परिचर्या संशोधनातून आरोग्यविषयीचे ज्ञान विकसित होते. आरोग्य समस्या किंवा व्यंग असलेल्या व्यक्तींची काळजी घेण्याकरिता तसेच वास्तविक किंवा संभाव्य आरोग्य समस्यांना प्रभावीपणे प्रतिसाद देण्याची क्षमता वाढविण्याकरिता असणाऱ्या विविध परिचर्या क्रियांची माहिती देखील परिचर्या संशोधनातून प्राप्त होते.
परिचर्या संशोधनाची काही ठळक वैशिष्ट्ये खालील प्रमाणे आहेत :
- परिचर्या संशोधन ही एक शास्त्रीय प्रक्रिया असून परिचर्या शिक्षणात शिक्षक व विद्यार्थी यांना अध्ययन प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर, प्रश्नांवर व समस्यांवर उपाय किंवा उत्तरे शोधण्याच्या दृष्टिकोनातून केले जाते.
- परिचर्या संशोधन हे रुग्णालयातील रुग्णसेवा किंवा /आणि सामाजिक सेवा यामधील येणाऱ्या अडचणींवर, प्रश्नांवर व समस्यांवर उपाय किंवा उत्तरे शोधण्याच्या दृष्टिकोनातून केले जाते.
- परिचर्या संशोधन हे परिचर्या व्यवस्थापनामध्ये आणि / किंवा परिचर्या प्रशासनामध्ये येणाऱ्या अडचणींवर, प्रश्नांवर व समस्यांवर उपाय किंवा उत्तरे शोधण्याच्या दृष्टिकोनातून केले जाते.
- परिचर्या संशोधनात नवीन व / किंवा अस्तित्वात असणारी माहिती नवीन स्रोतांकडून घेतली जाते आणि नव्या हेतूसाठी नवी माहिती गोळा केली जाते.
- परिचर्या संशोधन हे निरीक्षण, अनुभव व प्रयोगांवर आधारित पुराव्यांवर आधारभूत असते.
- परिचर्या संशोधनामध्ये सामान्यीकरण तत्त्वे, सिद्धांत विकसित करून ती भविष्यात उपयोगात आणली जातात.
- परिचर्या संशोधनात कोणत्याही गोष्टीविषयी पद्धतशीर आखणी करून अभ्यास केला जातो.
- परिचर्या संशोधनात फक्त त्याच कारणीभूत परिस्थितीचा समावेश करतात की जी अभ्यासाच्या वस्तुनिष्ठाशी संबंधित असते.
- परिचर्या संशोधनात अचूक माहिती मिळविण्यासाठी तर्कशास्त्रीय रीत्या पद्धतशीरपणे, औपचारिक तपासणी किंवा अभ्यास प्रक्रियेच्या दिशेने अभ्यास केला जातो.
- परिचर्या संशोधन करताना कौशल्याची व नैपुण्याची गरज असते.
- परिचर्या संशोधन हे अनुभवजन्य असते. ते प्रत्यक्ष अनुभव व अचूक निरीक्षणांवर अवलंबून असून त्यामध्ये ज्या गोष्टींचा अभ्यास केला जातो त्याचे स्पष्टीकरण तथा वर्णन दिले जाते.
- परिचर्या संशोधनात माहितीचा खात्रीचा स्रोत मिळविण्यासाठी अनुमानिक व अनुमानजन्य कारण मीमांसेचा समावेश केला जातो.
- परिचर्या संशोधन हे अतिशय संयमाने आणि काळजीपूर्वक केले जाते गरजेनुसार धैर्याची ही गरज भासते.
- परिचर्या संशोधनात संशोधकाला प्रमाणित व सर्वसमावेशक परिणाम मिळतात.
- परिचर्या संशोधनातील नोंदी किंवा त्याचा अहवाल हा काळजीपूर्वक व अचूक मांडला जातो.
संदर्भ :
- बन्स नॅन्सी, ग्रुव्ह सुझन. अंडरस्टँडिंग नर्सिंग रिसर्च. चौथी आवृत्ती २००८.
- बसवंत अप्पा बि. टी. नर्सिंग रिसर्च, तिसरी आवृत्ती २०१४.
- शर्मा सुरेश. नर्सिंग रिसर्च अँड स्टॅटिस्टिक्स. तिसरी आवृत्ती २०१८.
- सामंत कुसुम, शुश्रूषा संशोधन, पुनर्मुद्रण २०११.
समीक्षक : सरोज वा. उपासनी
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.