वास्तुकलेतील एक संज्ञा. दिक्संयोजन किंवा दिशानिर्देश याला इंग्रजी भाषेत ओरिएंटेशन अशी संज्ञा असून लॅटिन शब्द ओरिएन्स, ओरिएंटम म्हणजे उगवता सूर्य या शब्दापासून तयार झालेला आहे. ही संज्ञा मुख्यत: एखाद्या वास्तू, इमारत किंवा जागेची चार मुख्य दिशा आणि चार उपदिशांच्या संदर्भात केलेली योग्य मांडणी दर्शविते. योग्य दिक्संयोजनामुळे वास्तुनिर्मितीत सूर्यप्रकाश, वारा, उष्णता, आणि ऊर्जा यांचा योग्य वापर करता येतो.
मानवी संस्कृतीत दिशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मेसोपोटेमिया, इजिप्त तसेच कोलंबसपूर्व मध्य अमेरिकेत इमारतींचे प्रवेशद्वार आणि मार्ग पूर्वे दिशेला म्हणजेच उगवत्या सूर्याच्या दिशेने असल्याचे निदर्शनास येतात. तथापि धार्मिक आणि व्यावहारिक बाबतींत दिक्संयोजनामध्ये बदल झालेत. मुस्लिम लोक प्रार्थनेच्यावेळी पवित्र स्थळ मक्केच्या दिशेने तोंड करतात. त्यानुसार मशिदींची रचना मिहराब किंवा प्रार्थनेची जागा मक्केच्या दिशेने असेल अशा प्रकारची असते. चर्चची रचना सामान्यतः ॲप्स किंवा मुख्य वेदी पूर्वेकडील टोकाला ठेवून केलेली असते. सुरुवातीच्या चर्चमध्ये वास्तुविशारदांनी सामान्यतः चर्चची रचना पश्चिमेकडे केलेली दिसून येते. उदा., रोममधील ओल्ड सेंट पीटरच्या बॅसिलिका. भारतीय मंदिरे बहुतांश पूर्वाभिमुख असून त्यामुळे सूर्यप्रकाश थेट गर्भगृहात पडतो. उदा., कोणार्क सूर्य मंदिर. नगरे प्रामुख्याने नदीच्या तीरावर अस्तित्वात होती. सिंधू संस्कृतीतील रस्ते उत्तर-दक्षिण आणि पूर्व-पश्चिमदिशेत काटकोनात (grid pattern) आखलेले होते. तेथे उत्कृष्ट जलनिस्सारणाचे उपयोजन केले होते. कौटिल्यच्या नगररचनांच्या अनेक सिद्धांतांपैकी एका प्रकारामध्ये नगराची संरचना दिशांना लक्षात घेऊन करण्यात आल्याची दिसते. नगरांची रचना हवामान व वाऱ्याचा अभ्यास करून राजवाडे, बाजारपेठ, जलस्रोत इ. योग्य दिशेत केली जात होती.
दिक्संयोजन, भारतीय उपखंडातील : प्राचीन भारतात दिक्संयोजन केवळ धार्मिक नसून ते विज्ञान, पर्यावरण, खगोलशास्त्र आणि अभियांत्रिकी यांवर आधारित होते. पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या मुख्य भौगोलिक दिशांशिवाय मराठीत आग्नेय, नैऋत्य, वायव्य, आणि ईशान्य उपदिशांही दिशानिर्देशनाकरिता महत्त्वाच्या ठरतात. एखाद्या ठिकाणचे स्थान निश्चित करण्यासाठी मुख्यत: दिशेचा वापर होतो.
भारतीय उपखंडात मुख्य भौगोलिक दिशा पूर्व (East) ही सूर्योदयाची दिशा, पश्चिम (West) ही सूर्यास्ताची दिशा, उत्तर (North) ही थंड व स्थिर दिशा, तर दक्षिण (South) ही उष्ण दिशा या प्रकारांनी ओळखली जातात. तर उपदिशा मानवी जीवनातील आरोग्य, आर्थिक स्थिती, मानसिक संतुलन अशा विविध क्षेत्रांवर परिणाम करतात. दिक्संयोजनामुळे नकाशे (Maps), हवामान, वाऱ्याची दिशा, सूर्यप्रकाश आणि भूआकृती यांचा अभ्यास अधिक अचूकपणे करता येतो.उपदिशा यामागील तत्त्वज्ञान खालीलप्रमाणे :
ईशान्य : उत्तर आणि पूर्व दिशांमधील दिशा. भारताच्या उत्तरेकडील हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे अती शीत वारे आणि थंडी थांबविण्यास मदत होते. त्यामुळे प्रामुख्याने भारतीय उपखंडाचे हवामान आल्हाददायक होते. तसेव हिमालयात उगम पावणाऱ्या नद्यांना बारमाही पाणी असते. ईशान्येकडून उगवतीचा सूर्य भारतात प्रवेश करतो. त्यामुळे सौर ऊर्जेचा अखंड स्रोत मिळतो. ईशान्य दिशा ही दैवी (ईश) असल्याचे मानतात. या दिशेचे तत्त्व जल (पाणी) असून ते प्रगतीला आणि वाढीला पोषक असते. ज्ञान आणि अध्यात्म या दिशेला अनुकूल असल्याचे मानले जाते. वास्तुशास्त्रात ही दिशा पुरोगामी मानली जाते.
