डुफ्लो, एस्थर (Duflo, Esther) : (२५ ऑक्टोंबर १९७२). प्रसिद्ध फ्रेंच-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्रातील नोबेल स्मृतीपुरस्काराचे सहमानकरी. जगातील दारिद्र्य निर्मूलनासाठीच्या प्रायोगिक दृष्टीकोनाबद्दलच्या संशोधनासाठी दुसरे अर्थतज्ज्ञ व त्यांचे पती अभिजित बॅनर्जी आणि प्रा. मायकेल क्रेमर यांच्यासह त्यांना २०१९ चा अर्थशास्त्र विषयाचा नोबेल स्मृतीपुरस्कार देवून गौरविण्यात आले. ‘या तिनही अर्थशास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे अवघ्या दोन दशकामध्ये विकासात्मक अर्थशास्त्राचा चेहरामोहरा बदलून गेला असून त्यामुळे या संशोधनाला वेग आला आहे’, असे नोबेल पुरस्कार देणाऱ्या ‘रॉयल स्विडीश ॲकॅडमी’ने म्हटले आहे. डुफ्लो या नोबेलच्या मानकरी ठरलेल्या दुसऱ्याच महिला व तरुण संशोधक आहेत. पती-पत्नीला एकाच वेळी नोबेल पुरस्काराने सन्मानित केले जाणे, ही नोबेल पुरस्कारासंदर्भातील अतिशय दुर्मिळ घटना मानली जाते.

डुफ्लो यांचा जन्म पॅरिस येथे झाला. त्यांचे इतिहास व अर्थशास्त्र विषयाचे पदवीपर्यंतचे शिक्षण पॅरिसमधील इकोले नॉर्मले सुपिरियर या संस्थेतून झाले (१९९४). पदवीचे शिक्षण घेत असतानाच रशियामधील मॉस्को शहरात मोठ्या बांधकामांचा विनियोग प्रकल्पांचा आकार ठरविण्यासाठी कसा होतो, याचा अभ्यास त्यांनी केला. तत्कालीन अमेरिकन अध्यक्ष बराक ओबामा यांच्या आर्थिक सल्लागार, अर्थमंत्र्याचे सल्लागार म्हणून डुफ्लो यांनी काम केले आहे. तसेच अमेरिकन अर्थतज्ज्ञ प्रा. जेफरे साच्स यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन साहाय्यक म्हणूनही त्यांनी काम केले. या अनुभवातून त्यांना अर्थशास्त्राच्या माध्यमातून जागतिक पातळीवर उपयुक्त व भरीव कामगिरी करावी ही प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी पॅरिस स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स (त्या वेळच्या डेल्टा) या संस्थेतून पदव्यूत्तर शिक्षण पूर्ण केले (१९९५). त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘एमआयटी’मधून अर्थशास्त्र विषयातील डॉक्टरेट ही पदवी मिळवली (१९९९). अभिजित बॅनर्जी व अर्थतज्ज्ञ जोशूया ॲग्रॅस्टि हे त्यांचे मार्गदर्शक होते. ‘एमआयटी’मध्ये त्या अर्थशास्त्राच्या कायमस्वरुपी नियक्ती लाभलेल्या (टेन्यूअर) सहयोगी प्राध्यापक झाल्या. २०१५ मध्ये अभिजित बॅनर्जी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. त्यांना दोन मुले आहेत.

जगातील गरीब लोक कसे पिचले जातात, देशांचे आर्थिक धोरण त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी कसे साहाय्यक ठरू शकते या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी डुफ्लो यांनी सुमारे वीस वर्षे खर्च केली. गरीबांचे आर्थिक जीवनमान उंचावण्यासाठी सामाजिक व आर्थिक धोरणे कशी कारणीभूत होतात, हा त्यांच्या अभ्यासाचा प्रमुख विषय आहे. शिवाय आरोग्य, शिक्षण, विकास या गोष्टी दारिद्र्य निर्मुलनाच्या बाबतीत मोलाची भूमिका बजावत असतात, हे त्यांनी प्रयोगाद्वारे सिध्द केले. केनियातील एच. आय. व्ही. प्रतिबंध, शिक्षकांना दिलेले प्रोत्साहन विद्यार्थ्यांना कसे साहाय्यभूत ठरते हे त्यांनी आभ्यासले. भारतातील आरोग्य, विमा व सूक्ष्मवित्त लस्सीकरणाचा वाढता दर व त्याचे परिणाम यांबाबत विस्तृत लेखन केले. त्यांनी अभ्यासलेल्या देशांमधील लोकांमध्ये एक समान धागा आढळतो. तो म्हणजे सद्यपरिस्थितीतील त्यांचा आवेगपूर्णपणामुळे ते भविष्यात अधिक विवेकी वर्तन करतील.

