गेडिस, पॅट्रिक (Geddes, Patrik) : (२ ऑक्टोबर १८५४—१७ एप्रिल १९३२). आधुनिक स्कॉटिश जीववैज्ञानिक, समाजशास्त्रज्ञ, पर्यावरणवादी, भूगोलज्ञ व नगररचनाकार. त्यांचा जन्म बॅलटर (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी पर्थ अकादमीतून पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी इ. स. १८७४ ते १८७८ या काळात लंडन येथील रॉयल कॉलेज ऑफ माईन्स येथे अध्ययन केले. दरम्यान इ. स. १८७५ मध्ये त्यांनी लंडन येथे टी. एच. हक्सली यांच्या हाताखाली जीवविज्ञानाचे शिक्षण घेतले. गेडिस यांनी इ. स. १८८० ते १८८८ या काळात एडिनबर्ग विद्यापीठामध्ये प्राणीशास्त्राचे अध्यापन केले. दरम्यान इ. स. १८८६ मध्ये संगीतकार अन्ना मॉर्टन हिच्याशी त्यांचा विवाह झाला. इ. स. १८८८ ते १९१९ या काळात त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, डंडी येथे वनस्पतीशास्त्राचे प्रमुख म्हणून काम पाहिले. इ. स. १९१९ ते १९२४ या काळात त्यांनी मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र व नागरिकशास्त्र विभागाच्या स्थापनेसोबतच विभागप्रमुख म्हणून उल्लेखनीय कार्य केले.

गेडिस हे हक्सली व हेकेल यांच्या प्रभावामुळे परिस्थितीविज्ञानाकडे वळले. जीवविज्ञानातील पर्यावरणाच्या सिद्धांतास अनुसरून त्यांनी पुढील विचार मांडले : ‘मानवी समाज व त्याचे पर्यावरण यांचा एकमेकांवर परिणाम होतो. नव्या साधनतंत्रांच्या शोधामुळे मानवाच्या कार्यशक्तीत भर पडते. या अतिरिक्त शक्तीचा उपयोग धर्म, तत्त्वज्ञान, कला, रंजन इत्यादी क्षेत्रांमध्ये करून तो आपला सामाजिक वारसा समृद्ध करतो. पर्यावरण व मानवाची सर्जनशीलता यांच्या परस्परपरिणामांपासूनच जीवनाची निर्मिती होते’. या विचारांच्या आधारे त्यांनी इ. स. १८८२ मध्ये आपली कार्यशक्तिविज्ञानाची (एनर्जेटिक्स) कल्पना पुढे मांडली.

प्रसिद्ध रशियन निसर्गशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ आणि अराजकवादी दार्शनिक पीटर क्रोपोत्किन यांनी चार्ल्स डार्विनद्वारा प्रतिपादित ‘सक्षम तोच जगेल’ याऐवजी प्राण्यांमधील परस्पर सहकार्याला क्रमिक विकासाचे मूळ कारण मानले होते. त्यांच्या या मताशी गेडिस सहमत होऊन प्राण्यांमधील आपापसांतील परस्पर सहयोगामुळेच जैविक क्रमिक विकासाची प्रक्रिया घडून येते, असे मत व्यक्त केले.

इंग्लडमधील प्रसिद्ध उत्क्रांतीवादी समाजशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ हर्बर्ट स्पेन्सर व फ्रेंच विचारवंत फ्रेडरिक ले प्ले यांच्या विचाराने गेडिस प्रभावित झाले होते. स्पेन्सर यांनी मानव समाजाची तुलना प्राण्यांच्या शरीराशी केली. त्यांनी समाजाला एका जीवाप्रमाणे मानून क्रमिक विकासाच्या सिद्धान्ताचा ऊपयोग करत मानव समाजाचे अध्ययन केले होते; तर फ्रेडरिक यांच्या मते, स्थान, परिश्रम आणि परिवार हे समाजातील विचारांचे मुख्य आधार अथवा प्रमुख घटक होत. गेडिस यांनी फ्रेडरिक यांच्या सिद्धान्तातील परिश्रमाला केंद्र मानले; कारण परिश्रम हे पर्यावरण व मानव या दोघांनाही प्रभावित करते. मानव आपल्या परिश्रमाच्या आधारे पर्यावरणाला आपल्या गरजेनुसार बदलत असतो, या विचारांचा प्रभाव गेडिस यांच्या विचार प्रक्रीयेवर पडला. त्याचाच परिणाम म्हणजे या सिद्धान्तातील तिन्ही घटक हे गेडिस यांच्या नगरीय विकासाच्या दृष्टीकोनाचे आधार बनले. या दृष्टीकोनाच्या आधारे त्यांनी मानवाला निर्सगावर विजय मिळविण्यापेक्षा त्याच्याशी समन्वय राखण्याचे शिकले पाहिजे, हे सांगितले.

