चर्च वास्तूमधील प्रार्थनास्थळाची विशिष्ट जागा. सामान्यतः ही जागा चर्चच्या आत असून चर्च-संस्थापकाच्या मृत्यूनंतर प्रार्थनागीते गाण्यासाठी दान केलेली असते. गायन करणे या अर्थाच्या chanter या ग्रीक शब्दावरून चॅन्ट्री शब्द तयार करण्यात आला असून प्रार्थना करण्यासाठी दिलेली देणगी असाही त्याचा अर्थ होतो.
पश्चिम यूरोपमध्ये १३ व्या शतकापासून चॅन्ट्री किंवा चॅन्ट्री चॅपल्सची स्थापना सुरू झाली. पॅरिसमधील नोत्र दाम कॅथीड्रलमध्ये १२५८ मध्ये एक चॅन्ट्री जोडण्यात आली. १४ व्या शतकात चॅन्ट्री चळवळ धार्मिक जीवनाचे एक प्रकटीकरण म्हणून प्रस्थापित झाली. इंग्लंडमधील सर्वांत जुनी चॅन्ट्री ही लिंकन कॅथीड्रलमधील बिशप ह्यू ऑफ वेल्स यांची आहे (१२३५). प्लेगच्या साथीनंतर १३४९ मध्ये चॅन्ट्रींच्या स्थापनेत झपाट्याने वाढ झाली. चर्च शिवाय धार्मिक शिक्षण संकुल, दवाखाने, लॅटिन भाषेचे शिक्षण देणाऱ्या ग्रामर स्कूल्समध्ये चॅन्ट्री बांधल्या जाऊ लागल्या. परंतु पुढे इंग्रजी धर्मसुधारणेच्या काळात चॅन्ट्री बांधण्याच्या पद्धती मोठ्या प्रमाणात रद्दही करण्यात आल्या.
चॅन्ट्री चर्च अथवा चॅपेलमध्ये देणगीदार आणि कुटुंब यांसाठी प्रार्थना करण्यासाठी धर्मगुरूची नियुक्ती केलेली असे. काही ठिकाणी देणगीदार व्यक्तीच्या भावना, ज्या ख्रिस्ती संताशी निगडित असत त्या संताला वाहिलेले बंदिस्त चॅपल असे. चर्चमधील चॅपल, वेदी इत्यादी जागा इतरांपासून लाकडी, दगडी जाळीने अथवा भिंतीने वेगळी केली जाई. चॅन्ट्रीमधील जाळीदार भिंत वैविध्यपूर्ण कलाकुसर केलेल्या असून त्यावर देणगीदार व्यक्तीचे कुलचिन्ह अथवा प्रतिमा यांची सजावट केलेली असे. सुप्रसिद्ध प्रार्थनास्थळांमध्ये वेस्टमिन्स्टर ॲबीमधील हेन्री सातव्याचे प्रार्थनास्थळ, एली कॅथीड्रलमधील बिशप ॲलकॉकचे प्रार्थनास्थळ आणि वॉर्विकमधील सेंट मेरी येथील बोशॉम्प प्रार्थनास्थळ यांचा समावेश होतो.
संदर्भ :
- https://www.britannica.com/technology/chantry
- https://en.wikipedia.org/wiki/Chantry
समीक्षक : श्रृती बर्वे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.