राइट, ॲन : (१० जून १९२९ — ५ ऑक्टोबर २०२३). ब्रिटिश वंशाची भारतीय संवर्धनवादी. त्यांनी भारतातील वन्यजीवांचे विशेषतः वाघांचे संरक्षण करण्यासाठी जीवन समर्पित केले. त्यांनी व्याघ्र प्रकल्प, १९७२ चा वन्यजीव (संरक्षण) कायदा आणि डब्ल्यूडब्ल्यूएफ-इंडियाची स्थापना करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
राइट यांचे वडील भारतीय नागरी सेवा क्षेत्रात असल्याने, त्याचे लहानपण मध्यप्रदेशातील जंगलामध्ये गेले. बालपणी जंगलामध्ये विंचू शोधणे आणि गोल्फ ग्राऊंडवर वाघाच्या पायांच्या ठशांचा माग काढणे यात त्या प्रवीण झाल्या होत्या. अमरावतीच्या बळकट गवालिगड तटाच्या भिंतीवरून बिबट्या उडी मारून पसार होतो, हे त्यांनी अनेक वेळा पाहिले होते. वन्य प्राण्यांची शिकार करणे, ही लहानपणी नेहमीची बाब होती. १९६७ आणि १९६८ मध्ये पडलेल्या दुष्काळात बिहारच्या जंगलातील वन्य प्राण्यांची सर्रास हत्या होत असल्याचे त्यांनी पाहिले, त्यामुळे त्यांनी वन्य प्राणी संरक्षण करण्याचे ठरविले. वन्यजीव लेखक ई पी गी यांच्याकडून त्यांनी वन्यजीवांचे ज्ञान मिळविले.
भारतात वर्ल्ड वाइल्ड लाईफ फंड या संस्थेची स्थापना १९६९ मध्ये झाली. १९७१ मध्ये राइट यांनी स्टेटसमन या कोलकत्याच्या प्रख्यात दैनिकात कोलकात्याच्या न्यू मार्केटमध्ये वाघ, बिबट्या अशा मार्जार कुळातील वन्य प्राण्यांच्या कातडीच्या धक्कादायक विक्रीबद्दल लेख लिहिला. हा लेख न्यूयॉर्क टाइम्समध्ये पुनर्मुद्रित झाला. स्टेटसमनमध्ये ‘भारतीयांनी वाघ आणि बिबट्याच्या शिकारीवर वेळीच उपाय योजले नाहीत तर त्यांचा नाश लवकरच होईल’ अशी पुस्ती जोडली. या लेखामुळे भारतीय वाघ आणि बिबटे यांच्या नाशावरील एक अधिकृत व गंभीर प्रश्न उजेडात आला. याची दखल घेऊन त्यावेळच्या भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यानी वाघ गणना प्रकल्प १९७२ साली सुरू केला आणि राइट यांची या प्रकल्पाचे सभासद म्हणून नेमणूक केली. पुढील वर्षी या गणनेवर आधारलेला ‘भारतीय व्याघ्र प्रकल्प’ सुरू झाला. या प्रकल्पानुसार भारतात नऊ क्षेत्रामध्ये वाघ संरक्षण केंद्रे स्थापन झाली.
राइट यांनी ‘वन्यजीव संरक्षण कायदा १९७२’चा (वाइल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट १९७२) मसुदा लिहिण्याचे आणि झारखंड (१९७६), बालकराम राष्ट्रीय उद्यान मेघालय (१९८६), निओरा व्हॅली राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल (१९८६) यांसारखी अनेक संरक्षित क्षेत्रे नव्याने निर्माण केली. भारतीय वन्यजीव बोर्डामध्ये त्यांनी १९ वर्षे काम केले. त्या मेघालय आणि अंदमानसह भारतातील सात राज्यांच्या वन्यजीव बोर्डावर एकाच वेळी कार्यरत होत्या. भारतीय गेंडा वाचवण्यासाठी त्यांनी ऱ्हायनो फाउंडेशन स्थापन केले, त्याचवेळी आरण्यक या संस्थेची स्थापना झाली. अनेक दशके ‘ऱ्हायनो चेअर’ त्या भूषवित होत्या. भारतीय वन्य रक्षणासाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल १९७९ मध्ये त्यांना ऑर्डर ऑफ गोल्डन आर्क हा किताब देण्यात आला. १९८३ मध्ये मोस्ट एक्सलंट ऑर्डर ऑफ ब्रिटिश एंपायर हा किताब त्यांना ग्रेट ब्रिटनमधून जाहीर झाला.
राइट यांनी आयुष्यभर वाघ, हत्ती, भारतीय एकशिंगी गेंडा, हॉर्नबिल, पिग्मी डुक्कर, अशा विविध वन्यजीवांना वाचवण्यासाठी अथक प्रयत्न केले. वन्यजीव तज्ञ, वाघ वाचवण्यासाठी प्रयत्न, घोडे प्रजोत्पादन तज्ञ, घोडेस्वारीत प्रवीण अशा राइट भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ब्रिटनमध्ये न परतता भारतातच राहिल्या. रॉबर्ट हॅमिल्टन राइट हे त्यांचे पती आणि मुलगी बेलिण्डा राइट ही होती.
मध्यप्रदेशातील जंगलाच्या कुशीत कान्हा राष्ट्रीय उद्यानाच्या बाहेर असलेल्या किपलिंग कॅम्पमध्ये त्यांचे निधन झाले. किपलिंग कॅम्प (बॉब) रॉबर्ट आणि ॲन राइट यांनी सुरू केलेला होता.
कळीचे शब्द : #वन्यजीव संरक्षक,
संदर्भ :
- https://www.telegraphindia.com/my-kolkata/news/tiger-conservationist-anne-wright-passes-away/cid/1971101
- https://www.google.com/search?q=ann+wright+fouder+WWF&tbm=isch&ved=2ahUKEwjV5tGLmvWBAxWX46ACHRnSBM4Q2-cCegQIABAA&oq=ann+wright+
- https://www.wwfindia.org/?24769/In-Memory-Mrs-Anne-Wright
- https://en.wikipedia.org/wiki/Belinda_Wright_(conservationist)
समीक्षक : किशोर कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.