कॅल्डॉर, निकोलस : (१२ मे १९०८ − ३० सप्टेंबर १९८६). प्रामुख्याने कल्याणकारी अर्थशास्त्र (Welfare Economics) या क्षेत्रांत ‘ऑस्ट्रियन-वॉलरा’ परंपरेत महत्त्वपूर्ण सैद्धांतिक योगदान देणारे दुसरे महायुद्ध (World War Second) नंतरच्या काळातील प्रसिद्ध हंगेरियन-ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म बूडापेस्ट, हंगेरी येथे जॉन आणि ज्युलिअस या दांपत्यापोटी झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण बूडापेस्ट व बर्लिन येथे झाले. नंतर १९२७ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदवी संपादन केली. तेथे शिकत असतानाच त्यांनी १९३४ मध्ये समतोल सिद्धांत, उद्योगसंस्था, भांडवल इत्यादीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. कॅल्डॉर यांच्या विचारांवर विख्यात ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जॉन मेनार्ड केन्स (John Maynard Keynes) आणि स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ कार्ल गन्नार मीर्दाल (Karl Gunnar Myrdal) यांचा प्रभाव होता, तर ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ जोन व्हायोलेट रॉबिन्सन (Joan Violet Robinson) आणि भारताचे माजी पंतप्रधान व प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग (Manmohan Singh) यांच्या विचारांवर कॅल्डॉर यांच्या विचारांचा प्रभाव होता.

१९३० च्या दशकात अर्थतज्ञांमध्ये भांडवल सिद्धांताबाबत फ्रॅंक हाइनमन नाइट (Frank Hyneman Knight) आणि हायेक व मॅक्लप असे दोन गट पडले होते. कॅल्डॉर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच या वादाचा अभ्यास करत भांडवलसाठा व्यापारचक्रांना जबाबदार असतो, असे स्पष्ट केले. त्यांनी केन्सच्या विचारसरणीला पाठिंबा देत गुंतवणूक उत्पन्नाच्या सम दिशेने बदलते आणि भांडवल साठ्याच्या व्यस्त प्रमाणात असते; कारण जर उद्योगसंस्थांची उत्पादनक्षमता अगोदरच मोठी असेल, तर त्यांचा कल अधिक गुंतवणूक करण्याकडे असेल, असे कॅल्डॉर यांनी स्पष्ट केले.

कॅल्डॉर यांनी श्रम (Labour) उत्पादकतेच्या वाढीच्या दरातील बदलामुळे झालेली तांत्रिक प्रगतीचे मापन केले आहे. त्यांच्या मते, प्रत्येक श्रमाच्या नगामागे भांडवलाच्या वाढीचा दर जितका जास्त, तितका श्रमाच्या उत्पादकतेच्या वाढीचा दर जास्त असतो. म्हणजेच, श्रमाच्या उत्पादकतावाढीचा दर भांडवलाच्या घनतेतील वाढीच्या दरानुसार ठरतो. समतोलाच्या परिस्थितीत हे दोन्ही दर समान प्रमाणात वाढतात. समतोल पातळीत श्रमाच्या उत्पादकता वाढीचा दर श्रम/भांडवल प्रमाणातील गुणोत्तरात वाढीपेक्षा अधिक असतो. याउलट, श्रमाच्या उत्पादकता  वाढीचा दर भांडवल/श्रम प्रमाणातील वाढीच्या दरापेक्षा कमी असतो.

