आठ दिशांचे पालन करणाऱ्या आठ देवांना ही संज्ञा आहे. ‘अष्ट’ म्हणजे आठ आणि ‘दिक्पाल’ म्हणजे दिशा (दिक्) यांचे पालन करणारे किंवा रक्षण करणारे देव. अष्टदिक्पालांची संकल्पना प्राचीन वैदिक साहित्य, पुराणे, आगम व वास्तुशास्त्र यांमध्ये आढळते. यामुळे मंदिररचना, शिल्पकला, नगररचना आणि धार्मिक विधींमध्ये या देवतांचा महत्त्वपूर्ण वापर दिसून येतो. भारतीय धार्मिक व तात्त्विक परंपरेमध्ये विश्वाची रचना ही केवळ भौतिक नसून दैवी शक्तींनी नियंत्रित व संरक्षित अशी मानली जाते. या संकल्पनेत ‘दिशा’ ही केवळ भौगोलिक संज्ञा नसून तिला दैवी अधिष्ठान आहे. हिंदू, बौद्ध व जैन परंपरेत या संकल्पनेला विशेष महत्त्व आहे. अष्टदिक्पालांची संकल्पना केवळ धार्मिक नसून तात्त्विक दृष्टिकोनातूनही ती महत्त्वाची आहे.

दिशांचे रक्षण करणार्‍या देवतांची पुराणकथा अनेक ठिकाणी आढळते. जसे भारतात अष्टदिक्पाल कल्पिले आहेत. तर जपानमध्ये बौद्ध पुराणकथांत चार दिशांचे धृतराष्ट्रादी चार दिक्पाल मानले आहेत. ईजिप्तमध्ये न्यायदानाच्या वेळी ओसायरिसच्या पुढे उभे असलेले व मृतांचे रक्षक असलेले होरसचे चार पुत्र हे चार दिशांचेही रक्षक मानले जाते. मेक्सिकन लोकांनीही चार दिशांचे चार देव मानले आहेत. तर अमेरिकेतील अल्गॉक्वियन लोकांनीही चार दिशांना चार देवता मानल्या आहेत.

इंद्र, अग्‍नी, यम, निर्ऋती, वरुण, वायू, कुबेर आणि ईशान हे अनुक्रमे पूर्व, आग्नेय, दक्षिण, नैर्ऋत्य, पश्‍चिम, वायव्य, उत्तर आणि ईशान्य ह्या आठ दिशांचे पालन करणारे अष्टदिक्पाल म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रत्येक दिशेवर एक विशिष्ट देवता अधिष्ठित आहे. या देवतांना त्या दिशेचे संरक्षण, संतुलन व नियंत्रण करण्याची जबाबदारी दिली गेली आहे.

