इंडोनेशियातील सुलावेसी हे बेट प्रागैतिहासिक कला आणि मानवाच्या प्रतीकात्मक वर्तनाचा उगम कसा झाला यासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. हजारो वर्षांपूर्वी (६७,००० वर्षपूर्वीपासून) आधुनिक मानवाने साकारलेल्या या कलात्मक अभिव्यक्तीचे पुरावे दक्षिण सुलावेसी बेटावरील मारोस–पांगकेप कार्स्टच्या प्रदेशातील अनेक गुहांमध्ये मिळाले आहेत.

मारोस–पांगकेप प्रदेशातील लिआंग करामपुआंग (Leang Karampuang), लिआंग तेडोंग्ने (Leang Tedongnge), लिआंग बुलू सिपोंग ४ (Leang Bulu’ Sipong 4), लिआंग टिंपुसेंग (Leang Timpuseng), लिआंग बारुगय्या (Leang Barugayya) आणि लिआंग बलांगाजिया १ (Leang Balangajia 1) या  गुहांमधील शैलचित्रांचे कालमापन झाले आहे. एका नवीन आग्नेय सुलावेसी द्वीपकल्पातील मुना बेटावरील लिआंग मेटांडुनो (Liang Metanduno) या गुहेतील शैलचित्रे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या सर्व गुहांमधील शैलचित्रांमध्ये प्रामुख्याने ऋणपट्ट (negative hand stencil), हाताचे ठसे, शिकारीची चित्रे, अलंकारिक आणि कथात्मक चित्रे आणि प्राण्यांची चित्रे (सुलावेसी वॉर्टी डुक्कर (Sus celebensis), बाबिरुसा (Babyrousa), अनोआ (Bubalus)) आहेत. हे सर्व प्राणी सुलावेसीमध्येच आढळतात आणि त्या काळातील लोकांच्या अन्नस्रोताचा मुख्य घटक असावेत.

लिआंग करामपुआंग : या गुहेतील सुलावेसी वॉर्टी डुक्कर आणि त्याच्याजवळ तीन मानवी आकृत्या असे चित्र आहे. या दृश्यातून मानव आणि प्राणी यांच्यातील परस्परसंवाद दिसतो. या डुकराच्या चित्राचे युरेनियम शृंखला पद्धती वापरून झालेले किमान कालमापन ५१,२०० वर्षपूर्व असे आहे. आधुनिक मानवाने रेखाटलेले चित्रांच्या माध्यमातून कथा सांगणारे हे शैलचित्र सध्या ज्ञात असलेल्या कथात्मक शैलचित्रांपैकी सर्वांत जुने आहे. संशोधकांच्या मते हे दृश्य एखादी मिथ्यकथा, शिकार किंवा धार्मिक विधी यांच्याशी संबंधित असू शकते. यावरून असे दिसते की ५०,००० वर्षांपूर्वीच मानव दृश्यात्मक कथन करण्यास सक्षम होते.

लिआंग तेडोंग्ने गुहा : ४५,००० वर्षपूर्वीचे तीन सुलावेसी वॉर्टी डुकरांचे चित्र आणि त्यांचे संगणकीय अनुरेखन, चित्रसंदर्भ : (after Brumm et al. 2021)

लिआंग तेडोंग्ने : या गुहेतील सुलावेसी वॉर्टी डुकराचे मोठ्या आकारात काढलेल्या चित्रामध्ये डुकराच्या चेहऱ्यावरील गाठी आणि पाठीवरील केसांची रांग स्पष्टपणे दाखवली आहे. यांवरून असे दिसते की, त्या  काळातील कलाकारांना स्थानिक प्राण्यांची चांगली माहिती होती. या डुकराच्या चित्राचे युरेनियम शृंखला पद्धती वापरून किमान कालमापन ४५,००० वर्षपूर्व असे झालेले आहे.

लिआंग बुलू सिपोंग : या ४ गुहेत शिकारीचे दृश्य चित्रित केले आहे. या चित्रात डुक्कर आणि अनोआ (बुटकी म्हैस) यांसारखे प्राणी दाखवले आहेत. त्यांच्याभोवती लहान मानवी आकृत्या दिसतात. काही आकृत्यांमध्ये मानव आणि प्राणी यांचे मिश्र रूप (therianthropes) दिसते. संशोधकांनी या दृश्याचे वर्णन करताना ते शिकारविधी, धार्मिक श्रद्धा किंवा मिथ्यकथांशी संबंधित असू शकते, असे सुचवले आहे. या चित्राचे युरेनियम शृंखला पद्धतीने किमान कालमापन ४४,९०० वर्षपूर्व असे आहे. या कालमापनानुसार हे जगातील सर्वांत जुने शिकारदृश्य मानले जाते.

लिआंग टिंपुसेंग : या गुहेतील रंग फुंकून केलेले हाताचे ठसे सु. ३९,९०० वर्षे जुने आहेत, तर बाबिरुसाचे (डुकरासारखा प्राणी) चित्र सु. ३५,४०० वर्षे जुने आहे.

लिआंग बारुगय्या आणि लिआंग बलांगाजिया १ : या दोन्ही गुहेतील हाताचे ठसे आणि बाबिरुसाचे चित्र सु. ३३,००० ते ३०,००० वर्षे जुने आहे.

लिआंग मेटांडुनो गुहा : सर्वांत जुने शैलचित्र फलक (६७,८०० वर्षपूर्व)  – अ. शिकारचित्र, हाताचे ठसे आणि ब. संगणकीय अनुरेखन, चित्रसंदर्भ :(after Oktaviana et al. 2026).

