आम्हारिक ही आफ्रो-आशियाई या भाषाकुळातील सेमिटिक या उपगटातील भाषा आहे. या भाषेला आमारिग्ना (Amarigna) किंवा आमारीन्या (Amarinya) या नावानेही ओळखले जाते. ही भाषा आफ्रिका खंडातील इथिओपियाची अधिकृत ‘राष्ट्रभाषा’ आहे. आम्हारिक प्रामुख्याने इथिओपियाच्या मध्य आणि उत्तर भागात बोलली जाते. आम्हारिकला ‘लेसना नेगूस’ किंवा ‘यह निगुस क्वाक्ववा’ म्हणजे राजभाषा असे पुरातनकाळापासून संबोधिले जाते. आम्हारिक भाषेचा ज्ञात इतिहास सुमारे ७०० वर्षांपेक्षा अधिक जुना आहे. तेराव्या शतकापर्यंत इथिओपियाची राजभाषा आणि साहित्याची भाषा म्हणून ‘गीझ’ (Ge’ez) या प्राचीन सेमिटिक भाषेचा वापर केला जात होता. तोपर्यंत आम्हारिक ही फक्त स्थानिक बोली म्हणून अस्तित्वात होती. सोलोमोनिक राजघराण्याच्या उदयापासून आम्हारिकचा वापर हळूहळू वाढू लागला. विशेषतः शाही दरबार आणि सैन्याच्या शाही गाण्यांमध्ये आम्हारिक भाषेची सर्वांत जुनी लिखित उदाहरणे आढळतात. सोळाव्या शतकात इथिओपियन सैन्याने लिहिलेल्या काही प्रशासकीय नोंदी आणि खाजगी पत्रांमध्येही आम्हारिक भाषेचा वापर आढळतो.

गीझ, अरबी, ओरोमो, इटालियन यांसारख्या विविध भाषांचा आम्हारिक भाषेवर प्रभाव पडलेला आहे. तसेच ती इथिओपियन चर्चची प्राचीन आणि धार्मिक भाषा असलेल्या ‘गीझ’च्या खूप जवळची आहे. धार्मिक, साहित्यिक आणि शास्त्रीय शब्द थेट ‘गीझ’मधून आम्हारिकमध्ये आले आहेत. अरबी भाषिकांशी झालेल्या संपर्कामुळे, आम्हारिकने व्यापार, धर्म आणि प्रशासनाशी संबंधित अनेक शब्द अरबीमधून स्वीकारले. इथिओपियातील सर्वांत मोठी स्थानिक भाषा असलेल्या ओरोमोतील स्थानिक वनस्पती, प्राणी आणि सांस्कृतिक संकल्पनांशी संबंधित अनेक शब्द आम्हारिकमध्ये सामावले आहेत. विसाव्या शतकात इथिओपियावर राज्य केलेल्या इटालियन भाषेचाही प्रभाव तिच्यावर पडला आहे. आधुनिक काळात जागतिकीकरण, तंत्रज्ञान आणि शिक्षणामुळे इंग्रजी शब्दांचा प्रभावही या भाषेवर पडला आहे. या सर्व भाषांच्या प्रभावामुळे आम्हारिकचा शब्दसंग्रह आणि भाषिक रचना अधिक समृद्ध झाली आहे. आम्हारिक भाषेच्या शब्दसंग्रहावर अरबी आणि कुशिटिक भाषांचा प्रभाव आहे. विशेषतः ओरोमो भाषेचा मोठा प्रभाव पडला आहे.

आम्हारिक भाषेत ७ स्वर आणि ३० व्यंजने आहेत. प्रत्येक अक्षर एक व्यंजन आणि एक स्वर यांच्या मिश्रणाने बनलेले असते. आम्हारिक शब्दांची रचना व्यंजन-स्वर-व्यंजन-व्यंजन (CVCC) अशी असते. शब्द व्यंजनाने किंवा स्वराने सुरू होतात, पण दोन किंवा अधिक व्यंजनांच्या समूहाने सुरू होत नाहीत. शब्दाच्या शेवटी एकापेक्षा अधिक व्यंजने येऊ शकतात. मात्र शब्दांच्या सुरुवातीला एकापाठोपाठ व्यंजने येत नाहीत. (जसे की इंग्रजीतील ‘street’ मधील str).