कॅल्डॉर यांनी १९३९ मध्ये ‘कॅल्डॉर-हिक्स’ हा कल्याणासाठीची कार्यक्षमता या नावाने ओळखला जाणारा ‘भरपाई’ निकष विकसित केला. कोबवेब-प्रारूपाची मांडणी केली आणि  ‘कॅल्डॉरची विकास नियमावली’ या नावाने प्रसिद्ध झालेले आर्थिक विकासातील विशिष्ट नियमही त्यांनी मांडले. आपल्या निर्याताधारित प्रारूपांचा व हॅरॉड व्यापार गुणांक यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात व्यापारतोलामुळे सहभागी देशांच्या विकासातील तफावत लक्षात येते, हे त्यांनी दाखवून दिले. मीर्दालबरोबर युनायटेड नेशन्सच्या आर्थिक आयोगावर काम करताना कॅल्डॉर यांनी वर्तुळाकार संचयित घटक संकल्पना विकसित केली. मुळात ही संकल्पना मिर्दाल यांनी विक्सेल या अर्थतज्ज्ञाकडून घेतली होती. मीर्दाल यांचा भर विकासाच्या सामाजिक तरतुदींवर होता, तर कॅल्डॉर यांचा भर वस्तुनिर्माण क्षेत्रातील मागणी-पुरवठा संबंधावर होता. होलब्रूक यांनी मांडलेल्या तथाकथित साठ्याच्या सिद्धांतांशी निगडित असलेली ‘सोयीस्कर-उत्पादन’ ही वस्तू बाजाराशी निगडित असणारी संज्ञा कॅल्डॉर यांनी विकसित केली.

कॅल्डॉर यांनी १९४० मध्ये व्यापारचक्र (Business Cycle) सिद्धांताचे अतिशय वास्तववादी  विश्लेषण केले. त्यात त्यांनी रेखीय गतिशील घटकांचा वापर केला होता. या सिद्धांतात गुणक-प्रवेग प्रारूपाद्वारे व्यापारचक्रांचे स्पष्टीकरण दिलेले असल्याने ते पॉल अँटनी सॅम्युएल्सन (Paul Anthony Samuelson) आणि जॉन रिचर्ड हिक्स (John Richard Hicks) यांच्या सिद्धांताशी साम्य दाखवणारे  होते. काल्डॉर यांनी बचत व गुंतवणूकफलन रेखीय असते, असे गृहीत धरले. त्यांच्या मते, मंदीच्या निम्न पातळीत सीमांत बचतक्षमता विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजेच, मंदीमध्ये लोक राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी बचतीत कपात करतील, तर उच्च उत्पन्नपातळीत अधिक बचत करतील. त्यांनी असे प्रतिपादन केले की, मंदीच्या निम्न पातळीत उद्योजकांची अतिरिक्त क्षमता मोठ्या प्रमाणात असेल आणि त्यामुळे उद्योजक अधिक गुंतवणूक करण्यास उत्सुक नसतील, तर तेजीच्या शिखरावर वाढत्या खर्चामुळे गुंतवणूक करणार नाहीत. अशा स्थितीत रेखीय घटकांमुळे व्यापारचक्रे निर्माण होतात.

कॅल्डॉर यांना समतोलाच्या अर्थशास्त्रावरील सर्वांत महत्त्वपूर्ण टीकाकार मानले जाते. त्यांनी १९३४ मध्ये अर्थतज्ज्ञ चेंबरलिन यांच्या ‘मुक्त  प्रवेश’ संकल्पनेला अतार्किक संबोधून लिहिलेला ‘इक्विलिब्रिअम ऑफ द फर्म’ हा लेख अतिशय गाजला. त्यात त्यांनी दीर्घकालीन बंदिस्त समतोल आणि पूर्ण स्पर्धा ही अवास्तव गृहीते आहेत आणि उत्पादनसंस्थांच्या आकारमानावर मर्यादा नसल्याने पूर्ण स्पर्धा अस्तित्त्वात नसते. अपूर्ण आणि मक्तेदारी (Monopoly) स्पर्धेत दीर्घकालीन समतोल अशक्य आहे, असे प्रतिपादन केले आहे. एकंदरीत, दोघांची बाजारपेठेची संकल्पना पूर्णतः भिन्न होती. कॅल्डॉर यांनी १९३५ मधील ‘मार्केट इम्पर्फेक्शन अँड एक्सेस कॅपिसिटी’ या आपल्या लेखात पुन्हा चेंबरलिन यांच्या ‘मक्तेदारीयुक्त स्पर्धा’ या संकल्पनेवर पुढील चार मुद्द्यांच्या आधारे टीका केली आहे.