गेडिस यांच्या समाजशास्त्रीय विचारसरणीत प्रसिद्ध तत्त्वज्ञ इमॅन्युएल कांट व फ्रेडरिक यांचा आधार होता. समाजशास्त्र हे समाजाचा अभ्यास करणारे शास्त्र असल्याने समाजाच्या लोक, कार्य व स्थान या घटकांचा अभ्यास करणारी अनुक्रमे मानवशास्त्र, अर्थशास्त्र व भूगोल ही शास्त्रे व्यापक अर्थाने समाजशास्त्राची आधारभूत शास्त्रे आहेत व समाजशास्त्र हे सर्वस्पर्शी असे शास्त्र आहे, असे विचार त्यांनी व्यक्त केले. ज्ञानक्षेत्रातील अतिरिक्त विशेषीकरणाला त्यांचा विरोध होता.

नगर विकासाची कार्यप्रणाली : गेडिस यांनी कोणत्याही शहराच्या नियोजनापूर्वी नागरिकांचे सर्वेक्षण करणे अनिवार्य मानले. ‘उपचारापूर्वी निदान’ हे त्यांचे आदर्श वाक्य होते. अशा प्रकारच्या सर्वेक्षणामध्ये भूविज्ञान, जलवायू, आर्थिक जीवन आणि सामाजिक संस्था सहभागी असणे गरजेचे मानले. गेडिस इ. स. १८७९ मध्ये मेक्सिको येथे गेले. तेथे आजारी पडून त्यांना तात्पुरते अंधत्व आले. या आजारपणामुळेच त्यांनी आरेखक संकेताचे अभिनव तंत्र शोधून काढले. कागदाला घड्या पाडून बनविलेल्या चौकोनांच्या व आरेखकांच्या आधारे निरनिराळ्या घटकांमधील आंतरक्रियांचे व परस्परसंबंधांचे स्वरूप व्यक्त करता येते, हे त्यांनी सप्रमाण दाखविले. अशाच एका आकृतीद्वारे कल्पना, कार्य (फंक्शन) व समूह यांमधील आंतरक्रियांचे स्वरूप त्यांनी स्पष्ट केले. या आलेख-आकृत्यांना ते ‘विचार करणारी यंत्रे’ (थिंकिंग मशीन्स) असे संबोधित असत.

