जयकर, रामचंद्र बाळकृष्ण : (७ जानेवारी १८२६ – २ ऑगस्ट १८६६ ?). एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि परमहंस सभेचे पहिले आणि अखेरचे अध्यक्ष. त्यांचा जन्म मुंबई येथे पाठारे प्रभू कुटुंबात झाला. त्या काळी आडनाव जोडण्याची रीत विशेष रूढ नसल्यामुळे ते ‘राम बाळकृष्ण’ याच नावाने जास्त परिचित होते. त्यांचे प्रारंभीचे मराठी आणि इंग्रजी शिक्षण ‘बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’च्या शाळांमध्ये झाले. १८४० ते १८४२ दरम्यान त्यांनी नॉर्मल प्रशालेत तीनही वर्षांच्या शिष्यवृत्त्या (अनुक्रमे दरमहा रु. १० ची क्लेअर शिष्यवृत्ती, रु. १५ ची वेस्ट शिष्यवृत्ती आणि रु. ३० ची नॉर्मल शिष्यवृत्ती) पटकावल्या.
राम बाळकृष्ण यांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांची नेमणूक रत्नागिरी येथील एका नव्याने स्थापन झालेल्या इंग्रजी शाळेत झाली (१८४५). ते या शाळेचे पहिले मुख्याध्यापक होते. त्यांनी वर्षभर येथे राहून ती शाळा नावारूपाला आणली. राम बाळकृष्ण यांचे शिष्य रावसाहेब वि. ना. मंडलिक, रा. गो. भांडारकर यांच्यासारखे पुढे नामांकित झालेले समाजपुरुष याच शाळेचे विद्यार्थी होते. पुढे राम बाळकृष्ण यांची नेमणूक ठाणे येथील इंग्रजी शाळेत दीडशे रुपये वेतनावर करण्यात आली (फेब्रुवारी १८४७). या शाळेत त्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी केले असले, तरी पुढे ती शाळा बंद करावी लागली.
राम बाळकृष्ण यांनी नंतर सरकारी शिक्षणखाते सोडून सीमाशुल्क (कस्टम) खात्यात नोकरी धरली. १८५६ पर्यंत ते त्या खात्यात दफ्तरदार पदापर्यंत पोहोचले. येथेच सरकारकडून त्यांना ‘जस्टिस ऑफ पीस’ तसेच ‘रावबहादूर’ पदवीचा मान मिळाला. १८६० मध्ये सरकारने नेमलेल्या शुल्क समितीच्या (टॅरिफ कमिटी) कामासाठी त्यांना आयुक्त स्पूनर यांनी आपले मदतनीस म्हणून कलकत्त्याला (कोलकाता) नेले. त्यांची कामगिरी पाहून सहायक आयुक्त (असिस्टंट कमिशनर) पदापर्यंत त्यांची बढती झाली. येथे त्यांचा स्नेह पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्याशी जडला. यानंतर, मार्च १८६३ मध्ये वर्षाची अर्धपगारी रजा घेऊन ते इंग्लंडला गेले. तेथे त्यांचा परिचय समाज व शिक्षणसुधारक मेरी कारपेंटर (१८०७-१८७७) यांच्याशी झाला. १८६५ मध्ये विलायतेहून परतल्यावर काही दिवसांत प्रकृती अस्वास्थ्यामुळे सरकारी नोकरी सोडून त्यांनी खाजगी व्यापारात लक्ष घातले. या उपक्रमात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यामुळे हे उद्योग सोडून त्यांनी पुढे ‘द एल्फिन्स्टन फायनान्शियल असोसिएशन ऑफ इंडिया’ येथे व्यवस्थापक म्हणून बाराशे रुपयांची नोकरी पतकरली. या जागी ते अखेरपर्यंत राहिले.
