
स्किटोवस्की, टिबोर (Scitovszky, Tibor) : (२ नोव्हेंबर १९१० – १ जून २००२). हंगेरियन वंशाचे प्रसिद्ध अमेरिकन अर्थतज्ज्ञ. त्यांचा जन्म हंगेरीमधील बुडापेस्ट येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला. त्यांचे वडिल हंगेरीचे परराष्ट्र मंत्री होते. टिबोर यांचे सुरुवातीचे शिक्षण बुडापेस्ट येथेच झाले. नंतर अर्थशास्त्र विषयाचे शिक्षण केंब्रीज आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स येथे झाले. त्यांनी हंगेरीतील इओट्वोस विद्यापीठातून कायदा विषयाची पदवी मिळविली. इ. स. १९३९ मध्ये ते अमेरिकेत आले. द्वितीय महायुद्धानंतर त्यांनी स्टॅनफर्ड येथे अध्यापनाला सुरुवात केली. तेथे १९५८ पर्यंत ते होते. नंतर १९५८ ते १९७० पर्यंत त्यांनी येल विद्यापीठ आणि बर्कली विद्यापीठात नंतर पुन्हा १९७८ पर्यंत स्टॅनफर्ड येथे अध्यापन व संशोधनाचे काम केले. स्थूल अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय व्यापार सिद्धांत आणि विशेषतः कल्याणकारी अर्थशास्त्र यांवर त्यांनी आपल्या योगदानाचा आणि संशोधनाचा ठसा उमटविला आहे. आर्थिक विश्लेषणातील त्यांच्या योगदानाच्या सन्मानार्थ अमेरिकन इकॉनॉमिक असोशिएशचे प्रतिष्ठित फेलो आणि ब्रिटिश अकॅडेमी व रॉयल इकॉनॉमिक सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड करण्यात आली. अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे ते सदस्य होते.
टिबोर यांनी केनेशियन क्रांतीची कल्याणकारी अर्थशास्त्राच्या दृष्टिकोणातून समीक्षा केली. इ. स. १९४२ मधील त्यांच्या ʽए रिकन्स्ट्रक्शन ऑफ दि थेअरी ऑफ टॅरिफʼ या आयात करावरील संशोधनामुळे युद्धोत्तर काळात सर्वपक्षीय आयात कर कमी करण्याच्या प्रयत्नांना सैद्धांतिक पाठबळ मिळाले. कल्याणकारी अर्थशास्त्राच्या सिद्धांतामध्ये सामुदायिक उदासीनता वक्राची संकल्पना मांडून त्यांनी मोलाची भर घातली. यामुळे समाजाच्या महत्तम उपभोगाच्या पर्यायांसाठी पॅरेटो कार्यक्षम अटींच्या स्पष्टीकरणास मदत झाली. कल्याणकारी अर्थशास्त्रात प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ निकोलस कॅल्डोर आणि सर जॉन रिचर्ड हिक्स यांच्या निकषांतील विसंगती टिबोर यांनी दर्शविली. त्यांच्या मते, ʽकॅल्डोर आणि हिक्स यांच्या निकषांची पूर्तता करत अ अवस्थेतून ब कडे अवस्थांतर होत असता त्याच निकषांवर बकडून अकडील अवस्थांतरदेखील तितकेच कल्याणकारी आहे असे म्हणता येईलʼ. यालाच स्किटोवस्की परावर्तन विरोधाभास असे म्हटले आहे.
टिबोर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अमेरिकन समाजाचे एक साक्षेपी भाष्यकार म्हणून मान्यता पावले. त्यांच्या दि जॉयलेस इकॉनॉमी : ऐन एनक्वायरी इनटू ह्यूमन सॅटिसफॅक्शन अँड कन्ज्युमर डिससॅटिसफॅक्शन या ग्रंथात त्यांनी अमेरिकन समाजाच्या उपभोग प्रवृत्तीची मीमांसा केली आहे. प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ केनेथ जोसेफ ॲरो यांच्या मते, या ग्रंथात भांडवलशाही बुर्ज्वा समाजाची अभिजात या दृष्टीकोनातून समीक्षा केली आहे. माणसात जोखीम पतकरण्याची आणि आव्हान देण्याची एक उपजत प्रवृत्ती असते (उदा., साहसी खेळ, जुगार, सट्टा इत्यादी) आणि त्यात एक अपेक्षित आनंद असतो, अशी टिबोर यांची धारणा होती. अमेरिकन समाजाने उपभोगातल्या व जगण्याच्या वस्तू आणि सुरक्षा व सुखसोयी या बाबींवर जास्त भर दिल्यामुळे जोखीम हाताळण्यातला अथवा आव्हान पेलण्यातला हा आनंद संपला. यावर उपाय म्हणजे हे आनंदाचे घटक पुनर्स्थापित करण्यासाठी आपल्या उपभोग प्रवृत्ती पुनर्प्रशिक्षित करावे. कल्याण या संकल्पनेची उपभोग अथवा वृद्धीसोबत सरमिसळ आणि गल्लत न करता कल्याण हे गुणात्मक आणि संख्यात्मक या दोन्ही निकषांवर तपासले पाहिजे. उपभोगातील आनंद सुनिश्चित केल्यास मर्यादित संसाधनातदेखील गुणात्मक उपभोग साधता येईल, असे टिबोर यांनी मत व्यक्त केले.
टिबोर यांनी अमेरिकेत ठराविक अंतराने सर्वेक्षण करून त्या काळात अमेरिकेत देशांतर्गत उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली; परंतु समाधान व कल्याणात मात्र तितकी वाढ दिसली नाही, असा त्यांनी मुख्य निष्कर्ष काढला. त्यांनी यामागील कारणांचा सतत मागोवा घेतला.
टिबोर यांनी अनेक महत्त्वाचे ग्रंथ लिहिले आहे : मोबिलायझिंग रिसोर्सेस फॉर वॉर, १९५१; वेलफेअर अँड कॉम्पिटेशन, १९५१; इकॉनॉमिक थेअरी अँड वेस्टर्न यूरोपिअन इंटिग्रेशन, १९५८; पेपर्स ऑन वेलफेअ अँड ग्रोथ, १९६४; रिक्वॉरमेंट ऑफ ॲन इंटरनॅशनल रिझर्व्ह सिस्टिम, १९६५; मनी अँड द बॅलन्स ऑफ पेमेंट्स, १९६९; द जॉयलेस इकॉनॉमी, १९७६; ह्युमन डिझायर अँड इकॉनॉमिक सॅटिसफॅक्शन, १९८६; इकॉनॉमिक थेअरी अँड रिॲलिटी, १९९५ इत्यादी.
टिबोर हे दुसऱ्या महायुद्ध काळात अमेरिकेच्या सैन्यात गुप्तचर विभागात भरती झाले होते. त्यांनी त्या वेळी आपले नाव बदलून थॉमस डेनिस असे ठेवले होते.
टिबोर यांचे स्टॅनफोर्ड येथे निधन झाले.
संदर्भ : https://www.tandfonline.com/doi/full/10.1080/09540261.2025.2530113
समीक्षक : राजस परचुरे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.