चार्वाकदर्शन : एक प्राचीन भारतीय दर्शन. म्हणजे विश्व व मानव यांसंबंधीचे तत्त्वज्ञान. हे दर्शन हा भौतिकवाद आहे. देहाहून वेगळा आत्मा नाही; ईश्वर वा देव, भूत, पिशाच, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म इ. सर्व काल्पनिक व असत्य आहे; पृथ्वी, जल, तेज व वायू ही चार भूतद्रव्येच आहेत व त्यांचेच शरीर बनते व त्यात चैतन्य वा जाणीव हा गुण उत्पन्न होतो. मन वा आत्मा देहाहून वेगळा नाही; अर्थ व काम हीच मानवी उद्दिष्टे होत; राजकीय सत्ता आवश्यक आहे; ‘प्रत्यक्ष’ हेच ज्ञानाचे मुख्य साधन आहे, असे या तत्त्वज्ञानाचे थोडक्यात तात्पर्य आहे. हे दर्शन प्रथम बृहस्पतीने व चार्वाक या आचार्याने मांडले असे म्हणतात. जयराशीभट्टाचा तत्त्वोपप्लवसिंह हा ग्रंथ सोडला, तर ही विचारप्रणाली विशद करणारा, स्वतः एखाद्या लोकायतपंथीयानेच लिहिलेला, एकही सूत्रग्रंथ किंवा टीकाभाष्यग्रंथ वगैरे उपलब्ध नाही. लोकायतिकांवर टीका करण्यासाठी व त्यांची विधाने खोडून काढण्यासाठी इतर भारतीय दर्शनकार पूर्वपक्ष म्हणून त्या दर्शनासंबंधी जे सांगतात ते, आणि सर्वदर्शनसंग्रह ह्यांसारख्या संकलनात्मक ग्रंथांतून ह्या दर्शनावर जी प्रकरणे येतात ती, एवढ्यावरूनच लोकायत किंवा चार्वाकदर्शनाची विचारसरणी काय होती, हे समजून घ्यावे लागते.

इ.स.पू. सातव्या-सहाव्या शतकांपासून, तर इ.स.च्या चौदाव्या-पंधराव्या शतकापर्यंतच्या संस्कृत, पाली आणि अर्धमागधी भाषांतील साहित्यातून जे मिळते, त्यावरून लोकायतिकांची ज्ञानमीमांसेची स्वतंत्र अशी एक पद्धती होती; त्यांचे स्वतःचे एक प्रमाणशास्त्र होते आणि त्यास अनुसरूनच ते विश्वव्यापारासंबंधी व मानवी जीवनासंबंधी इतर सर्व दार्शनिकांहून वेगळे असे काही सांगत होते, असे दिसून येते. अन्य दार्शनिकांनी मानलेल्या प्रत्यक्ष, अनुमान, उपमान व शब्द ह्या चार प्रमाणांपैकी लोकयतिकांना फक्त प्रत्यक्ष हेच प्रमाण पूर्णतया मान्य असे. ह्याखेरीज प्रत्यक्षनिष्ठ आणि अनुभवजन्य अशा तऱ्हेची अनुमाने मानायला लोकायतिकांची हरकत नव्हती. शब्द किंवा आप्तवाक्य हे ज्ञानसाधन नव्हे. वेद, पुराणे, जैनांचे आगम  किंवा बौद्धांचे त्रिपिटक ग्रंथ अशा कोणत्याही ग्रंथाच्या प्रामाण्याला ते प्रखर विरोध करीत.