औद्योगिक विकासाने निर्माण झालेल्या दुष्परिणामांशी त्या वेळी एडिंबरो शहर झगडत होते. गर्दीच्या वस्ती, आर्थिक असमानता, वायुप्रदूषण, कचऱ्याची दुर्गंधी, यांसोबतच प्रवासी व कामगारांच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. एडिंबरो शहरातील या समस्यांचा वास्तविक अभ्यास करण्याच्या उद्देशाने आपले विद्यापीठातील अध्यापनाचे कार्य करत ते झोपडपट्टीतील गरीब लोकांबरोबर राहिले. वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास व्हावा यासाठी स्थान, कार्य आणि लोक यांच्यातील आंतरसंबंधाना समजून घेण्यासाठी ‘आऊटलुक टावर’ या आपल्या निवासस्थानी इ. स. १८९२ मध्ये समाजशास्त्रीय संशोधनाचे व विचारमंथनाचे केंद्र स्थापन केले. या केंद्राच्या माध्यमातून सामान्य जनतेला शिक्षित करणे, शहराच्या भल्यासाठी लोकांमध्ये आवड निर्माण करण्यासोबतच त्यांच्यामध्ये सामूहिक इच्छाशक्ती निर्माण करण्याचा प्रयत्न करणे ही उद्दिष्टे त्यांनी ठेवली. या कामासाठी  गेडिस यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. म्हणूनच ‘आऊटलुक टावर’ ही ‘समाजशास्त्रातील पहिली प्रयोगशाळा’ म्हणून ओळखले जाते. या प्रयोगामुळे एडिंबरो शहराचे पुनरुत्थान करणे शक्य झाले. या कार्यामुळे त्यांना ‘नगररचनाकार’ व ‘समाजशास्त्रज्ञ’ म्हणून जगभर प्रसिद्धी मिळाली. इ. स. १९०४ मध्ये त्यांनी प्रस्तुत विषयावर सिटी डेव्हलपमेंट हा प्रमाणभूत ग्रंथ लिहिला. शहराच्या ऐतिहासिक वैशिष्ट्यांना बाधा न आणता त्याची पुनर्रचना कशी करता येईल, याची चर्चा त्यांनी त्यात केली आहे. त्यांनी प्रादेशिक सर्वेक्षणपद्धतीचा पायाच घातला. तसेच शहरी, ग्रामीण व औद्योगिक विभागांच्या एकात्म किंवा सेंद्रिय संबंधांच्या समग्र अभ्यासावर त्यांनी भर दिला. इंग्लंडमधील इ. स. १९०९ च्या गृहनिवसन व नगररचना यांसंबंधीच्या कायद्यावर गेडिस यांच्या प्रस्तुत विचारांचाच प्रभाव होता. गेडिस यांनी आपल्या शहरीकरण योजनेसंबंधीच्या सैद्धान्तिक कार्यपद्धतीचा प्रचार करण्यासाठी ‘नगरयोजना प्रदर्शनाची’ परिकल्पना विकसित केली. त्यांनी इंग्लंडमधील अनेक महत्त्वपूर्ण शहरांमध्ये प्रदर्शने भरविली. शिवाय शहर नियोजन आणि विकासासंबंधी आपले विचार व्याख्यानांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविले. या सर्वांमुळे एडिंबरो शहराचे कार्य हे इतर शहरांच्या सर्वेक्षणासाठी एक प्रतिकृती (मॉडेल) बनले. गेडिस व त्यांचे जावई फ्रेंक मियर्स यांनी इ. स. १९१९ मध्ये इझ्राएलमधील हिब्रू विश्वविद्यालयाचा आराखडा केला. तसेच इ. स. १९२५ मध्ये तेल आवीव्ह (जाफा) या प्रसिद्ध शहराचे नियोजनदेखील गेडिस यांनीच केले होते.

भारतातील कार्य : मद्रास प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लॉर्ड पेटलंड यांनी गेडिस यांना ‘शहर विकासाचे प्रदर्शन’ भरविण्यासाठी आणि भारतातील नगरांच्या नियोजनाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी भारतात येण्यासाठी आमंत्रित केले. आमंत्रणाचा स्वीकार करून ते इ. स. १९१४ मध्ये भारतात आले. लॉर्ड पेटलंड यांनी मुंबई (तत्कालीन नाव बॉम्बे) प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड विलिंग्डन आणि कोलकत्ता प्रांताचे गव्हर्नर लॉर्ड कारमाइकल यांची ओळख गेडिस यांना करून दिली. त्या आधारे गेडिस यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. मुंबई शहराच्या पहिल्या दौऱ्यात त्यांनी चार ठिकाणी सार्वजनिक व्याख्याने दिली. भारतातील मुंबई, इंदूर, मद्रास, करपूरथळा, लखनऊ, बलरामपूर यांसारख्या सुमारे पन्नास शहरांची पाहणी करून त्यांच्या नियोजनासंबंधी संशोधनात्मक अहवाल सादर केले. या संशोधनादरम्यान गेडिस यांना भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचे जवळून दर्शन झाले. त्यांनी अहवालामध्ये भारताची सामाजिक, सांस्कृतिक आणि प्रादेशिक घटकांना बाजूला करून पाश्चिमात्य मानके व शैली थोपविणे योग्य नसल्याचे मत नोंदविले. शहर विकासासाठी लोक, संस्कृती, इतिहास व भूगोल यांच्यातील परस्पर संबंधांना समजणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सिद्धान्तात मांडले. इंदूर संस्थानाधिपतींच्या सूचनेवरून इ. स. १९१८ मध्ये त्यांनी इंदूर विद्यापीठाच्या संकल्पित रचनेसंबंधीचा अहवाल दोन खंडात तयार केला.

नगर नियोजनासंबंधी महत्त्वाचे मुद्दे :

 • (१) बाह्यसौंदर्यापेक्षा मानवी जीवन आणि ऊर्जेचे संरक्षण करणे.
 • (२) विकासाची योजना टप्प्याटप्प्याने व व्यवस्थित करणे.
 • (३) भवन निर्माणासाठी उपयुक्त जमिनीची निवड करणे.
 • (४) व्यापार आणि वाणिज्याला चालना देणे.
 • (५) ऐतिहासिक आणि धार्मिक इमारतींचे संरक्षण करणे.
 • (६) यूरोपीय शहरांची नक्कल न करता स्थानिक लोकांच्या गौरवासोबतच नगरांचा विकास करणे.
 • (७) रस्ते व बागांची निर्मिती करताना केवळ श्रीमंत लोकांच्या गरजा लक्षात न घेता सर्व लोकांसाठी स्वच्छ, आनंदी आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण करणे.
 • (८) भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन करणे.

