जुआन, ॲनेट व्हॅन : ( जून १९६९). अमेरिकन ऊर्जानिर्मिती क्षेत्रातील नामांकित अभियंता. लाटांपासून ऊर्जानिर्मिती करणे या झपाट्याने विस्तारणाऱ्या क्षेत्रातील त्या अग्रणी तज्ञमार्गदर्शक आहेत.
जुआन यांचा जन्म एका लष्करीतळावर झाल्याने त्यांच्या जन्मतारीखेबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांना लहानपणापासूनच पोहायला, समुद्रजवळ सर्फिंग करायला आवडत असे. इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विथ मॅथ मायनर, साउर्थन इलिनॉय येथून विद्युत अभियांत्रिकीत बी.एस. (१९९०) पदवी, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग/पॉवर सिस्टीम, साउर्थन इलिनॉय येथून एम.एस (१९९२) पदव्युत्तर पदवी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग/पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, टेक्सास ए. अँड एम. विद्यापीठातून पीएच.डी. (१९९५) पदवी संपादन केल्यात. त्याचा संशोधनाचा विषय ‘ऊर्जानिर्मितीचे नवे मार्ग’ असता होता. त्यानंतर त्या ऑरेगन विद्यापीठात साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करू लागल्या.
जुआन सर्फिंग करताना लाटांचा ऊर्जा उत्पादनासाठी उपयोग करून घेता येईल, असा विचार सूचला. लाटा दिवसरात्र उसळत असतात. त्यापासून ऊर्जा या क्षेत्रात अधिकाधिक प्रगती व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. लाटांची ऊर्जा अमाप असली तरी त्या बऱ्याच वेळा विनाशकारी ठरतात. या ऊर्जेचा उपयोग करणे वाटते तितके सोपे नाही. लाटांपासून ऊर्जा मिळवणारी यंत्रणा ही सागरी वादळे, रौद्र लाटा, भूकंपजन्य त्सुनामी लाटा यांना तोंड देणारी तर हवीच परंतु सागरी पाण्यातील क्षरणाला तोंड देण्यास समर्थ असलेलीही असणे आवश्यक असते. या सगळ्या अडचणी दूर करायच्या तर खर्च खूप वाढतो. जर ही उर्जा कमी खर्चात निर्माण करणे शक्य झाले तर प्रदूषणमुक्त ऊर्जेचा कायमस्वरूपी स्रोत उपलब्ध होण्यास मदत होईल. त्यामुळेच लाटांपासून ऊर्जा मिळवण्याचे प्रयत्न आता लाटांपासून स्वस्त ऊर्जा निर्मितीच्या प्रयत्नांकडे वळले आहेत. जुआन यांचे संशोधन या क्षेत्रातील पथदर्शक मानले जाते. बऱ्याच देशांमध्ये लाटांपासून ऊर्जा निर्मितीचे प्रयत्न चालू आहेत. अभियंत्यांनी लाटा ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रुपांतर करणारे छोटेखानी प्रकल्पही उभे केले आहेत. कॅलिफोर्नियातील पालो आल्टो येथे ऊर्जा प्रश्नांवर विचार करून त्यातील अडचणी दूर करण्यासह, निर्मितीचे मार्ग इत्यादी बाबींवर उपाय सूचविणारी तज्ञ-समिती कार्यरत आहे.
जुआन यांना प्रत्येक उपकरण कसे काम करते ते जाणून घेणे आवडत असे. ही त्यांची चौकस बुद्धी त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यात खूप कामाला आली. त्यांनी ऑरेगन विद्यापीठातील इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे प्राध्यापक ॲलन वॅलेस यांच्यासह ‘लाटांपासून ऊर्जानिर्मिती’ करणाऱ्या यंत्रणांचा आणि मान्यता मिळविलेल्या एकस्वांचा (पेटंटांचा) अभ्यास केला. याद्वारे त्यांनी आकाराने सुटसुटीत आणि सोपी संरचना असलेली यंत्रणा निर्माण केली.
जुआन यांची प्रयोगशाळा ‘वॅलेस एनर्जी सिस्टीम अँड रिन्यूएबल फॅसिलिटी अर्थात ‘वुइसर्फ’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्यांच्या संस्थेत ऊर्जानिर्मितीच्या अनेक प्रश्नांवर चर्चा होते. त्यांनी ‘लाटा उर्जेच्या’ संशोधनात फक्त दोन घटक असलेली यंत्रणा निर्माण केली. त्यातला एक भाग सागरतळी घट्ट बसवला जातो. त्याच्या आत तांब्याची तार गुंडाळलेले एक वेटोळे असते. त्याच्या शेजारी एक शक्तिमान लोहचुंबक असतो. तो त्या वेटोळ्याभोवती गुंडाळलेल्या एका तरंगत्या रबरी तबकडीत बसवलेला असतो. लाटांबरोबर ही तबकडी वर-खाली होते. त्यामुळे चुंबकाच्या हालचालीबरोबर तांब्याच्या तारांमध्ये वीज निर्माण होते. ती वीज वाहून नंतर किनाऱ्यांवर पोहोचवली जाते. या यंत्रणेच्या प्राथमिक प्रारूपाच्या चाचण्या त्यांनी आपल्या घराजवळच्या सार्वजनिक तरण तलावात केल्या. ही प्राथमिक यंत्रणा अगदीच छोटेखानी होती. एखाद्या मोठ्या शहरातला तरण तलाव किती मोठा असणार यालाही काही मर्यादा असतात. त्याची तुलना समुद्राशी आणि त्यातल्या पाण्याच्या खळबळीशी व सागरी लाटांशी होऊच शकणार नाही. त्यामुळे सागरातल्या चाचणीसाठी निर्माण करायच्या यंत्रणेला आवश्यक तेवढा बळकटपणा आणि त्या यंत्रणेचा आकार याबद्दल नव्याने विचार करणे आवश्यक ठरले. या यंत्रणेत सुधारणा करताना बरीच काळजी घ्यावी लागली. ही यंत्रणा इतर यंत्रणेपेक्षा अधिक कार्यक्षम आणि सुटसुटीत बनली.
सध्या त्या अमेरिकेच्या बेलर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत.
कळीचे शब्द : #ऊर्जानिर्मिती #लाटांपासून #विद्युतनिमिती
संदर्भ :
- Rusch, Elizabeth, Catching a Wave, Powering an Electrical Grid?, sithsonian magazine, july 2009.
समीक्षक : अ. पां. देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.