एडिसन, टाॅमस अल्वा (११ फेब्रुवारी,१८४७ ते १८ ऑक्टोबर,१९३१).

अमेरिकन संशोधक. तारायंत्र, ग्रामोफोन, प्रदीप्त दिवा (बल्ब), वीज पुरवठ्याचे देशव्यापी जाळे पसरविणारे विद्युत् जनित्र, चलच्चित्रपट प्रक्षेपक (सिनेमा प्रोजेक्टर), प्रत्याभरण (चार्जिंग) करता येणारी विद्युत् संचायक घटमाला (बॅटरी), पहिला बोलका चित्रपट, बेंझीन व कार्बोलिक अम्लाची निर्मिती यांसाठी एडिसन ओळखले जातात.

एडिसन यांचा जन्म अमेरिकेच्या ओहायओ प्रांतातील मिलान या गावी झाला. मिशिगन राज्यातील पोर्ट ह्यूरन येथील शाळेत ते तीन महिनेच शिकले.  बारा वर्षांचे असताना त्यांनी ग्रँड ट्रंक रेल्वेवर वर्तमानपत्र विकताना छपाई यंत्राशी खटपट व प्रयोग करायला सुरुवात केली. वयाच्या १५ व्या वर्षी ग्रँड ट्रंक वीकली हे साप्ताहिक सुरू केले आणि मालगाडीच्या डब्यातच प्रयोगशाळा थाटली. मात्र प्रयोगशाळेत स्फोट झाल्याने त्यांना प्रयोगशाळा बंद करावी लागली. रेल्वे स्टेशन अधिकाऱ्याच्या मदतीने ते तारायंत्र शिकले व तारायंत्र प्रचालक (ऑपरेटर) म्हणून नोकरी करू लागले.  या नोकरीच्या काळातच, त्यांनी त्यांचा महत्त्वाचा प्रचालकाशिवाय चालणाऱ्या, एकच संदेश विविध ठिकाणी पाठवू शकणाऱ्या स्वयंचलित यंत्राचा शोध लावला. त्यानंतर त्यांनी बॉस्टन शहरात नोकरी पत्करली आणि उर्वरित वेळ संशोधनासाठी दिला. तेथे त्यांनी एक मतदान यंत्र तयार केले, या करिता त्यांना १८६८ मध्ये पहिले एकस्व (पेटंट) मिळाले. न्यूयॉर्कमधील गोल्ड अॅण्ड स्टाकतारायंत्र कंपनीत काम करत असताना तेथील यंत्रसामग्री व सेवाप्रणालीमध्ये त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा घडवून आणल्या. नोकरीतून उरलेल्या वेळात संशोधन करताना तारायंत्रासाठी जोडयंत्रणा तयार केली. त्यातूनच मिळालेल्या कमाईतून प्रयोगशाळा स्थापन करून स्वयंचलित वेगवान तारायंत्रणा तयार केली. त्यामुळे नेहमीच्या तारायंत्र तारांद्वारे अनेकपट अधिक संदेशवहनाची सोय झाली. त्याचवेळेस अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांनी शोधलेल्या टेलिफोनसाठी एडिसनने कार्बन प्रेषक (ट्रान्समीटर) शोधून एक महत्त्वपूर्ण संशोधन केले.  सन १८७७ मध्ये, एडिसनने फोनोग्राफचा (मूळचा ग्रामोफोन) शोध लावला. यांत्रिक ऊर्जा वापरून प्रथमच कथिलाच्या (टीनच्या) पत्र्यावर आवाज लिहिला गेला आणि ध्वनिमुद्रण नावाचे नवीन विश्व उलगडले गेले.