आम्हारिक भाषा तिच्या बहिर्गामी रुद्धकंठद्वारीय व्यंजनांसाठी (ejective consonants) ओळखली जाते. जे उच्चारताना हवेचा प्रवाह घशातून दाबून बाहेर काढला जातो. स्वरयंत्राच्या वरच्या बाजूला हवा अडवून आणि फुप्फुसातील हवेचा दाब न वापरता ती हवा मुक्त करून ध्वनी निर्माण केले जातात. आम्हारिक भाषेत /p’/, /t’/, /tʃ’/, /k’/, /s’/ हे पाच बहिर्गामी रुद्धकंठद्वारीय ध्वनी आढळतात. आम्हारिक भाषेची वाक्यरचना कर्ता-कर्म-क्रियापद या क्रमाने होते. क्रियापदांना उपसर्ग आणि प्रत्यय जोडून त्यांचे काळ, लिंग आणि वचन यांनुसार रूप बदलते. अनेकवचन दर्शवण्यासाठी ‘-očč’ किंवा ‘-oččəw’ हा प्रत्यय वापरला जातो (उदा., bét – घर, bétočč – घरे). काळ दर्शवण्यासाठी क्रियापदाच्या रूपात बदल होतो. उदा., näggärä (त्याने सांगितले) हे भूतकाळातील रूप आहे, तर yənnägrall (तो सांगेल) हे भविष्यकाळातील रूप आहे.

आम्हारिकच्या बोलीभाषांमध्ये फारसा फरक आढळत नाही. असे असले तरी आम्हारिक भाषेमध्ये विविध स्थानिक बोली आहेत. आम्हारिकच्या सर्व बोली एकमेकांना परस्पर-बोधगम्य (mutually intelligible) आहेत. म्हणजेच, एका बोलीतील व्यक्ती दुसऱ्या बोलीतील व्यक्तीचे बोलणे सहज समजू शकते. आम्हारिकच्या प्रामुख्याने गोंडार (Gondar), गोज्जमी (Gojjami), शोवा (Showa) ह्या तीन बोली मानल्या जातात. इथिओपियाच्या उत्तर भागातील गोज्जमी बोली आणि दक्षिण भागातील शोवा बोली यांच्यात उच्चार, शब्दसंग्रह आणि व्याकरण यामध्ये काही अंशी फरक आढळतो. इथिओपियाची राजधानी असलेल्या अदिस अबाबा (Addis Ababa) येथे बोलली जाणारी बोली ही प्रमाणभाषा मानली जाते. उत्तर भागातील गोज्जमी बोलीचे स्वरूप इतर बोलींपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आहे. मोठ्या नद्या आणि डोंगराळ भागांसारख्या नैसर्गिक अडथळ्यांमुळे या बोलीप्रदेशाशी भाषिक संपर्क कमी होतो. त्यामुळे गोज्जमी बोली अधिक वेगळी राहिली.

आम्हारिक भाषा इथिओपिक लिपीमध्ये लिहिली जाते. ही लिपी डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. या लिपीची लिहिण्याची मूळ पद्धत उजवीकडून डावीकडे होती. मात्र ग्रीक लोकांच्या सान्निध्यामुळे ग्रीक लिपीचा प्रभाव या लिपीवर पडून, लोक डावीकडून उजवीकडे लिहू लागले. या लिपीच्या प्रत्येक चिन्हात व्यंजन व स्वर यांचा समावेश असतो.

संदर्भ :

समीक्षक : सोनल कुलकर्णी-जोशी


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.