मोग्गल्लान  व्याकरणकार   (मोग्गल्लान/मोग्गलान/मोग्गलायन–moggallāna/moggalāna/mogga-lāyana)

पाली भाषेचे श्रीलंकेतील प्रसिद्ध व्याकरणकार व ‘मोग्गल्लान व्याकरण’ या ग्रंथाचे कर्ते. श्रीलंकेतील उदुम्बरगिरीच्या महाकस्सप्पांचे शिष्य आणि अनुराधपुरातील थूपाराम विहाराचे अधिपती. तिपिटक (त्रिपिटक) साहित्याबरोबरच पाली व्याकरण आणि संस्कृत व्याकरणाचे अभ्यासक म्हणून ओळखले जातात. पाली व्याकरणाचे ज्ञान, तिपिटकाचा  अभ्यास, धम्माचा निरंतर सराव आणि पराकाष्ठा या गुणांमुळे सारिपुत्तांनंतर ते ‘संघराज’ पदावर विराजमान झाले. इ.स. ११६५ मध्ये राजा परक्क्मभुज (पराक्रमबाहू:११५३-११८६)- प्रथम  यांनी श्रीलंकेतील महाविहार, अभयगिरी विहार आणि जेतवन विहार या तीन संघाचे एकत्रिकरण करून पाली साहित्याभ्यासाला चालना दिली. आपली स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी, या उद्देशाने सिंहल संघाकडून टीका, अनुटीका या ग्रंथांचे लेखन करण्यात आले. त्यापैकी मोग्गल्लान थेरांनी  ‘मागधसद्दलक्खण’  नावाचा पाली व्याकरणग्रंथ लिहीला, जो पुढे ‘मोग्गल्लान-व्याकरण’ म्हणून सुप्रसिद्ध झाला. मोग्गल्लान थेरांनी पाली वर्णमालेत ऱ्हस्व ‘ए’ आणि ऱ्हस्व ‘ओ’ या दोन स्वरांचा अंतर्भाव करून वर्णसंख्या ४१ वरून ४३ निश्चित केली. ६ प्रकरणे  आणि ८१०  सूत्रांमध्ये संक्षिप्त सूत्रशैली ,  विषयांची सुसंगत व स्पष्ट मांडणी , पाली आणि संस्कृत दोन्ही व्याकरणांचा आधार , पारिभाषिक संज्ञांचा आणि अनुवुत्तीचा (अनुवृत्ती ) योग्य वापर, ही मोग्गल्लान व्याकरणाची वैशिष्ट्ये  आहेत. मोग्गल्लान थेरांनी व्याकरण ग्रंथाबरोबरच  ग्रंथातील सूत्रांचे स्पष्टीकरण करणारी ‘वुत्ति’  आणि ‘वुत्ति’चे स्पष्टीकरण करणारी ‘वुत्तिविवरणपञ्चिका’ या ग्रंथाचे लेखन केले आहे  मोग्गल्लान व्याकरण हे पालीचे प्रमाणित , सुसंगत आणि तांत्रिकदृष्ट्या अधिक योग्य व्याकरण समजले जाते.त्यावर आधारित पाली व्याकरण ग्रंथ आणि त्यावरील भाष्यग्रंथ अशी परंपरा श्रीलंकेत बाराव्या ते पंधराव्या शतकात निर्माण झाली.

मोग्गल्लान व्याकरणावर आधारित खालील व्याकरणग्रंथ व त्यावरील भाष्यग्रंथ :

१.पदसाधन – पियदस्सी (बारावे शतक); २.मोग्गल्लान पञ्चिका टीका/सम्बन्धचिन्ता   -सङ्घरक्खित (बारावे ते तेरावे शतक); ३.पयोगसिद्धी – मेधङ्कर (बारावे ते तेरावे शतक); ४.पदसाधनसन्नय – वनरतन आनंद (तेरावे शतक); ५.सम्बन्धचिन्ता सन्नय – गोतम महासामी (तेरावे शतक); ६.मोग्गल्लान पञ्चिका पदीपय – श्री राहुल (पंधरावे शतक).

संदर्भ :

  • उपाध्याय, डॉ. भरतसिंह,  ‘प्रयाग हिन्दी साहित्य सम्मेलन, पाली साहित्य का इतिहास,’ २०१३.
  • गॉरनल, ऍलेस्टर, रिरायटींग बुद्घिझमः पालि लिटरेचर ऍंड मोनॅस्टीक रिफॉर्म इन श्रीलंका, ११५७-१२७०. युनायटेड किंगडम, युसीएल प्रेसः २०२०.
  • देवकर, महेश, अ टेक्नीकल टर्मस्  ऍंड टेकनीक ऑफ पालि ऍंड द संस्कृत ग्रामर्स.  भारतः सेंट्रल इनस्टिट्युट ऑफ हायर तिबेटीयन स्टडीज, २००८.
  • मलालसेकर, जे.पी. ‘द पालि लिटरेचर ऑफ सिलोन. श्रीलंकाः बुद्धिस्ट पब्लिकेशन सोसायटी, कॅंन्डी १९९४.

समीक्षक : विनोद भेले


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.