होविट, पीटर (Howitt, Peter) : (३१ मे १९४६). प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्राचे २०२५ चे नोबेल पारितोषिक विजेते. होविट यांचा जन्म आँटॅरिओ, कॅनडा येथे झाला. त्यांनी
मॅकगिल विद्यापीठातून अर्थशास्त्रात १९६९ मध्ये बी. ए., तर वेस्टर्न आँटॅरिओ विद्यापीठातून एम. ए. या पदव्या प्राप्त केल्या. नंतर त्यांनी रॉबर्ट डब्ल्यू. क्लॉव्हर यांच्या मार्गदर्शनाखाली नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातून १९७३ मध्ये आचार्य (पीएच. डी.) ही पदवी संपादन केली. ते ब्राउन विद्यापीठात लिन क्रॉस्ट सामाजिकशास्त्राचे प्राध्यापक आहेत. १९९२ पासून रॉयल सोसायटी ऑफ कॅनडा या मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय संस्थेचे ते अधिछात्र (फेलो) आहेत. त्यांनी १९९३-९४ मध्ये कॅनेडियन इकॉनॉमिक असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आणि १९९७-२००० या काळात जर्नल ऑफ मनी, क्रेडिट आणि बँकिंग या नियतकालिकाचे ते संपादक होते. सध्या त्यांचे वास्तव्य व्हानुवर, ब्रिटिश कोलंबिया, कॅनडा येथे असून साकलिक अर्थशास्त्र, आर्थिक अभिवृत्ती हे त्यांच्या संशोधनाचे प्रमुख विषय आहेत.
पीटर होविट, जोएल मोकीर आणि फिलीप अघीओन या तिघांना २०२५ चा अर्थशास्त्रातील अत्युच्च मानाचा नोबेल स्मृती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्काराची रक्कम विभागताना मोकीर यांना निम्मी रक्कम आणि अघीओन व होविट या दोघांना मिळून निम्मी रक्कम अशी विभागणी पुरस्कार समितीने केली. या तिघांच्या संशोधन आणि लेखनातील समान धागा म्हणजे नवप्रवर्तन या माध्यमाने आर्थिक अभिवृद्धी कशी साधता येईल, याची नवी प्रतिमाने त्यांनी जगापुढे मांडली.
आर्थिक अभिवृद्धीचा दर अनेक घटकांवर अवलंबून असतो. उदा., भांडवल, मानवी श्रम, नियोजन, व्यवस्थापन इत्यादी. आधुनिक काळात तंत्रज्ञान हा एक महत्त्वाचा घटक आर्थिक अभिवृत्ती निर्धारित करण्यास कारणीभूत ठरू शकतो, हे लक्षात घेऊन उत्पादन पद्धतीत बदल करून नव्या स्वरूपात वस्तू-सेवा यांची निर्मिती करता येणे शक्य होते. यामुळे जनसामान्यांच्या राहणीमानात सुधारणा होऊन समाजात शिक्षण व आरोग्य सुधारते, गरिबी दूर होते आणि एकूण आयुष्याची गुणवत्ता तंत्रज्ञानाचा अवलंब करून उंचावली जाते, असे मत होविट यांनी मांडले. पूर्वी विख्यात ऑस्ट्रियन अर्थतज्ज्ञ योझेफ आलोईस शुंपेटर यांनी ‘सर्जनशील विनाश’ ही संकल्पना त्यांच्या कॅपिटॅलिजम, सोशालिजम अँड डेमॉक्रसी या इ. स. १९४२ मधील पुस्तकात मांडली होती. या संकल्पनेचा स्वीकार करून या अर्थतज्ज्ञांनी त्याचा विस्तार आणि पुनर्मांडणी केलेली आढळते. पूर्वीच्या वस्तूंचा विनाश होतो, त्या नामशेष होतात आणि त्याजागी नव्या वस्तू वापरात येतात. जुना कॅमेरा इतिहासजमा होऊन डिजिटल कॅमेरा वापरात येणे हे याचे एक ठळक उदाहरण होय. जुनी छोटी दुकाने बाजूला पडून आता मॉल किंवा इ–कॉमर्स पद्धतीने व्यवहार होतात. उत्पादनाच्या अनेक जुन्या पद्धतींच्या जागी आता कृत्रिम बुद्धिमत्ता हा एक पर्याय समोर आला आहे. ही प्रक्रिया सतत होत राहते, हे प्रगतीचे लक्षण आहे आणि असे पुढेही होत राहील, असे त्यांच्या विवेचनाचे सार आहे. आर्थिक मंदी, कुंठितावस्था, बेरोजगारी, विषमता, समस्यांची सोडवणूक नवप्रवर्तनाच्या साह्याने करणे शक्य आहे, असे या अर्थतज्ज्ञांचे मत होते. अघीओन आणि होविट यांनी मिळून लिहिलेल्या द इकॉनॉमिक्स ऑफ ग्रोथ (२००८) या पुस्तकात त्यांच्या विचारांचे विस्तृत विवेचन आहे. तसेच त्या दोघांनी लिहिलेल्या इन्डोजिनस ग्रोथ थेअरी (१९९८) या आधीच्या पुस्तकातही हे मुद्दे विशद केलेले आहेत.
होविट यांनी नवीन तंत्रज्ञानापुढे जुन्या उद्योगांचा ऱ्हास होऊन आर्थिक वृद्धी कशी साध्य होते, हे प्रतिमानाच्या साह्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. ‘इन्व्हेंशन इन इकॉनॉमिक्स ग्रोथ’ म्हणजेच नवीन कल्पनांवर आधारित आर्थिक विकासाचा सिद्धांत हा आधुनिक अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान देणारा ठरला आहे, यात शंका नाही. त्यांच्या सर्जनात्मक विनाश या संकल्पनेवरील लेखनामुळे ते शुम्पीटर यांची वैचारिक परंपरा चालवतात, असे दिसून येते.
होविट यांची महत्त्वाची पुस्तके : द केन्सीयन रिकव्हरी अँड अदर एसे, १९९०; द इम्प्लिकेशन ऑफ नॉलेड-बेस्ड ग्रोथ फॉर मायक्रोइकॉनॉमिक्स पॉलिसी (संपा.), १९९६; इन्डोजिनस ग्रोथ थेअरी, १९९८; मनी, मार्केट अँड मेथड : एसे इन हॉनर ऑफ रॉबर्ट डब्ल्यू क्लॉव्हर (संपा.), १९९९.
संदर्भ : https://www.nobelprize.org/prizes/economic-sciences/2025/
समीक्षक : विनायक देशपांडे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.