आग्नेय : पूर्व आणि दक्षिण दिशांमधली दिशा. भारताचे भौगोलिक स्थान पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात येत असल्याने भारतात सूर्य पूर्व दिशेला उगवतो आणि तो दक्षिणेकडे मार्गक्रमण करून पश्चिमेला मावळतो. भारतीय उपखंडात मध्यान्हीचा सूर्य हा आग्नेय आणि दक्षिणेकडे असतो. मध्यान्ही सूर्याची किरणे पृथ्वीवर लंबरूप पडतात आणि उत्सर्जित उष्णता ही जमिनीला तापवून आग्नेय आणि दक्षिण दिशेला असलेल्या इमारतींच्या दारा-खिडक्यांतून आतल्या जागांमध्ये संक्रमित होते. त्यामुळे भारतीय वास्तुशास्त्रामध्ये इमारतींना आग्नेय आणि दक्षिण दिशेला फारच कमी दारे किंवा खिडक्या ठेवतात. या दिशेचे तत्त्व अग्नी असून ऊर्जा आणि अन्ननिर्मिती या दिशेला अनुकूल असल्याचे मानले जाते. अंतर्मुख कार्यप्रणाली असलेल्या जागा या ठिकाणी प्रस्तावित केल्या जातात. उदा., स्वयंपाक खोली, कोठी, कोठार, जिना, इत्यादी.
नैऋत्य : दक्षिण आणि पश्चिम दिशांमधली दिशा. भारतात नैऋत्य मौसमी वाऱ्यांमुळे पाऊस पडतो. पावसानंतर वातावरण नवनिर्मिती होण्यास मदत मिळते. या दिशेचे तत्त्व जमीन किंवा पृथ्वी (Earth) असून स्थैर्य आणि सुरक्षितात या दिशेच्या अनुषंगाने अनुकूल असल्याचे मानले जाते. भारतीय वास्तुशास्त्रामध्ये ईशान्य प्रमाणेच महत्त्वाच्या खोल्या या दिशेला उपयोजिल्या जातात.
वायव्य : पश्चिम आणि उत्तर दिशांमधील दिशा. वायव्य शब्दाची व्युत्पत्ती वायू (Wind) या शब्दापासून झालेली आहे. भारतात या उपदिशेला अफगाणिस्थान, पाकिस्तान यांसारख्या वायव्येकडील देशांपासून येणारे वारे महत्त्वाचे ठरतात. भारतीय उपखंडाप्रमाणे या दिशेला नगण्य महत्त्व आहे. या दिशेचे तत्त्व वायू असून कमी हालचाल आणि कमी संबंधीत अशा खोल्या या दिशेला आयोजित केलेल्या दिसून येतात.
महत्त्व आणि उपयोग : दिक्संयोजित वास्तूमध्ये शरीराला पूर्वेकडून येणारा सूर्यप्रकाश (पूर्वेकडून) उपयुक्त ठरतो आणि योग्य वायुवीजनामुळे ताजी हवा मिळते. त्यामुळे जीवन आरोग्यदायी राहण्यास मदत होते. नैसर्गिक प्रकाश आणि खेळत्या हवेमुळे ऊर्जेची बचत होते. प्रकाश आणि हवा योग्य प्रमाणात मिळाल्यास मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते.
अध्यात्म आणि पूजा-विधी संपन्न करण्याकरिता ईशान्य दिशा, तर ध्यान धारणा करण्याकरिता पूर्व दिशेचा विचार केला जातो, त्यामुळे दिशेला आध्यात्मिक आणि सांस्कृतिक महत्तव आहे. दिक्संयोजनामुळे हवामानाचा अभ्यास सुलभ होतो.
बांधकाम क्षेत्रात दिक्संयोजन महत्त्वाचे ठरते. इमारतीचा लांब भाग पूर्व-पश्चिम दिशेत ठेवणे फायदेशीर, तर उत्तर-दक्षिण बाजूने खिडक्या ठेवल्यास प्रकाश व हवा चांगली मिळते. सूर्यप्रकाशाचा वापर जास्तीत जास्त होण्याकरिता पूर्वेकडे खिडक्या ठेवल्यास सकाळचा सूर्यप्रकाश मिळतो, तर पश्चिमेकडील भिंती उष्णतेपासून संरक्षण करण्यास मदत करतात. स्थानिक वाऱ्याच्या दिशेनुसार खिडक्या व दरवाजे ठेवणे उत्तम असते. संमुखवातन इमारतीच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. दक्षिण व पश्चिम बाजूस जाड भिंतींचा वापर किंवा झाडे लावून नैसर्गिक सावली निर्माण केल्यास उष्णतेचे नियंत्रण होते.