विजेच्या दिव्याचा शोध जरी जोसेफ स्वॅान यांनी लावला असला, तरी विजेच्या दिव्याला लोकमान्यता मिळण्यासाठी एडिसनने सर्वांना परवडणारा, सहज हाताळता येणारा, टिकाऊ आणि सुरक्षित असा प्रदीप्त दिवा (बल्ब) तर तयार केलाच शिवाय विजपुरवठ्याचे देशव्यापी जाळे उभे केले. विजेच्या दिव्याचे घाऊक उत्पादन आणि वितरण केले.  त्यामुळे सर्वसामान्यांनी विजेच्या दिव्याला आपलेसे केले. याच विजेच्या दिव्यात नवनव्या सुधारणा केल्या. मोठ-मोठी विद्युत् जनित्रे बनविली आणि १८८२ मध्ये जगातला पहिला मध्यवर्ती वीजनिर्मिती प्रकल्प न्यूयॉर्क शहरात स्थापन केला. सन १८८८ मध्येच एडिसन यांनी चलच्चित्रपट प्रक्षेपक (कायनेटोस्कोप) शोधून काढला. यात सुटीसुटी चित्रे भराभर फिरवून हलती चित्रे अर्थात सिनेमानिर्माण केला. चलच्चित्रपट प्रक्षेपक म्हणजेच सिनेमा प्रोजेक्टर. यानंतर एडिसनने पुनर्भारण (चार्जिंग) करता येण्याजोगी, लोह व निकेल वापरून अल्कधर्मी संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) तयार केली.  ती भक्कम, टिकाऊ व उच्चक्षमतेची होती.   फोनोग्राफमध्ये सुधारणा करून व चलच्चित्रपट प्रक्षेपकाशी जुळवून पहिला बोलका सिनेमा तयार केला. विजेचे पेन, मिमिओग्राफ (सायक्लोस्टायलींग मशीन), तापमानातील अतिसूक्ष्म बदल दाखविणारा मायक्रोसिमिटर, धावत्या रेल्वेाशी संपर्क साधण्यासाठी बिनतारी  यंत्रणा अशा अनेक संशोधनानंतर एडिसनने रसायन उद्योगातही झेप घेतली. एडिसनने बेंझीन, कार्बोलिक अम्ल यांसारख्या रसायनांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारी संयंत्र उभारून, त्यावर उत्पादन करून पहिल्या महायुद्धाच्या काळात साहाय्य केले. त्याने तापानुशीतन (अनिलींग) प्रक्रियाही शोधून काढली. ही धातू, मिश्रधातू व काच यांचा ठिसूळपणा कमी करणारी प्रक्रिया आहे. विजेवर चालणाऱ्या घरगुती व औद्योगिक यंत्राच्या क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठी कंपनी जनरल इलेक्ट्रीकएडिसननेच स्थापन केली. सन १९१५ मध्ये, अमेरिकन नौदल सल्लाठगार समितीचा अध्यक्ष असताना नौदलासाठी एडिसनने अनेक उपकरणे तयार केली.

एडिसन यांनी काळानुसार आधी बनविलेल्या उपकरणात अनेक सुधारणा घडवून आणल्या. सन १८८३ मध्ये एडिसन यांनी सूक्ष्म निरिक्षणावर आधारित धातूच्या तप्त राखेतून इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह निघतोहा  महत्त्वपूर्ण शोध लावला.  हा शोध आधुनिक इलेक्ट्रॅानिक्स तंत्रज्ञानात मूलभूत आणि महत्त्वाचा ठरला. म्हणूनच या शोधाला एडिसन इफेक्टअसे नाव दिले गेले. कठोर परिश्रमाला पर्याय नाहीहे त्यांचे ब्रीदवाक्य होते. त्यानुसार त्यांनी अपार कष्ट केले.

एडिसन यांनी विद्युत् क्षेत्र आणि संदेशवहन या क्षेत्रांमध्ये अत्यंत यशस्वी संशोधन केले असले तरी, १८८० ते १८९० च्या दशकात एडिसनने आपल्या प्रयोगशाळेत चुंबकीय खनिज अलग करण्याला प्राधान्य दिले होते.  त्यापूर्वीही प्रदीप्त दिव्यांसाठी प्लॅटिनमचा शोध घेत असताना खनिज विलग करण्यावर एडिसनने काम केले. त्याने वाळुतून लोहमिश्रीत खनिज प्लॅटिनम बाजूला करणारे उपकरण बनविले होते.  एडिसनने १४५ जुन्या खाणींचे स्वामित्व मिळविले होते. त्यातील न्यू जर्सीतील ऑक्डेन येथील खाणीवर एक मोठा पायलट प्लान्ट स्थापीत केला होता. त्यातून त्याला पैसे कमविण्याची संधी दिसत होती.  परंतु जेव्हा लोखंडाचे भाव धडाधड कोसळले तेव्हा त्यांनी ही कल्पना सोडून दिली. कोणतेही अपयश एडिसनच्या संशोधन वृत्तीला थांबवू शकले नाही. आपल्या वयाच्या ८० व्या वर्षीही त्यांचे संशोधन चालूच ठेवले.

आपल्या आयुष्यात एडिसन यांनी विद्युत्दीप आणि शक्ती संबंधी ३८९, फोनोग्राफसंबंधी १९५, टेलिग्राफ संबंधी १५०, संचायक विद्युत् घटमाला (स्टोरेज बॅटरी) संबंधात १४१ आणि दूरध्वनी  संदर्भात ३४ अशी एकूण ९०० च्या वर एकस्वे संपादित केली.

अमेरिकेशिवाय इंग्लंड, फ्रान्स व इतर देशांनी अनेक पुरस्कार, सुवर्णपदके इत्यादी देऊन एडिसन यांचा वेळोवेळी सन्मान केला. जनतेची कृतज्ञतेची पावती म्हणून एडिसनने व्रतस्थ राहून निर्मोही वृत्तीने त्यांचा स्वीकार केला. अनेक पराक्रमांनी आपले आयुष्य सार्थकी लावून एडिसन  न्यू जर्सीतील वेस्ट ऑरेंज येथे निवर्तले. सन १९५५ मध्ये एडिसन यांचे घर व प्रयोगशाळा अमेरिकन सरकारने राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू म्हणून घोषित केले.

 

संदर्भ :

This Post Has One Comment

प्रतिक्रिया व्यक्त करा