मावची बोली ही भिल्ली भाषांच्या समुदायातील एक भाषा आहे. महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार तसेच काही प्रमाणात नाशिक जिल्ह्यातील भिल्ल समाजातील लोक ही भाषा बोलतात. बहुतांश मावची भाषक मावचीखेरीज मराठी, अहिराणी, गुजराती तसेच आसपासच्या परिसरात बोलल्या जाणाऱ्या वसावेसारख्या भिल्ली भाषेतील इतर बोलींमध्येही पारंगत आहेत. विविध भिल्ली बोली ह्या एकमेकींशी नाते दर्शविणाऱ्या असून महाराष्ट्राबाहेरही (विशेषत: सीमावर्ती भागांमध्ये) वापरात आहेत. स्थानपरत्वे मावची बोलीवर गुजराती, राजस्थानी, मराठीचा कमीअधिक प्रभाव दिसतो. शिवाय गेल्या शतकभरातील स्थित्यंतरांमुळे त्यात फरक पडत गेले आहेत. यामुळे या भाषांच्या वर्गीकरणाबाबत मतभिन्नता दिसून येते.

स्वनिमव्यवस्था: मावची भाषेत पुढील स्वनिम आढळतात:

स्वर – इ, ए, आ, अ, ओ, उ ( /i/, /e/, /a/, /ə/, /o/, /u/).

स्पर्शध्वनी – क्, ख्, ग् (/k/, /kʰ/, /g/); ट्, ठ्, ड् (/ʈ/,/ʈʰ/, /ɖ/); त्, थ्, द्, ड् (/t̪/,/t̪ʰ/,/d̪/); प्, फ्, ब्, भ् (/p/,/pʰ/,/b/,/bʰ/).

स्पर्शघर्षके –  च़्, च्, ज़्, ज् (/t͡s /, /t͡ʃ /, /d͡z/, /d͡ʒ/).

घर्षक ध्वनी – स्, श्, ह् (/s/, /ʃ/, /h/).

अर्धस्वर व पार्श्विक ध्वनी – य्, व्, र्, ल्, ळ् ( /j/,/w/, /r/, /l/, /ɭ/).

अनुनासिके – म्, न्, ङ् ( /m/, /n/, /ŋ/).

मावचीच्या नंदुरबारमधील बोलीप्रकारात /ʔ/ हा कंठद्वारीय ध्वनीदेखील आढळतो. तसेच काही स्वरांचे सानुनासिक भेदही आढळतात. मावची बोलीमध्ये प्रदेशानुसार थोडेफार अंतर्गत वैविध्य आढळते. नंदुरबारच्या मावचीमध्ये जेथे ‘ळ’ वापरला जातो, त्याचजागी धुळ्याकडच्या मावचीत ‘व’चा वापर होतो. उदा.,

नंदुरबारची मावची धुळ्याच्या पठारी प्रदेशातील मावची  मराठी
/ko.ʔo.ɭa/ ‘को’ओळा’ /ko.ʔo.wa/ ‘को’ओवा’ कोहळा(भोपळा)
/ka.ɭo/ ‘काळो’ /ka.wo/ ‘कावो’ काळा

 

मराठीतील काही शब्दांमध्ये जेथे ‘श’चा वापर होतो, तेथे बऱ्याचदा मावचीमध्ये ‘ह’चा किंवा ‘स’चा वापर झालेला दिसतो. जसे, ‘हिंगेदानो’ (शेंगदाणा) , ‘होमवार’ (सोमवार), ‘सुकरवार’ (शुक्रवार). मराठीतील ‘छ’च्या जागीदेखील मावचीमध्ये ‘स’चा आढळ दिसतो. उदा., ‘सात्री’ (छत्री)

व्याकरणिक वैशिष्ट्ये:

मावचीमध्ये नामांची एकवचन व अनेकवचन अशी दोन वचने होतात. नामांची विभागणी पुल्लिंग, स्त्रीलिंग व नपुंसकलिंग अशा तीन वर्गांमध्ये होते. विशेषणे व क्रियापदांची रूपे वाक्यातील नामांच्या लिंग-वचन व पुरुषाप्रमाणे बदलतात. नामांच्या अनेकवचनांची रूपे नामाच्या स्वरूपावरून (शेवटच्या ध्वनीनुसार) व लिंगानुसार वेगवेगळी होतात. पुढील उदाहरणांतून हे स्पष्ट होईल:

