महाराष्ट्रातील एक मध्ययुगीन पुरातत्त्वीय स्थळ. हे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भीमा नदीची उपनदी असलेल्या सीना नदीच्या डाव्या तीरापासून १५० मी. अंतरावर आहे. भीमा-सीना नद्यांच्या प्रदेशांत पुरातत्त्वीय स्थळांचे सर्वेक्षण करत असताना प्रमोद जोगळेकर आणि संतोष हंपे यांनी या स्थळाची नोंद केली (२००१-०२). तेथे एक यादव काळातील (हेमाडपंती) मंदिर असून सर्वेक्षणादरम्यान मंदिराच्या आवारामध्ये काही वीरगळ व सुट्या मूर्तींचे अवशेष आढळले होते. तसेच प्रारंभिक मध्ययुगीन काळातील खापरांप्रमाणे लाल रंगाच्या सातवाहन खापरांचे काही तुकडे पृष्ठभागावर आढळले होते.

पूर्वेकडील भाग वगळता या यादव काळातील शिवमंदिराभोवती पुरातत्त्वीय अवशेष विखुरलेले दिसतात. गुंडेश्वर म्हणून प्रसिद्ध असलेले हे मंदिर साध्यासुध्या रचनेने असून त्याच्या आत व बाहेर कोणतीही सजावट अथवा देवदेवतांच्या प्रतिमा नाहीत. पूर्वी हे मंदिर गुंडोबा म्हणून ओळखले जात होते आणि दोन दशकापूर्वी झालेल्या नूतनीकरणानंतर गुंडेश्वर हे नाव प्रचलित झाले. यादवांच्या काळात बनविलेली पिंड मंदिरात असून त्या खेरीज तेथे मध्यभागी एक मोठा पाषाण आहे. कदाचित हे पशुपालकांचे स्थानिक उपासनास्थान होते आणि यादवकाळात त्याचे शिवमंदिरात रूपांतर झाले असावे. कारण मंदिराच्या पश्चिमेकडे वेतोबा अथवा वेताळ या नावाने ओळखले जाणारे एक पूजास्थान आहे. मंदिराच्या प्रांगणात एक सूर्यमूर्ती आहे. तसेच काही वीरगळ, गजलक्ष्मीचे एक भग्न अवस्थेतील शिल्प आणि एक सतीशिळा हे अवशेष मंदिराच्या नूतनीकरणाच्या वेळी आसपासच्या परिसरातून गोळा करून तेथे आणण्यात आले होते. पुरातत्त्वीय स्थळाचा सर्वांत उंच बिंदू वेतोबाच्या जागी आहे. पुरातत्त्वीय स्थळाचा विस्तार उत्तर-दक्षिण १००० मी. व पूर्व-पश्चिम १५०० मी. असल्याचे सर्वेक्षणात दिसून आले (२००९-१०); तथापि मंदीर व शेतीमुळे पुरातत्त्वीय स्थळाचा अर्धा भाग नष्ट झालेला आढळला.
डेक्कन कॉलेजच्या पुरातत्त्व विभागातील प्रमोद जोगळेकर आणि सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या पुरातत्त्व विभागातील माया पाटील यांनी संयुक्तपणे सन २०१०-२०११ मध्ये वाकावचे उत्खनन केले. उत्खननात वसाहतीचे आठ थर दिसून आले. पुरातत्त्वीय थरांची एकूण जाडी सुमारे २ मी. होती. सर्वसाधारणपणे सर्व स्तरांमध्ये मिळालेले खापरांचे अवशेष एकाच प्रकारचे असून त्यातून एकाच सांस्कृतिक कालखंडाचा बोध होतो. वाकाव येथे सामान्य प्रतीची लाल रंगाची, चकाकीयुक्त तांबड्या रंगाची आणि काळ्या रंगाची खापरे मिळाली. त्यामध्ये झाकणे, थाळ्या, कढया, रांजण, माठ, हंड्या, तवे व विविध आकारांचे वाडगे अशा दैनंदिन वापरातील भांड्यांचा समावेश होता. बहुतेक भांड्यांवर नक्षीकाम अथवा रंगकाम केलेले आढळले नाही. तसेच सर्वसाधारणपणे भांड्यांची बनावट सामान्य प्रतीची होती. सर्वेक्षणात पैठण येथे मिळालेल्या खापरांशी साम्य असणारे सातवाहन खापरांचे काही तुकडे पृष्ठभागावर आढळले असले, तरी उत्खननात ते मिळाले नाहीत. वाकाव येथील खापरे ब्रह्मपुरी (कोल्हापूर) आणि सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर या इतर मध्ययुगीन स्थळांवरील खापरांशी साम्य असणारी होती. खापरांच्या तौलनिक अभ्यासातून असे दिसले की, वाकावची वसाहत प्रारंभिक मध्ययुगीन काळातली (अकरावे-बारावे शतक) होती व तेथे यादव काळात शिवमंदिर बांधण्यात आले होते.
उत्खननात मणी, बांगड्या आणि मृण्मय (टेराकोटा) मूर्ती यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण वस्तू मिळाल्या. उत्खननात कोणतेही नाणे सापडले नाही; तथापि नांगरलेल्या शेतात आदिलशाही सलतनतीचे तांब्याचे एक छोटे नाणे मिळाले. काचेच्या मण्यांची (लाल, पिवळे, निळे आणि हिरवे) संख्या जास्त होती; परंतु तुलनेने मृण्मय मणी कमी होते. मृण्मयी मूर्तींमध्ये प्रामुख्याने प्राण्यांच्या मूर्तींचा समावेश असून त्या बैलांच्या होत्या. तसेच भाजलेल्या मातीची एक मानवी मूर्ती मिळाली. उत्खनन केलेल्या सर्व खड्ड्यांमध्ये काच, टेराकोटा, शंख व हाडे अशा वस्तूंपासून बनवलेल्या विविध प्रकारच्या बांगड्या मिळाल्या.
प्राण्यांच्या अवशेषांवरून असे दिसते की, वाकावचे रहिवासी गाय-बैल, म्हैस, शेळ्या-मेंढ्या, गाढव, कोंबड्या व कुत्रा हे प्राणी पाळत होते. चुलींच्या जवळील माती चाळल्यानंतर त्यात तांदूळ, गहू, ज्वारी, उडीद, मूग, हरभरा, मसूर, वाटाणा व बोर यांचे अवशेष मिळाले. वाकावचे लोक शिकार करत होते हे तेथे प्राप्त झालेल्या काळवीट, हरीण, साळंदर व ससे यांच्या हाडांवरून दिसून येते. प्राणी व वनस्पतींचे हे अवशेष व सर्वसाधारणपणे मिळालेल्या सामान्य प्रतीच्या वस्तू बघता ही साधीसुधी शेतकरी लोकांची वस्ती होती, असे अनुमान काढता येते.
संदर्भ :
- Joglekar, P. P. & Patil-Shahapurkar, Maya, ‘A Preliminary Report on the Excavation at Wakav, Solapur District, Maharashtra (2010-2011)ʼ, Purattava, 41: 159-167, Plates 24-26, 2011.
- Mate, M. S. & Dhavalikar, M. K. ‘Pandharpur Excavation 1968 : A Reportʼ, Bulletin of the Deccan College Research Institute, 29: 76-117, 1968-69.
- Sankalia, H. D. & Dikshit, M. G. Excavations at Brahmapuri (Kolhapur) 1945-46, Deccan College, Pune, 1952.
समीक्षक : गिरीश मांडके