जर्मानिक भाषांच्या ध्वनिपरिवर्तनाचा नियम. ‘ग्रिमचा नियम’ हा जर्मानिक भाषांमधील विशिष्ट ध्वनिबदलांविषयीचा ऐतिहासिक भाषाविज्ञानातील एक नियम आहे. याकोप ग्रिम या भाषातज्ज्ञाने इ.स. १८१९ मध्ये आपल्या ‘दॉयचं ग्रामाटिक’ (Deutsche Grammatik) पुस्तकात या नियमाची मांडणी केली. त्यामुळे यास ‘ग्रिमचा नियम’ असे म्हटले जाते. खरेतर, ग्रिमच्या आधी रास्मुस क्रिस्ट्यान रास्क या डॅनिश भाषातज्ज्ञाने १८१४ मध्ये उदाहरणांच्या साहाय्याने हा नियम मांडला होता, पण ग्रिमच्या सविस्तर मांडणीनंतर हा नियम जास्त प्रकाशात आला. या नियमाला ‘प्रथम जर्मानिक साउंड शिफ्ट’ असेही म्हटले जाते. ग्रिमच्या नियमातून हे स्पष्ट होते की, भाषांमधील बदल हे यादृच्छिक नसून ते एका विशिष्ट आणि निश्चित पद्धतीनुसार होतात.
हा नियम ‘प्रोटो-इंडो-यूरोपियन’ (PIE) भाषेतील व्यंजन ध्वनी ‘प्रोटो-जर्मानिक’ भाषेत (जिच्यापासून पुढे इंग्रजी, जर्मन, डच इ. भाषा तयार झाल्या) रूपांतरित झाले, तेव्हा त्यांच्यात झालेल्या बदलांचे वर्णन करतो. हे बदल तीन टप्प्यांत विभागले जातात.
पहिल्या टप्प्यात ‘प्रोटो इंडो-यूरोपियन’ भाषेतील अघोष स्पर्श व्यंजने ही जर्मानिक भाषांमध्ये अघोष घर्षक व्यंजने झालेली दिसतात. यात /p/ > /f/, /t/ > /θ/ आणि /k/ > /x/ अथवा /h/ हे बदल दिसून येतात.
(१) /p/ > /f/
लॅटिन, संस्कृत, ग्रीक या भाषांमध्ये अनेक शब्दांमध्ये जिथे /p/ हे व्यंजन येते, तिथेच इंग्रजीसारख्या भाषांमध्ये /f/ हे व्यंजन येते. उदा. – लॅटिनमधील पातेर /pa.ter/, संस्कृतमध्ये पितृ /pi.t̪r/ व इंग्रजीमध्ये फादर /’fɑː.ðər/.
(२) /t/ > /θ/
उदा. – लॅटिन ट्रेस /treːs/ शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीत थ्री /θriː/ मध्ये /θ/ असा बदल दिसतो.
(३) /k/ > /x/ अथवा /h/
उदा. – लॅटिन कानीस /’ka.nis/ शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीत हाउंड /haʊnd/ मध्ये /h/ असा बदल होतो.
दुसऱ्या टप्प्यात ‘प्रोटो इंडो-यूरोपियन’ भाषेतील सघोष स्पर्श व्यंजने ही जर्मानिक भाषांमध्ये अघोष झालेली दिसतात. यात /b/ > /p/, /d/ > /t/ आणि /ɡ/ > /k/ हे बदल दिसून येतात.
(४) /b/ > /p/
उदा. – लॅटिन लाबिउम /’la.bi.um/ शब्दातील /b/ व्यंजनाच्या जागी इंग्रजीतील लिप /lɪp/ या शब्दात /p/ असा बदल झालेला दिसतो.
(५) /d/ > /t/
उदा. – लॅटिन डेकेम /’de.kem/ शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीतील टेन /ten/ या शब्दात /t/ असा बदल होतो.
(६) /ɡ/ > /k/
उदा. – लॅटिन गेलू /’ɡe.lu/ शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीतील कोल्ड /koʊld/मध्ये /k/ असा बदल होतो.
तिसऱ्या टप्प्यात ‘प्रोटो इंडो-यूरोपियन’ भाषेतील सघोष महाप्राण व्यंजने ही जर्मानिक भाषांमध्ये महाप्राण गमावून सघोष अल्पप्राण स्पर्श व्यंजने झालेली दिसतात. यात/bʰ/ > /b/, /dʰ/ > /d/आणि /ɡʰ/ > /ɡ/ हे बदल दिसून येतात.
(७) /bʰ/ > /b/
उदा. – संस्कृत भ्रातृ /bʰraːt̪r̩/ शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीत ब्रदर /’brʌ.ðər/ हा होणारा बदल.
(८) /dʰ/ > /d/
उदा. – संस्कृत मधु /mə.dʰu/ शब्दातील अंत्य व्यंजनात इंग्रजीत मीड /miːd/ हा होणारा बदल.
(९) /ɡʰ/ > /ɡ/
उदा. – संस्कृत हंस /həũsə/ (प्राचीन उच्चार /*ghəũsə/) शब्दातील प्रथम व्यंजनात इंग्रजीत goose /ɡuːs/ हा होणारा बदल आणि याचे आकलन ग्रिमच्या नियमाच्या तिसऱ्या टप्प्यामुळे होते.
थोडक्यात, ग्रिमद्वारे मांडला गेलेला हा नियम अघोष स्पर्श व्यंजनांचा अघोष घर्षक व्यंजनांमध्ये, सघोष स्पर्श व्यंजनांचा अघोष स्पर्श व्यंजनांमध्ये आणि सघोष महाप्राण व्यंजनांचा सघोष अल्पप्राण स्पर्श व्यंजनांमध्ये झालेला ध्वनी बदल नियमित असल्याचे स्पष्ट करतो. या नियमाने ध्वनी बदलांची नियमबद्धता पटवून दिली. संस्कृत, लॅटिन, ग्रीक यांसारख्या प्राचीन भाषा आणि इंग्रजी, जर्मन यांसारख्या आधुनिक भाषांमधील कुलनिष्ठ संबंध तसेच समकालीन भाषांमध्ये असणाऱ्या नियमबद्ध फरकांचे कारण स्पष्ट झाले. ऐतिहासिक भाषाविज्ञानात ‘तुलनात्मक पद्धती’ विकसित होण्यासाठीचा पाया या नियमाने रचला.
संदर्भ :
- Campbell, lyle, Historical Linguistics : An Introduction, Edinburgh University Press, Edinburgh, 1998.
- University of Texas at Austin, A Reader in Nineteenth Century Historical Indo-European Linguistics https://lrc.la.utexas.edu/books/reader/5-j-grimm (Accessed: 18 March, 2026).
- https://www.ebsco.com/research-starters/law/grimms-law (Accessed: 18 March, 2026).
समीक्षक : रेणुका ओझरकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.