मावचीतील नामांची एकवचनी व अनेकवचनी रूपे

एकवचन अनेकवचन
पुल्लिंग /po.ho/ पोहो (मुलगा) /po.hẽ/ पोहें (मुलगे)
/go.ɖõ/ ‘गोडों’ (घोडा) /go.ɖẽ/, /go.ɖã/  ‘गोडें / गोडां’ (घोडे)
/bo.i:l/ ‘बोईल’ (बैल) /bo.i:l/ ‘बोईल’ (बैल) (शून्यप्रत्यय)
स्त्रीलिंग /po.hi/ ‘पोही’ (मुलगी) /po.hi.jo/ पोहीयो (मुली)
/gaʈʰ/ ‘गाठ’ (गाठ) /ga.ʈʰi.jo/, / ga.ʈʰo/ ‘गाठीयो/ गाठो’ (गाठी)
नपुंसकलिंग /ow/ ‘ओव’ (विळा) /o.wẽ/ ‘ओवें’ (विळे)
 /bo.ʈa.ka/ ‘बोटाका’ (बटाटा) /bo.ʈa.kẽ/ ‘बोटाकें’ (बटाटे)

 

बोटाका, टमाका (टोमॅटो) यांसारखे काही शब्द मावचीच्या काही बोलींमध्ये पुल्लिंगी, तर काही बोलींमध्ये नपुंसकलिंगी आहेत. त्याचे अनेकवचन त्या त्या बोलींतील नियमानुसार होते. सर्वनामांमध्ये तृतीयपुरुषामध्ये लिंगभेद दाखवला जातो. तसेच प्रथमपुरुषी अनेकवचनामध्ये श्रोतासमावेशक (inclusive) व श्रोतावर्जित (exclusive) अशी दोन रूपे आहेत.

मावचीतील सर्वनामे

एकवचन

अनेकवचन

 प्रथमपुरुषी /aj/ ‘आय’ (मी) /ã.mã/ ‘आंमां’ (आम्ही)
/a.pa/ (आपण)
द्वितीयपुरुषी /t̪u/ ‘तू’(तू) /t̪u.ma/ ‘तुमा’ (तुम्ही)
 तृतीयपुरुषी पुल्लिंग /t̪o/ ‘तो’ (तो) /t̪ja/ ‘त्या’ (ते)
स्त्रीलिंग /t̪i/ ‘ती’ (ती) /t̪jo/ ‘त्यो’ (त्या)
नपुंसकलिंग /t̪i/ ‘ती’ (ते) /t̪je/ ‘त्ये’ (ती)

 

नाम व सर्वनामांना विभक्तिप्रत्यय लागतात. मावचीमध्ये तिन्ही पुरुषी सर्वनामांना प्रेरकविभक्ती लागते. त्यानुसार ‘आय’ (मी) चे प्रेरक रूप ‘माय’ असे होते. विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी नाम/सर्वनामांचे सामान्यरूप होते. अनेकवचनातील सामान्यरूप (अ.व.सा.रू) ‘-ह- या प्रत्ययाने दाखवले जाते. उदा.,

कुत्राहाय बिलाडाल  दो’व्या
kut̪ra-ha-j bilaɽa-l  d̪oʔw-ja
कुत्रा-अ.व.सा.रू.-प्रेरक मांजर-कर्म धर-पूर्णक्रिया
‘कुत्र्यांनी मांजराला पकडलं (धरलं).’

 

मावचीमध्ये संबंधकारक दाखवण्यासाठी निव्वळ सामान्यरूपाचा वापर होतो. म्हणजेच, सामान्यरूपानंतर शून्यप्रत्ययाने संबंधकारक दाखवले जाते. कधीकधी शून्यप्रत्ययाच्या ऐवजी -ए हा संबंधदर्शक विभक्तिप्रत्यय विकल्पाने वापरला जातो. उदा.,

१. द्रुप्ती केंलें
d̪rupt̪i-Ø kẽlẽ
द्रुप्ती-संबंध माकड
‘द्रुप्तीचं माकड’
२. द्रुप्ती(ए) आथ
d̪rupt̪i-(e) at̪ʰ
द्रुप्ती-(संबंध) हात
‘द्रुप्तीचा हात’
३. पोहा-हा साव
Poha-ha- Ø  saw
मुलगा-अ.व.सा.रू.-संबंध शाळा
‘मुलांची (मुलग्यांची) शाळा’