डुफ्लो यांनी आपले सहकारी अभिजित व क्रेमर यांच्या सहकाकार्याने दारिद्र्य निर्मूलनासाठी यादृच्छित (सर्वसाधारण) नियंत्रित चाचणी (रँडमाईज्ड कंटोल ट्रायल – आरसीटी) ही पद्धत विकसित केली. सदरची पद्धत मोठ्या प्रमाणावर औषध निर्मिती क्षेत्रात नवीन औषधांची चाचणी करण्यासाठी वापरली जाते. त्यामुळे औषधांच्या स्विकृतीसंबंधी जसे निर्णय घेणे शक्य होते, तसे एखाद्या धोरणाची पडताळणी करून गरिबी हटविण्यासाठी ते कितपत यशस्वी ठरू शकेल हे ठरविता येते. भारतातील विकासाच्या अनेक धोरणांना त्या वेडसरपणा (खूळ) असे संबोधतात. दिशाहीन धोरणामुळे अर्थव्यवस्थेला फार लाभ झाला नाही, हे आपल्या मुल्यमापनाच्या आधारे ते स्पष्ट करतात. ग्रामीण भागातील प्रयोगासाठी जास्तीत जास्त लोकांचा समावेश करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यांनी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा २००५’ (महात्मा गांधी नॅशनल सरल एप्लायमेंट गॅरन्टी ॲक्ट २००५) ची उपयुक्तता तपासण्यासाठी ३,००० ग्रामपंचायती व सुमारे ३ कोटी लोकांची पाहणी केली. सध्या हरियाणातील शेकडो मुलांच्या लस्सीकरणाचा कार्यक्रम त्या राबवीत असून त्यासाठी भ्रमणध्वनी (मोबाईल) लस्सीकरणाचा त्यासाठी पुरस्कार करतात. त्यांच्या अभूतपूर्व कार्यामुळे इकॉनॉमिस्ट या प्रसिद्ध नियतकालिकांकडून त्यांना जगातील पहिल्या आठ तरुण अर्थशास्त्रज्ञांमध्ये स्थान देण्यात आले; तर २०१० मध्ये टाइम्स या प्रसिद्ध नियतकालिकांकडून जगातील पहिल्या शंभर प्रतिभाशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला.

डुफ्लो या ‘अब्दुल लतिफ जमील पॉव्हर्टी ॲक्शन लॅब’ या एमआयटीमधील दारिद्र्य निर्मूलन प्रयोगशाळेच्या सहव्यवस्थापक संचालिका आहेत. त्यांना संशोधन कार्यासाठी अनेक पुरस्कार लाभले आहेत.  अमेरिकन इकॉनॉमिक्स असोशियन्सचे चाळीस वर्षांखालील सर्वांत तरुण माहिला अर्थतज्ज्ञ म्हणून इलेनेबेनेट रिसर्च प्राइझ (२००२), बेस्ट यंग फ्रेंच इकॉनॉमिस्ट प्राइझ (२००५), फॉरेन पॉलिसी या अमेरिकन नियतकालीकाकडून जगातील पहिल्या शंभर बुद्धीवान व्यक्तींमध्ये समावेश (२००८), मॅकऑर्थर जिनियस छात्रवृत्ती (फेलोशीप २००९), फॉन यून मॅगेझिन “फॉर्टी अंडर फॉर्टी” सर्वांत प्रभावशाली तरुण व्यक्ती म्हणून नामांकन (२०१०), काल्व्हो अर्मिनगोल इंटरनॅशनल प्राइझ (२०१०), जॉन बेट्स क्लार्क मेडल (२०१०), डॅन डेव्हिड प्राइझ (२०१३), जॉन वोन न्यूमन अवार्ड (२०१३), फ्रेंच ऑडर ऑफ मेरिट अधिकारी पुरस्कार (२०१३), प्रिन्सेस ऑफ अस्तूरियाज अवार्ड (२०१५), अमेरिकन रिव्ह्यूच्या संपादक नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्ससेच्या सदस्या व ब्रिटिश ॲकॅडमीच्या फेलो (छात्र).

डुफ्लो यांनी अभिजित बॅनर्जी यांच्या समवेत २०११ मध्ये लिहलेला पूअर इकॉनॉमिक्स हा ग्रंथ सतरा भाषांमध्ये अनुवादीत झाला असून त्याच्या अनेक आवृत्या प्रसिध्द झाल्या आहेत. तसेच त्यांनी पुढील ग्रंथ लिहिले : एक्सपिअरन्स सायन्स . . . . . . . (२००९), ले डेव्हलपमेंट ह्यूमेन (२०१०), हँडबूक ऑफ फिल्ड एक्सपिरिमेंट्स (२०१७), गुड इकॉनॉमिक्स फॉर हार्ड टाईम्स (२०१९). यांशिवाय त्यांचे कित्येक संशोधनपर शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. २०१७ साली शोधनिबंधासाठी त्यांना ६,२०० प्रशिस्तीप्रत्रे (सायटेशन्स) लाभली.

डुफ्लो मॅसॅच्यूसेट्स इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) येथे सध्या प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.

समीक्षक : संतोष दास्ताने