धर्मात तसेच समाजात चालू कालानुरूप सुधारणा व्हावी असे वाटणाऱ्या दादोबा पांडुरंग तर्खडकर, आत्माराम पांडुरंग तर्खडकर, भिकोबा चव्हाण, तुकाराम तात्या पडवळ यांच्यासारख्या एकोणिसाव्या शतकातील नवसुशिक्षितांमध्ये राम बाळकृष्णही आघाडीवर होते. १८४९ मध्ये ठाण्याच्या शाळेतून मुंबईला स्थायिक झाल्यावर त्यांच्या समाजसुधारणा उपक्रमांना खरी सुरुवात झाली. तत्पूर्वी, आपल्या मताचा प्रचार करण्यासाठी ‘मानवधर्मसभे’सारखी (१८४४) एखादी संस्था स्थापन करण्याचा मनोदय असलेले दादोबा पांडुरंग तर्खडकर १८४६ मध्ये सुरतेहून मुंबईस आले. मुंबईतील नॉर्मल प्रशालेत कार्यरत असताना सुरतमध्ये सुरू केलेल्या चळवळीची उद्दिष्टे पुढे नेण्यासाठी संघटना उभारण्यास त्यांना अनुकूल परिस्थिती लाभली. सुरतेतील सहकारी दुर्गाराम मेहता, राम बाळकृष्ण यांसारखे धडाडीचे सहकारी आणि इतर समानधर्मी मित्रमंडळींच्या सहकार्याने दादोबा पांडुरंग यांनी ‘परमहंस सभा’ स्थापना केली. १८४९ मध्ये राम बाळकृष्ण हे तिचे पहिले अध्यक्ष बनल्यावर सभेला अधिक औपचारिक रूप प्राप्त झाले.
परमहंस सभेच्या स्थापनेच्या काळाबाबत निश्चित एकमत नाही. १८४० ते १८५२ या काळातील वेगवेगळ्या तारखा, स्थापना वर्षे निरनिराळ्या अभ्यासकांनी निरनिराळे दिल्याचे आढळते. प्रार्थना समाजाचा इतिहास लिहिणारे द्वा. गो. वैद्य यांनी सन १८४०, तर ब्राह्मो समाजाचे इतिहासकार शिवनाथ शास्त्री यांनी १८४९ हे सभेचे स्थापना वर्ष असल्याचे नमूद केले आहे. गोविंद नारायण माडगांवकर यांनी आपल्या ‘मुंबईचे वर्णन’ या समकालीन पुस्तकात सभेचे स्थापना वर्ष १८५२ असल्याचे म्हटले आहे; मात्र, १ ऑक्टोबर १८५१च्या ‘ज्ञानोदय’ वर्तमानपत्राच्या अंकातील संपादकीयात सभेकडून प्रसिद्ध करण्यासाठी आलेल्या पत्रांचा उल्लेख सापडतो. त्यामुळे या पुराव्यांच्या आधारे ही दोनही वर्षें निर्विवादपणे स्वीकारणे कठीण ठरते. जॉन मरे मिचेल या मुंबई, पुणे, नागपूर येथे कार्यरत असणाऱ्या स्कॉटिश धर्मप्रचारकाने आपल्या ‘इन वेस्टर्न इंडिया’ (In Western India, १८९९) या आत्मवृत्तात १८४६मध्ये दादोबांनी परमहंस सभेची स्थापना केल्याचा उल्लेख केला आहे. उपलब्ध पुराव्यांचा विचार करून प्रा. ज. वि. नाईक आणि डॉ. अरविंद गणाचारी यांनी परमहंस सभेची स्थापना १८४६ साली झाल्याचा निष्कर्ष मांडला आहे, तो ग्राह्य धरण्यास हरकत नाही. या सभेचे कार्य गुप्त रीतीने चालत असे. एकेश्वरवादाचा पुरस्कार करणारी, स्त्री शिक्षण आणि विधवा विवाहाला प्रोत्साहन देणे तसेच जातिभेद मोडून सर्वांची एक जात करणे असे या सभेचे उद्देश होते. सत्य, नीती, शुद्धाचरण, संयम, भूतदया ही परमहंसमताची ठळक मूल्ये तिचा आधार होती.
राम बाळकृष्ण हे एकेश्वरवादी, जातिभेदाचे कट्टर विरोधक, विधवाविवाहाचे समर्थक आणि स्त्रियांबाबत प्रागतिक विचार बाळगणारे होते. १८५१ मध्ये ते ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’चे सभासद झाले व १८५४ मध्ये सोसायटीच्या कार्यकारी समितीवर दादाभाई नवरोजी आणि वि. ना. मंडलिक यांच्यासह त्यांची नेमणूक झाली.
