क्रेमर, मायकेल रॉबर्ट (Kremer, Michael Robert) : (१२ नोव्हेंबर १९६४). एक प्रसिद्ध अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि नोबेलस्मृती पुरस्काराचे सहमानकरी. जागतिक
स्तरावरील गरिबी दूर करण्यासाठी अवलंबिलेल्या प्रयोगात्मक दृष्टिकोणामुळे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अभिजित बॅनर्जी आणि त्यांच्याच पत्नी एस्थर डुफ्लो यांच्या बरोबरीने क्रेमर यांना २०१९ चा अर्थशास्त्राचा नोबेलस्मृती पुरस्कार विभागून देण्यात आला.
क्रेमर यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव युजीन क्रेमर असून ते ऑस्ट्रेलिया-पोलंडमधील यहुदी समुदयातील होते. नंतर ते अमेरिकेत स्थलांतरित झाले. त्यांची आई सारा लिलीयन ही इंग्रजी साहित्याची प्राध्यापिका असून त्यांनी अमेरिकन ज्यू आणि होलोकॉस्ट साहित्यात विशेष ज्ञान संपादन केले होते. क्रेमर यांनी १९८५ मध्ये हार्वर्ड विद्यापीठातून सामाजिक अभ्यासात पदवीचे शिक्षण पूर्ण केले आणि १९९२ मध्ये अर्थशास्त्रात पीएच. डी. ही पदवी मिळविली. तसेच १९९२-९३ मध्ये मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथून पोस्ट डॉक्टरल फेलो झाले. शिक्षण पूर्ण होताच ते १९९३ मध्ये शिकागो विद्यापीठात अभ्यागत साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले. तेथील प्राध्यापकी सोडून त्याच वर्षी ते एम. आय. टी. मध्ये प्राध्यापक म्हणून रूजू होऊन १९९९ पर्यंत तेथे कार्यरत होते. नंतर हार्व्हर्ड विद्यापीठात विकसनशील सोसायटीचे गेट्स प्रोफेसर आणि पुन्हा शिकागो विद्यापीठात प्राध्यापक म्हणून २०२० मध्ये ते रुजू झाले. त्यांची शिकागो विद्यापीठात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ म्हणून ख्याती आहे. ते बेकर फ्रेडमन इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स या संस्थेमधील डेव्हलपमेंट इनोव्हेशन लॅबचे ते संचालक आहेत.
क्रेमर यांचे संशोधन हे दारिद्र्य कमी करण्यावर केंद्रित होते. त्यांनी आपले सहकारी अभिजित बॅनर्जी आणि एस्थर डुफ्लो यांच्यासमवेत जागतिक दारिद्र्य दूर करण्यासाठी प्रयोगात्मक पद्धती स्वीकारली. त्यांनी गरिबीला कारणीभूत असणाऱ्या विविध घटकांची विभागणी करून या घटकांचे छोटे छोटे भाग केले आणि त्यावर काम केले. केनियाच्या पश्चिम भागातील मुलांचे शिक्षण आणि आरोग्य यांवर त्यांनी कार्य करून अनेक उपाययोजना सूचविल्या. उदा., त्यांनी मुलांची शैक्षणिक प्रगती सुधारण्यासाठी शाळेत न जाणाऱ्या मुलांवर प्रयोग करून त्यांना शाळेत जाण्यास प्रवृत्त केले व शाळेतील मुलांची संख्या वाढविली. त्याच बरोबर मुलांच्या आरोग्यावरही त्यांनी कार्य केले. त्यांनी आपल्या प्रयोगाद्वारे भारतातील ५० लाख मुलांचा शैक्षणिक स्तर सुधारून शाळेतील गळतीचे प्रमाण कमी केले आहे. प्रगत बाजाराचे समर्थन करताना विकसनशील देशांमध्ये लसीकरणाचा वापर वाढविण्यावर भर द्यावा, असे त्यांनी मत मांडले. आरोग्यावर मोठ्या प्रमाणात सवलती दिल्यानंतर त्या देशाचे आरोग्य सुधारते, असे मॉडेल या तिघांनी काही देशांमध्ये राबविले होते.
क्रेमर यांनी अंगभूत कौशल्य विकासासाठी आर्थिक सिद्धांत विकसित केला, जो ‘आर्थिक विकासाचा क्रेमर ओ रिंग सिद्धांत’ या नावाने ओळखला जातो. त्यांनी मागील १० लाख वर्षांत झालेल्या आर्थिक बदलांचा अभ्यास करून त्याची मांडणी आपल्या लोकसंख्या वाढ आणि तांत्रिक बदल : इ. स. पूर्व १ दशलक्ष ते १९९० या पुस्तकात केली. यावरून त्यांनी लोकसंख्या वाढीबरोबर आर्थिक वाढ होत गेल्याचा निष्कर्ष काढला. हत्तीची होणारी शिकार रोखण्यासाठी आफ्रिकेतील काही देशांतील केंद्रीय सरकारांना उपयायोजना करण्यास सांगितले आणि हस्तिदंत साठवण व नोंद करण्याची शिफारस केली.
क्रेमर यांना अमेरिकन कला विज्ञान अकादमी फेलोशिप, मॅक ऑर्थर फेलोशिप आणि प्रेसिडेंशिअल विद्याशाखा फेलोशिप मिळाली. त्यांना जागतिक आर्थिक मंचाकडून ‘जागतिक तरुण नेतृत्व’ असा सन्मान प्राप्त झाला आहे. ते हार्व्हर्ड येथील ‘वर्ल्ड टेक’ या संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष आहेत. त्यांना २०१८ मध्ये बोरिस मिन्ट्स संस्थेने ‘स्ट्रॅटेजिक पॉलिसी सोल्यूशन टू ग्लोबल चालेंजेस’ या पुरस्काराने सन्मानित केले.
क्रेमर हे सध्या हार्वर्ड विद्यापीठामध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत.
संदर्भ :
- economics.uchicago.edu
- www.nobelprize.org.
- www.poverty-action.org.
समीक्षक : अविनाश कुलकर्णी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.