाळेत विविध चाचण्या कराव्या लागतात.

किलाटन : पाण्यातील आलंबित आणि कलील पदार्थ कमी करण्यासाठी ही पद्धत वापरतात. किलाटक म्हणून वापरली जाणारी रसायने म्हणजे तुरटी, फेरिक क्लोराईड, फेरस सल्फेट इ. पाण्यातील अल्कतेबरोबर ह्यांची रासायनिक प्रक्रिया होऊन मोठ्या प्रमाणावर गाळ उत्पन्न होतो, तो सेंद्रिय किंवा असेंद्रिय प्रकारचा असू शकतो. किलाटकांना साहाय्यक म्हणून काही वेळा सेंद्रिय बहुलक (Organic polymers) वापरतात, त्यामुळे गाळाचे प्रमाण वाढते. गाळ मुख्यतः निरींद्रिय असेल तर त्याच्यातील पाणी कमी करून त्याची विल्हेवाट लावता येते, पण सेंद्रिय गाळावर वायुजीवी किंवा अवायुजीवी प्रक्रिया करावी लागते. किलाटकाचे आणि बहुलकाचे प्रमाण किती असावे आणि उत्पन्न झालेल्या गाळाची विल्हेवाट कशी लावावी हे प्रयोगशाळेत चाचण्या करून ठरवावे लागते.

ऑक्सिडीकरण व उदासीनीकरण :  शुद्धीकरण प्रक्रियेमध्ये ह्या दोन्हींचा उपयोग केला जातो, उदा., चर्मोद्योगामध्ये कातडे कमावण्यासाठी वापरलेल्या क्रोमियमची पुनर्प्राप्ती करण्यासाठी, धातुविलेपनामध्ये वापरले जाणारे सायनाईड नष्ट करण्यासाठी क्लोरिन किंवा ओझोनचा वापर करणे, क्लोरिन आणि त्याची संयुगे वापरून सांडपाण्याची जैव रासायनिक प्राणवायूची मागणी (जैराप्रामा) कमी करणे, सांडपाणी गंधरहित करणे, त्यामधील तेल, वंगण आणि ओशट पदार्थ कमी करण्यास मदत करणे, संस्कारित गाळप्रक्रियेमधील हानिकारक जीवाणू मारणे, ठिबक निस्यंदकातील (trickling filters) पाण्याचे तुंबणे आणि माश्यांचा प्रादुर्भाव कमी करणे, अवायुजीवी प्रक्रियेमध्ये उत्पन्न झालेल्या हैड्रोजन सल्फाइड वायूचे ऑक्सिडीकरण करणे, शुद्ध केलेल्या सांडपाण्यातील उरलेल्या जीवाणूंची वाढ रोखणे आणि कागद उत्पादन, वस्त्रोद्योग, खनिज तेल शुद्धीकरण, खाद्यतेल अन्नप्रक्रिया आणि संलग्न उद्योग ह्यामध्ये आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिडीकरण, उदासीनिकरण, विरंजन आणि जंतूनाशन ह्यासारख्या प्रक्रिया घडवून आणणे.

निष्फेनीकरण, आयनविनिमय आणि निर्जंतुकीकरण या रासायनिक तसेच जैविक प्रक्रियाची माहिती “जलशुद्धीकरण” या विषयांतर्गत असणाऱ्या पुढील नोंदींमध्ये पहावयास मिळेल.

निष्फेनीकरण : https://marathivishwakosh.org/27656/

आयनविनिमय : https://marathivishwakosh.org/27884/

निर्जंतुकीकरण :

औद्योगिक सांडपाण्याची प्रत वेळोवेळी बदलत असल्यामुळे वरील प्रक्रियांचा वापर आणि त्यासाठी लागणारी रसायने आणि त्यांची मात्रा ह्यांचे प्रमाण प्रयोगशाळेमध्ये चाचण्या घेवून ठरवावे लागते.

वायुजीवी आणि अवायुजीवी प्रक्रिया :  वायुजीवी व अवायुजीवी या प्रक्रियेविषयीच्या माहितीकरिता ‘घरगुती सांडपाण्याचे शुद्धीकरण आणि नियोजन’ या विषयांतर्गत आलेल्या पुढील नोंदी पहा.

संदर्भ :

  • Arceivala, S. J.; Asolekar, S. R. Wastewater Treatment for Pollution Control and Reuse, New Delhi, 2007.
  • Eckenfelder, W. W. Jr.; Ford, D. L. Water Pollution Control- Experimental Procedures for Process Design, New York, 1970.
  • Rich, L. G. Unit operations of sanitary engineering, New York, 1961.

समीक्षण : मराठी विश्वकोश संपादक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.