राम बाळकृष्ण यांच्या नेतृत्वात समता व बंधुता यांसारख्या तत्त्वांचा स्वीकार केल्यामुळे परमहंस सभा सुशिक्षित युवकांना आपल्याकडे मोठ्या संख्येने आकर्षित करण्यात यशस्वी ठरलेली दिसते. याच्या जोडीला नॉर्मल प्रशालेतून बाहेर पडून मुंबई प्रांतातील विविध ठिकाणी नेमणुका झालेल्या शिक्षकांमुळे परमहंस सभेचा प्रसार मुंबईपुरता मर्यादित न राहता पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी व बेळगावपर्यंत झाला. महात्मा जोतीराव फुले यांचे परमहंस सभेच्या सभासदांशी निकटचे नाते होते. दादोबांनी पुण्यात सभेचे प्रसारक म्हणून नेमलेले केशव शिवराम भवाळकर तसेच तुकाराम तात्या पडवळ यांच्याशी म. जोतीराव फुले यांचे घनिष्ठ संबंध होते. जोतिबांनी आपला ‘छत्रपति शिवाजी राजे भोसले यांचा पवाडा’ राम बाळकृष्ण यांना अर्पण केला होता. यावरून जोतिबांनी या सभेच्या कार्यापासून स्फूर्ती घेतली असावी, असा कयास अ. का. प्रियोळकर यांनी केला आहे. परमहंस सभेचे पहिले आणि अखेचे अध्यक्ष असलेल्या राम बाळकृष्ण यांचा मृत्यू अवघ्या ऐन चाळीशीत झाला. त्यानंतर परमहंस सभेचे काम थंडावले. मात्र, या उपक्रमातूनच पुढे प्रार्थना समाजाची निर्मिती झाली.
राम बाळकृष्ण यांच्या पत्नीचे नाव यमुनाबाई असे होते. त्यांना दोन मुलगे आणि सहा मुली होत्या. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रभावातून आपल्या एका मुलाचे नाव त्यांनी ईश्वरचंद्र असे ठेवले होते. तत्कालीन समाजाच्या निंदेला न जुमानता त्यांनी आपल्या सर्व मुलींना इंग्रजी शिक्षण दिले. शिक्षणाच्या या ध्यासामुळे त्यांच्या मुलींचे विवाह विलंबाने झाले. राम बाळकृष्ण यांच्या मृत्यू दिनांकाबद्दलही मतभिन्नता आहे. अ. का. प्रियोळकर यांनी जमा केलेल्या तपशिलांच्या आधारे १८६६ मधील २ किंवा ३ ऑगस्ट अशा दोन वेगवेगळ्या मृत्यूतारखा समोर येतात.
संदर्भ :
- Jones, Kenneth W., Socio-Religious Reform Movements in British India, The New Cambridge History of India, Vol. III.1, Cambridge University Press, Cambridge, 1989. Web 2006.
- Mitchel, J. Murray, In Western India: Recollections of My Early Missionary Life, David Douglas, Edinburgh, 1899.
- Naik, J. V., The Collected Works of J. V. Naik: Reform and Renaissance in Nineteenth Century Maharashtra, Edited by Murali Ranganathan, The Asiatic Society of Mumbai, 2016.
- नाईक, जे. व्ही.; पाटील, अवनीश आणि शिंदे, रणधीर, संपा., ‘महाराष्ट्रातील प्रबोधनाचे अंतरंग’, शब्द प्रकाशन, मुंबई, २०२३.
- प्रियोळकर, अ. का., ‘परमहंस सभा व तिचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण’, मराठी संशोधन पत्रिका: मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय विशेषांक, अंक ४ आणि १ जुलै ते डिसेंबर २०२२. (मूळ पुस्तक: प्रियोळकर अनंत काकबा, ‘परमहंस सभा व तिचे अध्यक्ष रामचंद्र बाळकृष्ण’, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय प्रकाशन, मुंबई १९६६.)
- फडके, यशवंत दिनकर, संपा., ‘महात्मा फुले समग्र वाङ्मय’, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, चौथी आवृत्ती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, १९९१. (पहिली आवृत्ती: संपा., कीर, धनंजय आणि मालशे स. गं., १९६९).
- वैद्य, द्वा. गो. (मू. ले., संपा.); दीक्षित, राजा (द्वि. आ. संपा.), ‘प्रार्थनासमाजाचा इतिहास’, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबई, मुंबई, २०१९.
- हवलदार, गणेश रामकृष्ण, ‘रावसाहेब विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र’, भाग १ ला, मुंबई, १९२७.
समीक्षक : अवनीश पाटील
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