  • इंद्र (पूर्व दिशा) : या दिशेला ऐश्वर्यलक्ष्मीचे स्थान आहे. पूर्व दिशेचा अधिपती इंद्र हा देवांचा राजा मानला जातो. त्याचे वाहन ऐरावत आहे. इंद्र देवता ही शक्ती व नेतृत्वाची मूल्ये दर्शवते. तो वज्रधारी असून पर्जन्य, वीज आणि युद्धाचा देव आहे. पूर्व दिशा ही उगवत्या सूर्याची दिशा असल्याने ती नवजीवन, ऊर्जा व आरंभाचे प्रतीक असल्याचे मानले जाते.
  • अग्नी (दक्षिण-पूर्व दिशा) : धान्यलक्ष्मीचे स्थान आग्नेय दिशेला असते. अग्नी हा आग्नेय दिशेचा दिक्पाल असून मेष (मेंढी) हे त्याचे वाहन आहे. तसेच तो शुद्धीकरण व ज्ञानाची मूल्ये दर्शवतो. यज्ञ, हवन आणि देव-मानव यांच्यातील संवादाचा माध्यम म्हणून अग्नीचे महत्त्व अत्यंत मोठे आहे. त्यास शुद्धीकरण व परिवर्तनाचे प्रतीक मानले जाते.
  • यम (दक्षिण दिशा) : आदिलक्ष्मीचे स्थान या दिशेला असते. दक्षिण दिशेचा अधिपती यम हा मृत्यूचा देव मानला असून त्याचे वाहन म्हैस (महिषा) आहे. यम देवता ही न्याय व नैतिकतेची मूल्ये दर्शवते. तो धर्मराज म्हणूनही ओळखला जातो. यमाला न्याय, नैतिकता आणि कर्मफळ यांचे प्रतीक मानले जाते.
  • निऋती (दक्षिण-पश्चिम दिशा) : भूत, प्रेत, पिशाच, राक्षस अशा वाईट शक्तींची ही दिशा आहे. नैऋत्य दिशेची देवता नैऋती किंवा निऋती असून त्याचे गाढव हे वाहन आहे. ही देवता विनाश, अशुभता व अराजकतेशी संबंधित आहे. ती नकारात्मक शक्तींचे प्रतिनिधित्व करते आणि त्यांचे नियंत्रण करते, अशी सर्वसाधारण धारणा आहे.
  • वरुण (पश्चिम दिशा) : ही गजलक्ष्मीची दिशा असल्याने ती शुभ असल्यास संपत्ती मिळते. पश्चिम दिशेचा अधिपती वरुण हा जलदेवता असून मकर हे त्याचे वाहन आहे. हा सत्य, नियम आणि शपथांचे प्रतीक मानला जातो. तो न्याय आणि नीतिमत्तेचा रक्षक मानला जातो. समुद्र व पाण्याशी त्याचा घनिष्ठ संबंध आहे. तो सर्व प्रकारच्या जलस्रोतांचा अधिपती असल्याचे मानले जाते.
  • वायू (उत्तर-पश्चिम दिशा) : वायव्य दिशेचा दिक्पाल. तो प्राणशक्तीचा देव असून हरीण हे त्याचे वाहन आहे. तो जीवन, गती व ऊर्जा यांचे प्रतीक आहे. तर विजयलक्ष्मीची दिशा असल्याने ही दिशा शुभ असल्यास शत्रूवर विजय प्राप्त करून देते असेही मानले जाते.
  • कुबेर (उत्तर दिशा) : उत्तर दिशेचा अधिपती कुबेर हा धनाचा देव असून त्याचे वाहन दशाश्वथ अथवा अश्व आहे. कुबेर देवता ही संपत्ती व संतुलन मूल्ये दर्शवते. त्याला यक्षांचा अधिपती मानले जाते. ही बुधाची दिशा असल्याने ती शुभ असल्यास बुद्धीचा विकास चांगला होतो, अशी सर्वसाधारण मान्यता आहे.
  • ईशान (उत्तर-पूर्व दिशा) : ईशान्य दिशेचा अधिपती ईशान हा भगवान शिवाचे एक रूप मानले असून त्याचे वाहन वृषभ (बैल) आहे. ही दिशा आध्यात्मिकता, ज्ञान व पवित्रतेचे प्रतीक आहे. पुराणकथेनुसार अष्टलक्ष्मींपैकी संतानलक्ष्मीची ही दिशा असल्याने दिशा निर्दोष शुभ असता संततीसाठी लाभदायक असते.

वास्तुशास्त्रातील महत्त्व : भारतीय वास्तुशास्त्रात अष्टदिक्पालांचा उपयोग अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. घर, मंदिर किंवा नगर रचताना प्रत्येक दिशेचे गुणधर्म लक्षात घेतले जातात व त्यानुसार बांधकाम केले जाते. त्यामुळे जीवनात संतुलन व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते, असे मानले जाते.

कला व स्थापत्यातील भूमिका : अष्टदिक्पालांचे चित्रण भारतीय मंदिरशिल्पात मोठ्या प्रमाणावर आढळते. मंदिराच्या भिंती, स्तंभ किंवा प्रवेशद्वारांवर या देवतांची प्रतिमा कोरलेली दिसून येते. विशेषतः दक्षिण भारतीय मंदिरांमध्ये अष्टदिक्पालांची सुंदर शिल्पे आढळतात.

बौद्ध व जैन परंपरेतील उल्लेख : अष्टदिक्पालांची संकल्पना बौद्ध व जैन धर्मातही स्वीकारली गेली आहे. बौद्ध धर्मात त्यांना ‘लोकपाल’ अशी संज्ञा आहे. जैन मंदिरांमध्येही दिशांचे रक्षण करणाऱ्या देवतांचे चित्रण आढळते.

अनेक धर्मकृत्यांत अष्टदिक्पालांना नमन असते. त्यांना अष्टग्रहही कल्पिले आहेत.

संदर्भ :

  • Dalal, Roshen, Hinduism : An Alphabetical Guide, New Delhi, 2010.
  • Dallapiccola, Anna, Dictionary of Hindu Lore and Legend, London, 2002.
  • Hastings, James, Ed. Encyclopaedia of Religion and Ethics, Edinburgh, 1908–1926.
  • Lochtefeld, James G. The Illustrated Encyclopaedia of Hinduism, New York, 2002.

समीक्षक : प्रभाकर किर्तनकार