अट्ठसालिनी ही अभिधम्मपिटकातील धम्मसङ्गणिची अधिकृत अट्ठकथा (अर्थकथा / टीका अथवा विस्तृत कथा) म्हणून मानली जाते. धम्मसङ्गणि हा अभिधम्मातील मूलभूत तात्त्विक ग्रंथ असून त्यात चेतासिका,रूप,निब्बाण तसेच क्रमवार मांडलेल्या मातिका (Matrix) यांचे सूक्ष्म वर्गीकरण आहे. अट्ठसालिनीमध्ये या सर्व संकल्पनांचे अर्थ,विश्लेषण,व्याख्या आणि स्पष्टीकरण तसेच विश्लेषण अत्यंत तपशीलाने केलेले आहे. धम्मसङ्गणि हा ग्रंथ समजून घेण्यासाठी अट्ठसालिनी हा ग्रंथ महत्त्वाचा आहे.

भदन्त आचार्य बुद्धघोष हे अट्ठसालिनीचे अट्ठकथाकार मानले जातात. धम्मसङ्गणि या ग्रंथाचा रचनाकाळ हा इ.स. ५ वे शतक मानला जातो. अट्ठसालिनीमध्ये अभिधम्माच्या तत्वानुसार चित्त,चेतसिका,रूप आणि निब्बाण अशा प्रमुख घटकांचे वर्णन केवळ संकल्पनात्मक न राहता विविध संदर्भ,परिभाषा,उदाहरणे आणि तात्त्विक पार्श्वभूमीसहित विस्तारित केलेले दिसते.या प्रक्रियेत ऐतिहासिक, भौगोलिक आणि धार्मिक माहितीही जोडलेली आहे.

अट्ठसालिनीच्या रचनाकाल आणि मूळ स्वरूपाविषयीचे मतभेद :

अट्ठसालिनीच्या रचनाकाळाबदल विद्वानांमध्ये मतभेद आहेत.बुद्धघोषांनी त्यांचे आचार्य रेवत थेरांच्या आदेशानुसार प्रथम  ञाणोदय नामक ग्रंथाची निर्मिती केली होती.त्यानंतर त्यांनी लंकेत जाऊन परित्त (परित्राणाचे) आणि अट्ठकथा (अर्थकथा) साहित्याचा अभ्यास केला, असे काही मतप्रवाह सांगतात.त्यामुळे अट्ठसालिनीची मूळ संकल्पना भारतात निर्माण झाली,परंतु तिचे विस्तारित आणि अंतिम रूप लंकेत आकाराला आले, असे मानले जाते. श्रीलंका इंटरनॅशनल बुद्धिस्ट अकादमीचे अभ्यासक एस. विजिथा कुमारा यांच्यामते अट्ठसालिनीमध्ये नंतर काही भिक्खूंनी काही भागांची वाढ किंवा पूरक सामग्री जोडली असावी. वट्टगामिनीअभय राजाच्या काळात लंकेतील भिक्खूंनी भारतात येऊन बुद्धघोषांना लंकेतील साहित्य, तत्वज्ञान व भौगोलिक कारणांची माहिती दिली असावी. यागरल पञ्ञानन्द त्थेर यांच्यामते अट्ठसालिनीची रचना लंकेतच झाली; कारण या ग्रंथात बहुतेक ठिकाणी लंकेतील संघांची नावे व स्थानिक संदर्भ आढळतात. अट्ठसालिनीचे प्रारंभिक स्वरूप ‘महापच्चरि’ अथवा ‘महापच्चरिय’ म्हणून प्रसिद्ध होते. पाली टीका साहित्याचे अभ्यासक प्रा.एन्डो यांच्या मते लंकेतील अट्ठसालिनीच्या आवृतीत इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात मोठ्या प्रमाणात संपादन आणि पुनर्रचना झालेली आहे.

अट्ठसालिनीची रचना :

अट्ठसालिनी सहा प्रमुख विभागांत विभाजित आहे .

  • निदान कथा : संपूर्ण ग्रंथाची भूमिका व आरंभीची माहिती.
  • मातिकावण्णना: धम्मसङ्गणिच्या मातिकांचे (MATRIX) विशद विवेचन.
  • चितुप्पक्खन्धवण्णना: कुसलधम्म, अकुसलधम्म तसेच ब्याक्तधम्म व अब्याक्तधम्म अशा चित्तवर्गांचे विश्लेषण.
  • रूपक्खन्धवण्णना: रूप धर्मस्कंधांचे संपादित वर्गीकरण.
  • निक्खेपक्खन्धवण्णना: धर्मास्कन्धांचे विभाजन व अर्थस्पष्टीकरण.
  • अट्ठकथाक्खन्धवण्णना: सर्व घटकांचे सविस्तर अर्थवर्णन; ५२ चेतसिकांचे विश्लेषण दिले आहे .

अट्ठसालिनी विशेषतः मानवी मनाच्या सूक्ष्म अवस्थांचे वर्णन करताना प्रगल्भ वैज्ञानिक वृत्तीचे दर्शन घडवले आहे.पीती (प्रीती) कशी उद्भवते , तिचा विषयाधिष्ठानाशी कसा संबंध असतो, याचे सूक्ष्म निरीक्षण येथे दिसते.दस पारमिता, झान (ध्यान) , पञ्चदीट्ठी आणि ध्यानातील व्यावहारिक अडथळे यांचे वर्णन अट्ठसालिनीचे महत्त्व वाढवते.

 अनुटीका आणि पुढील परंपरा :

  •   मणिरत्न थेरा १७ व्या शतकात बर्मी भाषेत भाषांतर केले.
  •  श्रीलंकेतील आनन्द थेर यांनी “लीनत्थजोतका” व “लीनत्थपकासिनी” या नावाने अनुटिका लिहिल्या.
  •  ञाणकित्ति थेर यांनी चान्ग माई मध्ये अट्ठसालिनी-अट्ठयोजना इसवी सन १४८५ ते १५०० मध्ये हे प्रकरण लिहिले गेले.

या सर्व अनुटीका अट्ठसालिनीच्या व्यापक अभ्यासाची चालू राहिलेली परंपरा स्पष्ट करतात.

संदर्भ :

  • Bapat ,V. & Vadekar ,R.D., Atthasalini, By First Edition 1942, Bhandarkar Oriental Series No.3.
  • S. Vijitha Kumara,A Brief Introduction to the Date and The Authorship of The Atthasalini. (Part1) Sri-Lanka International Buddhist Academy, Pallekele-Kundasale.
  • त्रिपाठी प्रा.रामशंकर अट्ठसालिनी नाम धम्मसङ्गहट्ठकथा, (सम्पूर्णानन्द संस्कृत विश्वविद्यालय-१९८९ ).
  • डॉ. भरतसिंह उपाध्यायपालि-साहित्य का इतिहास, हिन्दी साहित्य सम्मेलन.प्रयाग, सातवा संस्करण, २०१३.

समीक्षक : जाई परांजपे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.