स्थापत्य अभियांत्रिकीत दिक्संयोजनाचे तांत्रिक महत्त्व आहे. एखाद्या भूखंडाची निश्चिती करण्याकरिता दिशा आणि त्याचा आकार विचारात घेतला जातो, तसेच रस्त्याची दिशा महत्त्वाची ठरते. भूखंडात सौर-तावदाने दक्षिण दिशेला लावल्यास अधिक ऊर्जा मिळते. हरित इमारतींत दिक्संयोजन महत्तवपूर्ण भूमिका निभावते. थोडक्यात ऊर्जा कार्यक्षमता वाढविण्याच्यादृष्टीने दिक्संयोजन महत्त्वाचे ठरते. त्यामुळे नैसर्गिक संसाधनाचा योग्य वापर होऊन कार्बन उर्त्सन कमी होते.
वास्तुशास्त्रामध्ये वास्तूच्या नकाशामध्ये नेहमी उत्तर दिशा ठळक चिन्हाने दर्शविलेली असते. उत्तर दिशेमुळे सूर्याच्या किरणांचा मार्ग (Sun-path), वाहणारे वारे आणि त्यांच्या दिशा समजतात. वास्तुविशारद सूर्यकिरणांचा मार्ग आणि वाहणाऱ्या वाऱ्यांची दिशा लक्षात घेऊन इमारतीची रचना करतात आणि त्यामुळे इमारतीच्या अंतर्गत जागांमध्ये भरपूर सूर्यप्रकाश आणि वाहणारे वारे यांचा अंतर्भाव होऊन इमारत शाश्वत होण्यास मदत होते.
वास्तुपुरुष मंडल
भारतीय वास्तुशास्त्रामध्ये दिशांवर अधारित वास्तुपुरुष मंडलाला महत्त्व आहे. वास्तुपुरुष मंडल हे वास्तुशास्त्रातील एक भौमितिक आकृती असून इमारतीच्या आरेखनावर एका वैश्विक अस्तित्वाचे प्रतिनिधित्व करते. नैसर्गिक ऊर्जेशी सुसंगत होण्यासाठी अवकाशीय व्यवस्था आणि दिक्संयोजन निर्देशित करते. हि एक ग्रीड प्रणाली (बहुतेकदा ९ X ९ किंवा ६४ चौरस) असून मुख्य आणि उपदिशांशी संरेखित करतात. यामध्ये जीवनाचे आणि देवतांचे विविध पैलू दर्शविणारी विविध क्षेत्रे आहेत. विशेषतः वास्तुपुरुषचे ईशान्य कडील डोके आणि नैऋत्येकडील पाय यांचे स्थान सकारात्मक ऊर्जेच्या प्रवाहाची महत्त्वपूर्ण आहे.
मंडलातील विविध विभाग विशिष्ट कार्यासाठी पुढीलप्रमाणे आदर्शवत मानन्यात आली आहेत : ईशान्य ही प्रार्थना कक्ष, ध्यान धारणा किंवा अभ्यासासाठी उपयुक्त असते. आग्नेय ही स्वयंपाक घरासाठी उत्कृष्ठ असून अग्नी आणि क्रियाकपालांचे प्रतिनिधित्व करते. नैऋत्य ही शयन कक्ष किंवा साठवणीच्या क्षेत्रांसाठी वापरले जाऊ शकते, ते स्थिरता आणि शक्तीचे प्रतीक आहे. वायव्य ही अतिथी कक्ष किंवा साठवणीच्या क्षेत्रांसाठी वापरले जाऊ शकते, ते हालचाल आणि हवेचे प्रतीक आहे.वास्तुपुरुष मंडलाच्या तत्त्वानुरूप तयार केलेली वास्तू सुसंवादी आणि समृद्ध राहणीमान निर्माण करते, अशी मान्यता आहे.
दिक्संयोजन हे सूर्याच्या किरणांमधील दैनंदिन आणि हंगामी बदलांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी केले जाते. अंतिमतः, एखाद्या वास्तूची इष्टतम दिशा ही तिचे कार्य, स्थान आणि उष्णता, प्रकाश, आर्द्रता व वारा यांसारख्या प्रचलित पर्यावरणीय घटकांपैकी एक महत्त्वाचा घटक आहे.
संदर्भ :
- https://archi-monarch.com/town-planning-principles-in-ancient-india/
- https://www.magicbricks.com/blog/vastu-purusha-mandala-architecture/122136.html
- https://architectureideas.info/2009/12/scientific-vastu-principle-site-orientation/#google_vignette
समीक्षक : प्रतिक किनोटकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.