मावची भाषेत रीतिक्रिया, चालूक्रिया व पूर्णक्रिया असे क्रियेच्या अभिव्यक्तीचे तीन प्रकार आहेत. वर्तमान, भविष्य व भूतकाळ असे तीन काळही दाखवले जातात. धातूला अभिव्यक्तीचे प्रत्यय लागतात व त्यानंतर कालदर्शक चिह्ने किंवा साहाय्यक धातूची रूपे वापरली जातात. वर्तमानकाळासाठी हे, ही अशी रूपे आहेत व ती रूपे अस्तित्वदर्शक -हे या धातूवर आधारित आहेत. भूतकाळासाठी आत्- या साहाय्यक धातूच्या रूपांचा वापर होतो; तर भविष्यकाळाची हू, हा, हे असे प्रत्यय आहेत. मुख्य धातूची कृदन्ते व कालदर्शक चिह्ने/धातू हे दोन्ही वाक्यातील नामाच्या लिंग-वचन-पुरुषाप्रमाणे चालतात. प्रेरकरचनेमध्ये क्रियापदे विभक्तिप्रत्यय नसलेल्या कर्माप्रमाणे चालतात तर एरवी कर्त्याप्रमाणे. मराठी व भारतातील इतर भाषांप्रमाणे मावचीतही चतुर्थ्यन्त किंवा भोक्ता कर्त्याची रचना आहे. उदा.,

माल बुजले बोटाके पोटतेहे
mal bud͡z-le boʈake poʈ-t̪e-he
मी.भोक्ता भाज-पूर्णक्रियासाधित बटाटा.अ.व. आवड-अपूर्ण/रीतिक्रिया वर्तमानकाळ.तृ.पु.अ.व.
‘मला भाजलेले बटाटे आवडतात.’

 

संख्यामापनपद्धती: मावचीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मोजण्याची पद्धत दशमानपद्धतीऐवजी विंशतिमानपद्धतीवर (वीसच्या पायावर) आधारित आहे. एक ते वीस या संख्यांसाठी स्वतंत्र शब्द आहेत तर त्यापुढील संख्यांसाठी विसावर आधारित शब्द आहेत. उदाहरणार्थ, वीस या संख्येसाठी ‘विही’, दोनसाठी ‘बेंन’ असे शब्द आहेत; तर सव्वीससाठी ‘योक विहिन सो’ म्हणजे ‘एक वीस आणि सहा’, एक्केचाळीससाठी ‘बेंन विहिन योक’ म्हणजे ‘दोन वीस (=चाळीस) आणि एक’, एक्कावन्नसाठी ‘बेंन विहिन अकरा’ ‘दोन वीस (=चाळीस) आणि अकरा’ अशी गणना केली जाते. तीससाठी ‘योक विहीन दोहा’ (एक वीस अन् दहा) तर शंभरसाठी ‘होव’ किंवा ‘पाच विही’ असे शब्द आहेत.

रंगवाचक शब्दांमध्ये हिरवा व निळा या दोन्ही रंगाना ‘निळो/ निवो’ असाच शब्द आहे. म्हणून ‘पानांचा निळा’, ‘आकाशाचा निळा’ अशा वर्णनांनी हिरव्या व निळ्या रंगातील भेद दाखवला जातो. अलीकडे मावची भाषेत साहित्य व शैक्षणिक सामग्री, लहान मुलांसाठीची गोष्टीची पुस्तके प्रकाशित होत आहेत. बायबलचे मावची भाषांतरही उपलब्ध आहे. मुळात केवळ मौखिक परंपरा असलेली मावची भाषा लिहिण्यासाठी देवनागरी लिपीचा वापर केला जातो.

संदर्भ :

  • गावित, माहेश्वरी, ‘मावची’, ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण महाराष्ट्र’, (संपा. अरुण जाखडे) पद्मगंधा प्रकाशन, २०१३.
  • Grierson, G. , The Linguistic Survey of India, Vol.9-3, 1907. https://dsal.uchicago.edu/books/lsi/lsi.php?volume=9-3&pages=338#page/17/mode/1up, Accessed 15th May 2016.

समीक्षक : विद्यागौरी टिळक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.