मुंबई विद्यापीठाचे तत्कालीन उप कुलपती सर चिमणलाल सीतलवाड यांनी गेडिस यांना विद्यापीठात ‘सामाजिक विज्ञान विभाग’ सुरू करण्यासाठी आमंत्रण दिले. शिवाय त्यांची विद्यापीठात प्राध्यापक पदी नेमणूक केली. या निमंत्रणाचा स्वीकार करत इ. स. १९१९ मध्ये गेडिस यांनी मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभागाची स्थापना केली. समाजशास्त्र विभागासोबतच नागरिकशास्त्र विभागाची स्थापना करावी, यासाठी त्यांनी आग्रह धरला आणि त्यातूनच नागरिकशास्त्र विभागदेखील सुरू केला. गेडिस आणि त्यांचा विद्यार्थी विक्टर ब्रेनफोर्ड हे इंग्लंडमधील समाजशास्त्राच्या अध्ययनाचे प्रणेते होते. या दोघांनी मिळून इ. स. १९०३ मध्ये ‘ब्रिटिश समाजशास्त्र सोसायटीची’ स्थापना केली. तसेच लंडन विश्वविद्यालयामध्ये समाजशास्त्र विषयाची सुरुवात करण्यासाठी दबाव आणला.

गेडिस यांचा भगिनी निवेदिता, स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी, प्रसिद्ध वनस्पतीशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्याशी संपर्क आला होता. ते जगदीशचंद्र बोस यांच्या संशोधनामुळे प्रभावित झाले होते. रवींद्रनाथ टागोर यांनी मानवतेच्या कल्याणासाठी पूर्व आणि पश्चिम येथील मूल्यांना एकत्रित आणण्यासाठी इ. स. १९२१ मध्ये ‘विश्वभारती शैक्षणिक केंद्रा’ची स्थापना केली होती. त्यांनी संस्थेच्या विकासासाठी गेडिस यांना निमंत्रण दिले. त्यातूनच गेडिस यांनी आपल्या आयुष्याच्या अंतिम टप्प्यात फ्रान्समधील मोनपेलिए या शहरात पूर्व आणि पश्चिमेतील विचारांचा एकत्रितपणे विचार व्हावा, यासाठी कॉलेजची स्थापना केली. रवींद्रनाथ टागोर आणि गेडिस यांच्यात नेहमी पत्रव्यवहार होत. त्या पत्रांचे संपादन करून बाशाबी फ्रेझर यांनी दी टागोर-गेडिस करस्पाँडन्स हे पुस्तक प्रकाशित केले.

गेडिस यांनी जे. आर्थर थॉमसन यांच्यासोबत इ. स. १८८९ मध्ये लिहिलेल्या दी इव्हॅल्यूशन ऑफ सेक्स या पुस्तकाने त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. यासोबतच त्यांनी मॉडर्न बॉटनी (१८९३), सिटी डेव्हलपमेंट (१९०४), सिविक्स : एज अप्लाइड सोशिओलॉजी (१९०४), सिटीज इन इव्हॅल्यूशन (१९१५), ॲन इंडियन पायोनियर ऑफ सायन्स (१९२०) इत्यादी ग्रंथ लिहिलेत. शिवाय अनेक शहरांच्या नियोजनासंबंधीचे अहवाल त्यांनी प्रसिद्ध केले. त्यांच्या योगदानाची दखल घेऊन फ्रांसने त्यांना इ. स. १९३१ मध्ये ‘सर’ हा किताब देऊन सन्मानित केले.

गेडिस यांचे मोनपेलिए येथे निधन झाले.

संदर्भ :

 • Boardman, Philip, Patrick Geddes : Maker of the Future, Chapel Hill, 1944.
 • Fraser, Bashabi, The Tagore-Geddes Correspondence, Kolkata, 2016.
 • Mairet, Philip, Pioneer of Sociology, London, 1957.
 • Macdonald, Murdo, Patrick Geddes’s Intellectual Origins, Edinburgh, 2020.
 • Trywhitt, Joqueline, Patrick Geddes in India, London, 1947.

समीक्षक : संदीप चौधरी