प्रत्यक्षपणे आणि अनुभवजन्य अनुमानाने जे समजते, तेवढ्यावरून विश्वव्यापारासंबंधी ते असे म्हणत, की ईश्वर नावाचा विश्वाचा कोणी निर्माता आणि नियंता मानण्याचे कारण नाही. बौद्ध आणि जैनही निरीश्वरवादी असले, तरी ते सर्वव्यापी आणि त्रिकालाबाधित असा कर्मसिद्धान्त व जन्ममरणपरंपरा मानतात. लोकायतिकांना ईश्वराप्रमाणे कर्मसिद्धान्त व जन्ममरणपरंपरा ह्याही गोष्टी मंजूर नव्हत्या. कर्म आणि त्यांचे फल मानल्यामुळे पुनर्जन्म, स्वर्ग, नरक वगैरे अनेक गोष्टी ब्राह्मणांप्रमाणेच बौद्ध आणि जैन ह्यांच्याही विचारसृष्टीत शिल्लक राहतात. त्याचप्रमाणे वैदिक दर्शनांतून येणारा देहाव्यतिरिक्त असलेला असा काही आत्मा जैन आणि बौद्धांनाही मानावा लागतो. वैदिक दर्शनांप्रमाणेच जैन आणि बौद्ध ह्या अवैदिक दर्शनांतही मोक्षावस्थेवर आणि मोक्ष ह्या परमपुरुषार्थावर विश्वास आहे. लोकायतिकांच्या तत्त्वज्ञानात ईश्वर नाही, कर्मफल नाही, आत्मा नाही, मोक्ष नाही आणि परलोक किंवा पुनर्जन्मही येत नाही. त्यांच्या मते हे विश्व भूतात्मक आहे. पृथ्वी, जल, तेज आणि वायू ही चार भूते होत. जीवचैतन्यसुद्धा भूतांपासूनच होते. ते कसे होत असेल, ह्याविषयी तर्क करताना ती एक मद्यार्कनिर्मितीसारखी रासायनिक प्रक्रिया असली पाहिजे आणि विशिष्ट भूसंयोगाने जीवचैतन्य निर्माण होत असले पाहिजे, असे ते म्हणतात. त्यांच्या मते उत्पत्ती, स्थिती, लय हे सगळे स्वभावात्मक आहे. विश्वव्यवहाराचे स्पष्टीकरण करण्यासाठी ईश्वर गृहीत धरण्याचे काहीच कारण नाही.

लोकायतिकांच्या मते ईश्वर, कर्मफल आणि देहाव्यतिरिक्त आत्मा ह्यांपैकी काहीच अस्तित्वात नसल्यामुळे कर्मकांडात्मक धर्म पूर्णपणे अनावश्यक ठरतो. त्यांच्या मते असला सगळा धर्म म्हणजे धूर्तांचे कारस्थान असून त्याला मूर्ख लोक बळी पडत असतात. सर्वदर्शनसंग्रहात म्हटल्याप्रमाणे चार्वाकांच्या मते बहुजनांच्या हितासाठी, त्यांच्या मताचा आश्रय घेऊन लोकांना कर्मकांडांत्मक धर्मातून सोडविणे आवश्यक आहे. जगात दु:खे आहेत, हे लोकायतिकांनाही दिसते; पण म्हणून जीवनाकडे पाठ फिरवावी, जपतपाच्या मार्गाला लागावे किंवा संन्यास घ्यावा हे त्यांना मान्य नाही. काटे बाजूला करून मासा खावा लागतो; त्याप्रमाणे दुःखे टाकून व त्यांवर मात करून सुखोपभोग घ्यावा, असे ते प्रतिपादित. सुखी जीवन जगण्यासाठी शेती, व्यापार, सरकारी नोकरी वगैरे उपायांनी धनार्जन करावे. मात्र अग्निहोत्र, भस्मधारण ही बुद्धी आणि पराक्रम नसलेल्यांच्या जीवनाची साधने आहेत, हे ध्यानी घ्यावे.

