राष्ट्रीय महत्त्व असलेले भारतातील एक संरक्षित पुरातत्त्वीय उत्खनित स्थळ. महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात, वर्धा-नागपूर मार्गावर, वर्धा या शहरापासून सु. नऊ किमी. अंतरावर, धाम नदीकाठी पवनार वसले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे तत्कालीन महानिदेशक ⇨रावबहादूर का. ना. दीक्षित यांनी पवनार ही वाकाटक या राजघराण्याच्या मुख्य शाखेची राजधानी प्रवरपूर असावी, असे मत सर्वप्रथम व्यक्त केले. त्यानंतर प्राच्यविद्या संशोधक ⇨ वासुदेव विष्णु मिराशी व रावबहादूर हिरालाल यांनीही या मतास दुजोरा दिला व वाकाटकनृपती प्रवरसेन-दुसरा याची दुसरी राजधानी प्रवरपूर म्हणजेच सध्याचे पवनार असल्याचे प्रतिपादले. मात्र हरिहर ठोसर यांच्या मते, पवनार हे स्थलनाम पद्मनगरपासून उद्भवते; आणि म्हणून पवनारचे प्रवरपूर या प्राचीन नगरनामाशी साधर्म्य दर्शविता येत नाही. असे असले, तरी ठोसर यांनी राष्ट्रकूटनृपती नन्नराज युद्धासुर याच्या संगलूद दानपत्रात आढळणारे पद्मपूर सध्याचे पवनार असावे, असे अनुमान केले आहे.
१९३८ साली येथे आचार्य विनोबा भावे यांच्या परमधाम या आश्रमासाठीचे खोदकाम करीत असताना बरेच पूर्णाकृती शिल्पपट सापडले. यांत रामायण-कथानक कोरलेले शिल्पपट तसेच गंगाभगवती आदी शिल्पांचा समावेश आहे. ही सर्व शिल्पसंपदा आश्रमात प्रदर्शित केली आहे. या शिल्पांची शैली तसेच इतर अवशेषांवरून येथे वाकाटककाळातील ‘राम संप्रदाय’ तसेच कमीतकमी एक मोठे विष्णूचे देऊळ असावे असे एक मत आहे, तर काही विद्वानांच्या मते, ही शिल्पसंपदा विष्णुकुंडीन काळातील अथवा राष्ट्रकूटकाळातील शिल्पांचा प्रभाव असलेली आहे.
वरील पार्श्वभूमीवर १९६७ साली धाम नदीच्या उजव्या तीरावरील पांढरीच्या टेकाडावर नागपूर विद्यापीठाने पुरातत्त्वज्ञ शांताराम भालचंद्र देव आणि मधुकर केशव ढवळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मर्यादित स्वरूपाचे उत्खनन केले. येथे एकूण चार कालखंडांचे सांस्कृतिक अवशेष उजेडात आले. पहिल्या कालखंडातील वस्ती इ.स.पू. पहिल्या सहस्रकाइतकी प्राचीन असून ही वस्ती कुडाच्या घरांच्या स्वरूपांत उपलब्ध झाली. काळी-आणि-तांबडी या वर्गातील मृद्भांडी ही या वस्तीची वैशिष्ट्ये. हे लोक लोखंडाची उत्कृष्ट शस्त्रे बनवीत. त्यांची कलात्मकता ते वापरीत असलेल्या रंगीत मृद्भांड्यांत दिसून येते. मासेमारी, शेती व शिकार यांवर ते गुजराण करीत. विदर्भातील हे पहिले लोहयुगीन रहिवासी होते.
दुसरी वस्ती इ.स.पू. दुसऱ्या/तिसऱ्या शतकांत झाली. पहिल्या कालखंडातील काळी-आणि-तांबडी या वर्गातील मडक्यांपेक्षा या कालखंडातील मडकी जाड असून प्रामुख्याने थाळ्या व वाडग्यांच्या स्वरूपात वापरात कायम राहिली; मात्र रंगविलेली मडकी वापरात आढळत नाहीत. घरांच्या बांधणीत आमूलाग्र सुधारणा होऊन पवनारवासी पक्क्या घरांत राहू लागले. आर्थिक व्यवहारात नाण्यांचा वापर सुरू झाला. सातवाहन राजांची नाणी प्रचारात आली आणि पवनारला काहीसे नागरी स्वरूप आले. सांडपाण्याची शोषणकुंडे, अर्चनाकुंडे आदी अवशेष त्याची साक्ष आहेत. सातवाहनांच्या उत्तर काळात, इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांत, येथे व्यापारी भरभराट झाली. याची परिणती उत्कृष्ट बनावटीची तांबडी चकचकीत मृद्भांडी, रोमन काचेच्या वस्तू, रोमन मद्य व मद्यकुंभ पवनार येथे आयात करण्यामध्ये झालेली दिसून येते.
तिसरी वसाहत गुप्त-वाकाटक काळातील (इ.स. तिसरे ते पाचवे शतक). पवनार येथील सातवाहन काळातील आर्थिक सुबत्ता इसवी सनाच्या पाचव्या/सहाव्या शतकापर्यंत टिकली. दानधर्म वाढला आणि तत्कालीन प्रवरसेन-दुसरा यांसारख्या राजांनी अनेक ताम्रपटांद्वारे ब्राह्मणांना देणग्या दिल्या.
चौथा कालखंड मध्ययुगीन. वाकाटक कालखंडानंतर पवनारचे वैभव लुप्त झाले, अवनती सुरू झाली. मध्ययुगात काचेच्या बांगड्यांसारखे लघुउद्योग सुरू झाले.
संदर्भ :
- Bakker, Hans, The Vakatakas: An Essay in Hindu Iconography, Groningen, 1997.
- Deo, S. B. & Dhavalikar, M. K. Paunar Excavation, Nagpur, 1968.
- Spink, Walter, Ed., Williams, J.W. Ajanta’s Chronology: Politics and Patronage, in Kaladarshan , Leiden, 1981.
- जामखेडकर, अरविंद, पुरासंचय- भाग १, पुणे, २०१६.
- देव, शांताराम भालचंद्र, ‘गंगा भगवतीचे पवनार’, दै. केसरी, १९८४.
समीक्षक – भास्कर देवतारे