योग्य मार्गाने जाण्यासाठी मार्गदर्शन करणे म्हणजे हिदायत. अस्तित्वात आलेली प्रत्येक वस्तुमात्र बाह्य आणि अंतर्गतरित्या एकमेकांशी संलग्न किंवा बद्ध झालेली असते. त्या वस्तुमात्रेच्या उपजत स्वभावधर्मानुसार किंवा परिस्थितीनुरूप तिचे नैसर्गिकरित्या संवर्धन आणि संगोपन व्हावे म्हणून नियती (कुदरत) समुचित मार्ग उपलब्ध करून देते. या निसर्गदत्त तरतुदीमुळे सृष्टीतील सर्व वस्तुमात्रांना आपापल्या जीवनमार्गाच्या वाटचालीत साहाय्य होत असते.

प्रख्यात इस्लामी विचारवंत मौलाना अबुलकलाम आझाद यांनी ‘कुराणा’चा हवाला देऊन असे म्हटले आहे की, हिदायत ही निसर्गाची एक उत्स्फूर्त प्रेरणा असते, किंवा असेही म्हणता येईल की, ते एक नैसर्गिक दिशादर्शन असते. सुरुवातीस ती सहजप्रेरणेच्या (इन्स्टिंक्ट) स्वरूपात असते व नंतर ती संवेदनेमध्ये (पर्सेप्शन) परावर्तित होते. याचा अर्थ असाही होतो की, हिदायत या संकल्पनेत सहजप्रेरणा आणि संवेदन या दोहोंचा समावेश असतो.

सहजप्रेरणा म्हणजे सजीवांच्या अंतर्मनात उपजत असलेली उर्जा. या उर्जेमुळेच जीवनसंघर्षात टिकून राहण्यासाठी आणि पर्यायाने आवश्यक असलेल्या अन्नाच्या मूळ स्रोताकडे जाण्याचा मार्ग सजीवांच्या नवजात पाडसांना सापडत असतो. त्यासाठी त्यांना कुठल्याही बाह्य साधनांची किंवा मार्गदर्शनाची गरज लागत नाही. जसे, नवजात बालकाला आपली माता आपल्याला दूध पाजणार, याचे ज्ञान उपजत असते. कुत्र्यांच्या किंवा मांजरांच्या पिल्लांचे डोळे जन्मत: बंदच असतात, तरीही ते आपल्या आईच्या आचळापर्यंत पोहचून दूध पिऊ लागतात. कोंबडी आणि बदकाची पिले अंड्यांतून बाहेर पडल्यापडल्याच आपल्या चोचीने दाणे टिपायला लागतात; तर चिमण्या, कबुतरांची आणि इतर पक्षांची पिल्ले अंड्यांतून बाहेर आल्यानंतर काही दिवस परावलंबी असतात; पण आपली आई आपल्याला चारा भरवील याचे ज्ञान त्यांनाही उपजतच असते.

माता आणि बालक यांच्यातील सहजप्रेरणेच्या नात्यातून नवजात वस्तुमात्राची वाढ व विकास होत असतो आणि या विकासप्रक्रियेबरोबरच भौतिक, भावनात्मक आणि बौद्धिक दृष्ट्या स्वयंपूर्ण होण्याची प्रक्रियाही त्या सजीवाच्या व्यक्तिमत्त्वात तितक्याच सहजतेने होत असते. या सर्व क्रियाप्रक्रियांचा एकत्रित आणि साकल्याने विचार केला, तर विश्वातील सर्व सजीव-निर्जीवांना जीवनसंघर्षाच्या जन्म, जीवन आणि मृत्यू या तीन अवस्थांतून जावे लागते. यांतील मधली म्हणजे जीवनावस्था ही सर्वांत महत्त्वाची असते. कारण जीवनाच्या किंवा जगण्याच्या संघर्षात तगून राहण्यासाठी प्रत्येक वस्तुमात्राच्या स्वभावधर्माप्रमाणे त्याचे संगोपन होणेही आवश्यक असते. कुदरतने किंवा नियतीने त्याचीही रचनाबद्ध यंत्रणा निर्माण केली आहे. ही यंत्रणा सृष्टीच्या व्यवहारात तीन पातळ्यांवर कार्यरत असते. यातील ‘रबुबियात’ म्हणजेच ईश्वरीय संगोपन ही पहिली पायरी. दुसरी, तकदीर म्हणजे कुदरतने प्रत्येक वस्तुमात्रासाठी निश्चित केलेली भूमिका आणि तिसरी म्हणजे हिदायत (तकदीरची भूमिका यथायोग्य रीतीने पार पाडण्यास आवश्यक असलेले मार्गदर्शन). अशा या तीन अवस्थांतून वस्तुमात्राच्या जीवनप्रवासाचे एक आवर्तन पूर्ण होते. सृष्टीमध्ये एकाच वेळी अनेक आवर्तने कार्यरत असतात. एका आवर्तनातून दुसरे नवे आवर्तन सुरू होत असते.

संदर्भ :

  • Husain, Athar, ‘Prophet Muhammad and His Mission’, New Delhi, 1967.
  • Kidwai, Mohammad Asif, ‘What Islam Is?’, Lucknow, 1967.
  • Salahi, M. A. ‘Muhammad : Man and Prophet’, Massachusetts, 1995.
  • Watt, W. Montgomery, ‘Muhammad : Prophet and Statesman’, Edinburgh, 1960.
  • अबुल हसन अली नदवी, ‘इस्लाम : एक परिचय’, नई दिल्ली, २०१६.
  • केळकर, श्रीपाद, अनु. ‘इस्लामची सामाजिक रचना’, पुणे, १९७६.

समीक्षक : अन्वर राजन


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.