  • विविध उत्पादकांच्या मागणीतील सहसंबंध.
  •  ग्राहकांच्या प्राधान्याचे सम विभाजन आणि पूर्ण स्पर्धेची  पूर्ण माहिती असणाऱ्या उत्पादन संस्था.
  • एकसमान खर्च असणाऱ्या संस्थात्मक मक्तेदारी उदा.,  एकस्व (Patent).
  • अतिरिक्त पुरवठा व मोठ्या प्रमाणातील उत्पादनाचे लाभ. थोडक्यात, कॅल्डॉर यांच्या टीकात्मक योगदानाला अपूर्ण स्पर्धेची संकल्पना विकसित करण्याचे श्रेय देता येईल.

सीमांतवादी अर्थशास्त्राकडून केन्सवादी अर्थशास्त्राकडे वळणाऱ्या तज्ज्ञांमध्ये कॅल्डॉर हे अग्रभागी होते. केन्सनंतरच्या अर्थशास्त्रीय विचारांत त्यांचे महत्त्वाचे योगदान आहे.  कॅल्डॉर यांनी रिकार्डो, मार्क्स, केन्स आणि कालेकी यांच्या विभाजन प्रारूपांचे तुलनात्मक परीक्षण करून त्यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट केला. शिवाय, यात सीमांत उत्पादन संकल्पनेला स्थान नसल्याचे नमूद केले.

कॅल्डॉर यांना सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली, ती त्यांच्या करविषयक विचारांमुळे. विकसनशील देशांमध्ये करसवलत देण्यास त्यांचे प्रतिकूल मत होते. त्यांच्या मते, विकसनशील देशांतील अर्थव्यवस्थांमध्ये करसवलती देण्याऐवजी योजनांच्या गुंतवणुकांसाठी आवश्यक संसाधने उभारण्याची अधिक गरज असते. विकसित देशांमध्ये कर आकारणीचे प्रमुख उद्दिष्ट पूर्ण रोजगार साध्य करण्यासाठी आवश्यक प्रमाणात खासगी व सार्वजनिक खर्चाची पातळी ठेवणे गरजेचे असते. म्हणजेच, विकसित अर्थव्यवस्थांमध्ये मंदीच्या नियंत्रणापेक्षा तेजी नियंत्रणासाठी कर (Tax) आवश्यक असतो. कॅल्डॉर यांनी आर्थिक विषमता कमी करण्यासाठी अतिप्रगतशील कराचे समर्थन केले आहे.

कॅल्डॉर यांनी १९५६ मध्ये भारतात खर्चकर लागू करण्याबाबतचे विवेचन केले. त्यांच्या मते, भारत व ब्रिटन या देशांची आयकरपद्धती पूर्वग्रहदूषित आणि सदोष होती. त्यातून विविध व्यक्तींच्या खर्चक्षमतेचे खरेखुरे मापन होत नाही. खर्चक्षमता हाच करपात्रतेचा खरा निकष आहे. कोणत्याही व्यक्तीची विशिष्ट काळातील खर्चक्षमता त्याच्याजवळील संपत्ती , नियमित उत्पन्न आणि नैमित्तिक उत्पन्नावर अवलंबून असते. भारतात खर्चकर सर्वप्रथम १९५७-५८ सालच्या अंदाजपत्रकात लागू करण्यात आला होता; परंतु कॅल्डॉर यांच्या शिफारशींची कडक अंमलबजावणी केली गेली नाही. पुढे १९८७ मध्ये खर्चकर कायदाही संमत करण्यात आला. हा खर्चकर भारतात तसा अल्पजीवी आणि अपयशी ठरला. प्रत्यक्षात खर्चकर अमलात आणताना अनेक व्यवस्थापकीय अडचणी येतात. कॅल्डॉर यांनी ब्रिटनमधील प्रचलित अधिभाराऐवजी खर्चकर सुचवला आणि मूळ आयकरही चालू ठेवण्याची सूचना केली होती.  भारत सरकारने त्यांची सूचना सुधारली आणि खर्चकर स्वीकारताना अधिभार व मूळ आयकर चालूच ठेवून १९५६ सालचा आयकराचा महत्तम दर ९१.९% वरून ८४% पर्यंत कमी केला. मात्र, भांडवली लाभावर आयकर असला तरी अधिभार नाही.