लोकायतिकांनी विश्वव्यापारासंबंधीचे व वैयक्तिक जीवनासंबंधीचे आपले तत्त्वज्ञान प्रतिपादन करीत असतानाच काही महत्त्वाचे सामाजिक विचारही सांगितलेले आहेत. ईश्वर आणि धर्म न मानणारे चार्वाकपंथीय राजसत्ता मानायला तयार होते. कारण त्यांच्या मते शासन ही समाजधारणेसाठी आवश्यक अशी गोष्टी होती. लोकायतिक वर्णभेद आणि जातिभेद अशास्त्रीय आणि कृत्रिम आहेत, असे मानीत. लोकायतिक स्त्रीस्वातंत्र्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. इतस्ततः विखुरलेल्या काही उल्लेखांवरून जे दिसते, त्यावरून चार्वाक किंवा लोकायत हे सामाजिक समतेसाठी आणि सामाजिक न्यायासाठी झगडण्यास सिद्ध होते.

वरील सर्व तत्त्वज्ञान कोणा एका विचारवंताने एकाच वेळी सांगितले, असे नव्हे. अगदी वेदकालापासून अशा प्रकारची विचारसरणी कमी-अधिक प्रमाणात सांगितली जात होती. देवतांच्या अस्तित्वाविषयी शंका व्यक्त केल्या जात होत्या. यज्ञाचे फळ निश्चित मिळते काय, ह्याविषयीही काही ऋषी साशंक असत; तथापि वेदोपनिषदादी प्राचीन ग्रंथांतून असे बंडखोर विचार क्वचित डोकावत असले, तरी जीवजगताचे पूर्णतया भौतिक असे स्पष्टीकरण आणि प्रत्यक्षनिष्ठ तर्कशास्त्रावर आधारलेले लोकायतशास्त्र असे इ.स.पू. सहाव्या शतकातच सांगितले गेले. ते सांगणारा अजित केशकंबली नावाचा तत्त्वज्ञ आणि त्याचे विचार ह्यांची दखल बौद्ध ग्रंथांतून घेतलेली आहे. बुद्धकाली सुस्थापित झालेल्या ह्या दर्शनाचे प्रथम नामकरण ‘लोकायत’ असेच दिसते. कौटिलीय अर्थशास्त्रात लोकायतदर्शन ही आन्वीक्षिकी आहे, असे म्हटले आहे. ‘बार्हस्पत्य’ आणि ‘लोकायत’ हे शब्द अगदी समानार्थक असे वापरलेले दिसतात, ते इ.स.पू.च्या आठव्या-सातव्या शतकांपासूनच. ह्याच काळात चार्वाक शब्दही वापरलेला दिसतो. महाभारतातील चार्वाक राक्षस सोडला, तर नास्तिक दर्शनकार ह्या अर्थाने चार्वाक अशी शब्दयोजना इ.स.च्या सातव्या शतकापूर्वी अजिबात झालेली नाही. उपर्युक्त सामाजिक स्वरूपाचे विचार इ.स.च्या सहाव्या शतकापासून चोदाव्या शतकापर्यंतच्या साहित्यातून अनेक ठिकाणी उल्लेखिलेले आहेत. मूळ वैचारिक बैठक एक असली, तरी तपशीलांतील मतभेदांमुळे चार्वाकांतही उपपंथ पडले असावेत, असे आठव्या शतकातील जयंताच्या न्यायमंजरीतील सुशिक्षित चार्वाकांच्या वेगळ्या स्पष्ट निर्देशावरून वाटते.