लिआंग मेटांडुनो : मुना बेटावरील या गुहेत हाताचा ऋणपट्ट (negative hand stencil) आढळतो. येथे प्राचीन कलाकाराने आपला हात भिंतीवर ठेवून त्या भोवती रंग फुंकला (तुषार रंगकाम, spray painting) आणि हात काढल्यावर भिंतीवर हाताची उलट रूपरेषा (निगेटिव्ह आउटलाइन) राहिली. मूळ हाताचे चित्र तयार झाल्यानंतर, बोटांना अरुंद आणि लांब करून पंजासारखे बनवले गेले. अशा प्रकारे हा कल्पक बदल करणे हे आधुनिक मानवाचे खास वैशिष्ट्य आहे.

या हाताच्या ठशांवर नंतर तयार झालेल्या कॅल्साइट थराचे एका नवीन पद्धतीने केलेले कालमापन (Laser-ablation U-series – LA-U-series) ७१,६०० ± ३,८०० म्हणजेच किमान  ६७, ८०० वर्षेपूर्व जुने असे आहे. (स्पेनमधील गुहेतील हाताच्या ठशाचे कालमापन ६४,००० वर्षपूर्व असे आहे, परंतु काही संशोधकांनी या कालमापन पद्धतीवर शंका उपस्थित केल्या आहेत). याच भिंतीवर इतरही काही चित्रे आहेत, त्यातील काही २०,००० वर्षांपूर्वीची आहेत. यावरून असे म्हणता येते की, या गुहेचा वापर हजारो वर्षे होत होता.

लिआंग मेटांडुनो गुहेपासून जवळच असेलेल्या तीन गुहेतील हाताच्या ठशांचे कालमापन पुढीलप्रमाणे : गुआ एम्बोकिता (Gua Mbokita) ४४,७०० वर्षपूर्व; गुआ अनवाई (Gua Anawai) १९,१०० वर्षपूर्व आणि गुआ पोमीन्स (Gua Pominsa) ३,९०० वर्षपूर्व

गुआ अनवाई : २०,००० वर्षपूर्वीचा लाल गेरू रंगातील हाताचा ठसा, चित्रसंदर्भ : (after Oktaviana et al. 2026)

वरील सर्व गुहेतील कथात्मक, शिकारदृश्य, हाताचे ठसे, हाताचा ऋणपट्ट आणि प्राण्यांची चित्रे रेखाटण्यासाठी बहुतांशी लाल गेरूचा (iron oxide) वापर केला आहे.

शैलचित्रांच्या कालमापनामध्ये सुधारित तंत्रामुळे अनेक बदल झाले आहेत. सुलावेसीमधील शैलचित्रांचे सुरुवातीचे (२०१४ ते २०२४) कालमापन ५१,००० ते ४५,००० वर्षपूर्व असे होते, तर गेल्या दोन वर्षांत मुना बेटावरील लिआंग मेटांडुनो (Liang Metanduno) गुहेतील हाताच्या ठशाचे कालमापन सु. ६७,८०० वर्षपूर्व आहे. त्यामुळे सध्या ज्ञात असलेली ही जगातील सर्वांत जुनी शैलचित्रे आहेत. यामुळे प्रागैतिहासिक कलेचा उगम मुख्यतः यूरोपमध्ये झाला या प्रस्थापित दाव्याला आव्हान मिळाले आहे.

भौगोलिकदृष्ट्या सुलावेसी बेट आशियाच्या मुख्य भागापासून प्राचीन साहुलकडे (ऑस्ट्रेलिया-न्यू गिनी मिळून असलेला भूभाग) जाणाऱ्या समुद्री मार्गावर आहे. त्यामुळे सुलावेसीतील प्राचीन कला आधुनिक मानवांच्या आग्नेय आशियातून ऑस्ट्रेलियाकडे झालेल्या स्थलांतराशी संबंधित असू शकते. लियांग मेटांडुनो गुहेतील शैलचित्राचे कालमापन होण्याआधी एक असा विचार होता की, आधुनिक मानव (सेपियन मानव) पहिल्यांदा प्राचीन साहुल  बेटावर, सु. ५०,००० वर्षांपूर्वी पोहोचले असावेत. अर्थात या चित्रांचे नवीन कालमापन पाहता, आधुनिक मानव साहुल बेटावर त्या आधी कित्येक हजार वर्षांपूर्वी पोहचला असावा, अशी शक्यता आहे.

संदर्भ :

  • Brumm, Adam; Adhi Agus Oktaviana; Basran Burhan; Budianto Hakim; Rustan Lebe; Jian-xin Zhao; Priyatno Hadi Sulistyarto; Marlon Ririmasse; Shinatria Adhityatama; Iwan Sumantri & Maxime Aubert, ‘Oldest cave art found in Sulawesi’, Science Advances 7: 1-12, 2021.
  • Brumm, Adam; Michelle C. Langley; Budianto Hakim; Yinika Perston; Suryatman; Adhi Agus Oktaviana; Basran Burhan & Mark W. Moore, ‘Scratching the Surface: Engraved Cortex as Portable Art in Pleistocene Sulawesi’, Journal of Archaeological Method and Theory, 27:670–698, 2020.
  • Oktaviana, Adhi Agus; Renaud Joannes-Boyau; Budianto Hakim; Basran Burhan; Ratno Sardi; Shinatria Adhityatama; Andrea Jalandoni & Others, 2026. ‘Rock art from at least 67,800 years ago in Sulawesi’, Nature, 650: 652–656, 2026.

समीक्षक : प्रमोद जोगळेकर


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.