कॅल्डॉरचे भारताशी आत्मीयतेचे संबंध होते. त्याच्या कुटुंबाने त्याच्या जवळील ३६२ पुस्तके सेंट्रल फॉर डेव्हलपमेन्ट स्टडीज  या भारतीय  संस्थेला सुपूर्द केली.

कॅल्डॉर यांचे करधोरण समता, आर्थिक परिणाम आणि व्यवस्थापकीय कार्यक्षमता या तीन घटकांवर आधारित होते. आयकरात संपत्ती व भांडवली लाभासारख्या अनियमित उत्पन्नाचा समावेश होत नाही. त्यामुळे आयकररचनेत संपत्तीधारकांबाबत पक्षपात केला जातो. सर्व पातळीतील उत्पन्नधारकांना न्याय  मिळू शकेल असा आमूलाग्र बदल करपद्धतीत करणे गरजेचे आहे. प्रचलित आयकरामुळे बचतीची प्रेरणा नष्ट होते, शिवाय अतिप्रगतशील करामुळे काम व धोके स्वीकारण्याची प्रवृत्ती घटते, अशी टीकाही त्यांनी केली. त्यांच्या मते, प्रचलित आयकर वरील तिन्ही निकषांच्या आधारे सदोष ठरतो. मात्र, यात भारतातील करबुडवेगिरी दुर्लक्षिली गेली आहे. एकंदरीत, आयकरामुळे खासगी उद्योगांचा विकास कुंठित होतो आणि करपात्र उत्पन्नाची व्याख्या पुरेशी व्यापक नसल्याने पळवाटांमुळे करचुकवेगिरी आणि बुडवेगिरी वाढते. अशा दुष्परिणामामुळे व्यक्तीच्या उत्पन्नाऐवजी खर्चावरकर लादणे योग्य ठरेल, असे कॅल्डॉर यांचे मत होते. उपभोगखर्च हाच जर कराचा निकष मानला, तर विविध संपत्ती प्रकारांचे मोजमाप करण्याचा प्रश्नच मुळातून नाहीसा होतो, असा त्यांचा युक्तिवाद होता. त्यांनी  खर्चकराचे फायदेही सांगितले आहेत. आयकरामुळे धोके स्वीकारण्यावर विपरीत परिणाम होतो, तसा खर्चकराने होत नाही. त्यामुळे बचतीलाही प्रोत्साहन मिळते. खासगी उद्योगांवर आधारित अर्थव्यवस्थेला बचतींमध्ये कपात होणे परवडणारे नाही, असे त्यांचे मत होते.

कॅल्डॉर यांची ग्रंथसंपदा पुढीलप्रमाणे : ॲन एक्स्पेंडिचर टॅक्स (१९५५); एसे ऑन व्हॅल्यू अँड डिस्ट्रिब्यूशन (१९६०); द करेज ऑफ मोनेटॅरिझम (१९८२); इकॉनॉमिक्स विदाउट इक्विलिब्रिअम (१९८५).

कॅल्डॉर यांचे पॉपव्हर्थ एव्हरार्ड (यूके) येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Chelliah, Raja J., Fiscal Policy in Underdeveloped Countries, London, 1969.
  • Kaur Harjeet, Taxation and Development Finance in India, New Delhi 1992.
  • संगोराम, मिलींद, इन्कमटॅक्सविषय सारे काही, पुणे, २०१३.

समीक्षक – निर्मल भालेराव

प्रतिक्रिया व्यक्त करा