प्राचीन साहित्यात लोकायतिक किंवा चार्वाक पंथीय म्हणून अनेक व्यक्तिनामांचे निर्देश होतात. ही सर्वच नावे खऱ्याखुऱ्या ऐतिहासिक व्यक्तींची असतील, असे नाही. उपनिषदांतील विरोचन किंवा बोद्ध आणि जैन वाङ्‌मयातील प्रदेशी किंवा कुरुचंद्र वगैरे अनेक नावे ही वाङ्‌मयीन पात्रे असावीत, असे वाटते. तथापि पाली साहित्यात उल्लेखिलेला अजित केशकंबली, पतंजलीला माहीत असलेला भागुरी आणि कमलशीलाने उल्लेखिलेला पुरंदर तसेच तत्त्वोपप्लवसिंहाचा कर्ता जयराशीभट्ट ही माणसे काल्पनिक मानण्याचे काहीच कारण नाही. ज्याच्या नावाने हे दर्शन पुढील काळात फार प्रसिद्ध झाले तो चार्वाक हाही एक ऐतिहासिक पुरुष असला पाहिजे, असे समजण्यास सबळ पुरावा आहे. ह्या दर्शनाचे मूळ लोकायत हे नाव जवळजवळ नाहीसे होऊन चार्वाकदर्शक म्हणूनच ते विख्यात झाले, ह्यावरून चार्वाकाने ह्या दर्शनाची अत्यंत व्यव्स्थित अशी फेरमांडणी करून त्याचा हीरीरीने प्रचार केला असला पाहिजे, हे स्पष्ट होते.

एका कोरीव लेखात आलेले लोकायतनगर हे स्थलनामही विचारात घेण्यासारखे आहे. ह्या ठिकाणी लोकायतिकांची एखादी संघटना किंवा शिक्षणसंस्था असावी. काही शिलालेखांतूनही लोकायतिकांचे उल्लेख आहेत.

प्राचीन काळी भारतात जी निरनिराळी तत्त्वज्ञाने सांगितली गेली, त्यांत चार्वाकदर्शनाचे स्थान एकमेवाद्वितीय आहे. बुद्धिवादासाठी, विचारस्वातंत्र्यासाठी उभारलेले ते एक बंड होते. परमेश्वर, स्वर्ग, नरक वगैरे कल्पनांनी बुद्धी विचलित होऊ न देता जीवनाचे सौंदर्य भोगण्याचे ते आवाहनच होते. अंधश्रद्धा आणि दांभिकता ह्यांविरुद्धचा तो एक लढा होता. संघटित प्रयत्नांच्या अभावी, लोकायतवादी हे जीवनाला योग्य वळण देण्यात व्हावेत तेवढे यशस्वी झाले नाहीत. तरीही भारताच्या वैचारिक इतिहासातील लोकायतदर्शनाचे वेगळे स्थान आणि त्याची वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी नाकरता येणार नाही. लोकायतिक हे स्वत: आग्रहाने बुद्धिप्रामाण्यवाद सांगत राहिले आणि  लोकायतिकांच्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी वैदिक, बौद्ध, जैन ह्या पंथांतील इतर सर्वच दार्शनिकांना कमी-अधिक प्रमाणात बुद्धिवादी होण्यावाचून गत्यंतर उरले नव्हते. म्हणूनच भारताच्या सामाजिक जीवनावर ह्या दर्शनाचा प्रभाव पडला असो वा नसो; परंतु ज्ञानमीमांसेच्या विकासाच्या दृष्टीने त्याने केलेली कामगिरी बहुमोल मानवीच लागेल.

संदर्भ :

  • Chattopadhyaya, Debiprasad, Lokayata : A Study in Ancient Indian Materiallism, Delhi, 1959.
  • Radhakrishnan, S. History of Philosophy-Eastern and  Western, London, 1952.
  • आठवले, सदाशिव, चार्वाक : इतिहास आणि तत्त्वज्ञान, वाई, १९८०.
  • कुमठेकर, उदय, संपा. चार्वाकमंथन, पुणे, २००१.
  • गाडगीळ, स. रा. लोकायत, मुंबई, १९७४.
  • गोखले, प्रदीप, तत्त्वचिंतक चार्वाक, पुणे, २०१३.
  • झा, आचार्य आनंद, चार्वाकदर्शन, लखनऊ, २०१३.
  • पाठक, सर्वानंद, चार्वाकदर्शन की शास्त्रीय समीक्षा, वाराणसी, १९६५.
  • साळुंखे, आ. ह. चार्वाकदर्शन, मुंबई १९८७.
  • https://iep.utm.edu/indmat/