कानिटकर, कृष्णाजी केशव  (३० डिसेंबर १९२२ – २९ जानेवारी २०१४).

भारतीय वैद्यक. औषधी कल्प बनवणॆ, रुग्णाची प्रकृती परीक्षणॆ करुन चिकित्सा करणॆ व त्यासंबंधी विद्यार्थ्यांना संपूर्ण निर्णयप्रकिया उलगडून सांगण्याची हातोटी वैद्य कानिटकर यांच्याकडे होती. मुंबई विद्यापीठाच्या आयुर्वेद समितीवर त्यांनी कार्य केले.

वैद्य कानिटकर यांचे शालेय शिक्षण महाराष्ट्रातील गुहागर तालुक्यातील अडूर येथे झाले. मुंबईच्या महाराष्ट्र आयुर्वेद महाविद्यालयातून निखिल भारतीय आयुर्वेद विद्यापीठाची आयुर्वेदभिषक ही पदवी त्यांनी प्राप्त केली. त्यानंतरची ५१ वर्षे ते शुद्ध आयुर्वेदाची चिकित्सा करीत होते. व्याधी-दोष-क्षय-वृद्धी अवस्था व संपूर्ण रुग्ण परिचय तसेच व्याधी निगडीत मार्मिक लक्षणे या सर्व गोष्टी हाच त्यांच्या चिकित्सेचा सर्वांगीण गाभा होता. कानिटकर स्वतःच्या घरीच काष्ठौषधींची चूर्णॆ, गोळ्या, औषधीकल्प इ. सिद्ध करीत असत. स्वतःला लागणाऱ्या औषधींचे ते संकलन करीत. यासाठी ते स्वतः कोकणात जाऊन  काष्ठौषधी निवडून काढत व मुंबईत आणत.

त्याव्यतिरिक्त वैद्य कानिटकर यांनी आयुर्वेदाच्या प्रसार-प्रचाराचे कार्यही केले. महाराष्ट्र प्रांतीय वैद्यमंडळाचे प्रमुख कार्यवाह तसेच आयुर्वेद महासंमेलन, बृहन्मुंबई जिल्हा शाखेचे चार वर्षे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या नाशिक येथील सहाव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते.

आयुर्वेद विद्याशाखेच्या परीक्षक निवड समितीवर तसेच आयुर्वेद अभ्यास मंडळ पदवी व पदव्युत्तर शिक्षण समितीवर सदस्य म्हणून त्यांनी कार्य केले. मुंबई विद्यापीठाच्या आयुर्वेद विभागीय तपासणी समितीवर ते सदस्य होते. आयुर्वेद विज्ञान मंडळाचे ते संचालक होते.

मुंबई आकाशवाणीवर ते व्याख्यानाची मालिका सादर करत असत. आयुर्वेद मासिके व वृत्तपत्रातून लेखन करीत असत. जीवनीय जल, स्वास्थ्यसंशोधन, स्वानुभवी वनस्पती उपचार, वृद्धजीवन, अमृतमय कडूनिंब, आहार व निद्रा, विधिविशेष व आचार, अथाSSतो देहजिज्ञासा, अथाSSतो कर्मजिज्ञासा अशा आयुर्वेद विषयांवर त्यांनी पुस्तके लिहिली.

खडीवाले संशोधन संस्थेने कानिटकरांना सर्वोच्च असा अण्णासाहेब पटवर्धन- स्मृती पुरस्कार आणि पोद्दार आयुर्वेद महाविद्यालयाने वैद्य पु. ग. नानल पुरस्कार त्यांना प्रदान केले होते.

संदर्भ :

  • आयुर्वेद पत्रिका,डिसेंबर २०१२,वैद्य कृ.के.कानिटकर गौरवांक

समीक्षक – आशिष फडके