पूँछवाले, बाळासाहेब : (१५ डिसेंबर १९१८ – ४ जानेवारी २००५). हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील विशेषतः ग्वाल्हेर घराण्याच्या संदर्भातील एक वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी असलेले प्रख्यात व्यक्तिमत्त्व. पूँछवाले यांचे मूळ गाव सातारा होते. सातारा जिल्हातील बालवअष्ट नावाच्या इनामदारांचे वंशज केशवराव अष्टेकर हे त्यांचे मूळ वंशज होत. बुंदेलखंड येथील पूँछ या गावी त्यांना राजदरबारी नोकरी मिळाली म्हणून त्यांचे आडनाव पूँछवाले असे पडले. ग्वाल्हेर घराण्याचे एक प्रमुख गायक राजाभैय्या पूँछवाले हे बाळासाहेबांचे पिता होत. बाळासाहेबांच्या आईचे नाव वेणूताई व पिता राजाभैय्या यांचे मूळ नाव बाळकृष्ण असे होते. बाळासाहेबांचे मूळ नाव पांडुरंग होते; परंतु पुढे त्यांना बाळासाहेब या नावानेच ओळखू लागले.

बाळासाहेबांच्या घरामध्येच संगीताचे वातावरण होते. त्यांनी संगीताचे प्राथमिक शिक्षण वडील राजाभैय्या यांचे शिष्य सदाशिवराव अग्निहोत्री यांचेकडून घेतले. त्यानंतरचे शिक्षण त्यांनी आपले पिता राजाभैय्या, पं. वि. ना. भातखंडे आणि पं. कृष्ण नारायण रातंजनकर यांचेकडून घेतले. आपल्या वडिलांकडून त्यांनी ग्वाल्हेर घराण्याची गायकी, स्वर विस्तार, पारंपरिक बंदिशी आत्मसात केल्या. या व्यतिरिक्त त्यांनी ख्याल, टप्पा, दादरा, तराणा, त्रिवट, चतुरंग, अष्टपदी, ठुमरी इ. अनेक गायनप्रकारांचे शिक्षण घेतले. ख्याल, टप्पा, तराणा इत्यादींवर त्यांचे प्रभुत्व होते. ग्वाल्हेर घराण्याच्या वैशिष्ट्यांना पूर्णपणे आत्मसात करून बाळासाहेब पूँछवाले यांनी स्वतःची अशी वेगळी गायनशैली निर्माण केली. रागाची शुद्धता व गायनातील गोडवा याबरोबरच अत्यंत कठीण लयकारी ही त्यांची प्रमुख वैशिष्ट्ये होत. पंडितजींनी टप्पा गायनाचा प्रचार करून त्याला पुनरुज्जीवन प्राप्त करून दिले. विविध शैलींमध्ये त्यांचे प्रयोग, टप्पा, टप-ख्याल, टप-ठुमरी या प्रकारांमध्ये नाविन्यपूर्ण बंदिशी रचण्यासाठी पंडितजी ओळखले जातात.

पं. भातखंडे यांनी ग्वाल्हेर येथे स्थापन केलेल्या माधव संगीत विद्यालय येथे बाळासाहेब पूँछवाले यांनी संगीत शिक्षकाच्या नोकरीपासून महाविद्यालयाच्या प्राचार्य पदापर्यंत सर्वच पदांवर भरीव कामगिरी करून संगीत क्षेत्रासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्यांनी १९६० ते ७० या काळात माधव संगीत विद्यालयाच्या प्राचार्यपदी काम करत असताना अभ्यासक्रमामध्ये टप्पा गायनाचा समावेश केला. ते स्वतः विद्यार्थांना टप्पा गायन शिकवीत असत. त्यावेळी २५ ते ३० वेळेला टप्प्याचा रियाज केला जात असे. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या व्यतिरिक्त इतरही अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. अत्यंत निर्मळ भावनेने शिकवणारे एक उत्तम अध्यापक आणि गुरु असलेल्या पंडितजींच्या विषयी त्यांच्या शिष्यांच्या मनात आदरभाव होता. त्यांच्या शिष्यांमध्ये जयंत खोत, प्रभाकर गोहडकर, सुदिप्ता सेनगुप्ता, शाश्वती मंडळ, विश्वजित रॉय चौधरी, रंजना टोणपे, राजा काळे इत्यादींचा समावेश आहे.

आकाशवाणीवरही उच्च श्रेणीचे गायक कलाकार म्हणून त्यांना मान्यता मिळालेली होती. आकाशवाणीवरील अखिल भारतीय संगीत कार्यक्रमांबरोबरच अखिल भारतीय स्तरावरील इतरही अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांनी आपल्या गायनशैलीचे सादरीकरण केले आहे. आजही बाळासाहेब पूँछवाले यांच्या संगीत ध्वनिमुद्रिकांचे अनेक संग्रह देशात आणि परदेशातही संग्रहित केलेले आहेत. ‘मालावि’ राग गायनासाठी ते विशिष्ट प्रसिद्ध होते.

भारत सरकारच्या संस्कृती विभागातर्फे ‘टप्पा गायन’ या विषयावर संशोधन कार्यासाठी त्यांना भारत सरकारतर्फे संगीत फेलोशिप प्राप्त झाली होती. १९९३ मध्ये भारत सरकार तर्फे संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. ह्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी त्यांनी मालवि रागाचेसादरीकरण केले होते. तसेच मध्यप्रदेश सरकारकडूनही संगीतातील उत्कृष्टतेबद्दल त्यांना शिखर सन्मान देऊन गौरविण्यात आले.

स्पष्ट आकारयुक्त स्वर, रागाची शुद्धता व स्पष्टता, रागातील वर्ज्यावर्जस्वर, राग नियमांचे अत्यंत काटेकोरपणे पालन, आलाप गायनामध्ये स्थायी, अंतरा, संचारी, अभोग या चारही भागांचे विस्तृत दर्शन ही त्यांच्या गायनाची मुख्य वैशिष्ट्ये होती. बाळासाहेब पूँछवाले यांनी लिहिलेला ‘मै जैसा भी हुँ’ हा आत्मचरित्रपर ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांच्या जीवनातील प्रसंग उल्लेख केलेले आहेत. तसेच या पुस्तकात त्यांनी रचलेल्या ७५ बंदिशींचा समावेश आहे. या पुस्तकात या सर्व बंदिशी पंडितजींचे शिष्य विजय तळेगावकर यांनी स्वतःच्या हाताने लिहिलेल्या आहेत. पंडितजींच्या पंच्याहत्तरी सोहळ्यावेळी या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

बाळासाहेब पूँछवाले यांचे ग्वाल्हेर येथे निधन झाले. त्यांच्या स्मृतींना सन्मानित करण्यासाठी आणि त्यांच्या गायनशैलीचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात ग्वाल्हेरमध्ये संगीत महोत्सव आयोजित केला जातो.

संदर्भ :

  • sangeetnatak.gov.in/public/uploads/awardees/docs/1741249580_Balasahib%20Poonchwale.pdf

समीक्षण : सुधीर पोटे


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.