मेवाती बोली : राजस्थानातील राजस्थानी भाषेची मेवाती ही एक बोली आहे. मेवात या भागावरून मेवाती हे नाव रूढ झाले. मेवात हा भाग अलवर या जिल्ह्यात येतो. अलवर, भरतपूर, रोहटक, गुडगांव, या राजस्थानातील जिल्ह्यात मेवातीचे भाषक विखुरले आहेत. काही लोक मेवातीला ‘मेवाती : अहिरवाटी’ असेही म्हणतात. मारवाडी, मेवाती, ढुंढारी किंवा जयपूरी, मालवी, भिल्ली, बागडी, अशा राजस्थानीच्या काही प्रमुख बोली आहेत. या सर्व बोली मूळ डिंगल यां भाषेपासून निर्माण झाल्या. मेवाती ही सीमेवरची बोली आहे. म्हणूनच जयपूरातील मेवातीवर जयपुरी या राजस्थानी बोलीचा जास्त प्रभाव दिसतो, तर भरतपूरमधील मेवातीवर ब्रज  या हिंदीच्या बोलीचा प्रभाव दिसतो. खुद्द मेवातीचे (१) प्रमाण मेवाती, (२) राठी मेवाती, (३) नहेठा मेवाती आणि (४) कठेर मेवाती असे चार प्रकार मानले जातात. हरयाणा या राज्यात सुद्धा राजस्थानच्या सीमावर्ती भागात ही बोली बोलली जाते.

मेवाती भाषकांची संख्या १९०८ च्या ग्रीअर्सनच्या सर्वेक्षणात सु. ७,५८,६०० लाख एवढी दिलेली आहे. २०११ च्या जनगणेत सुमारे मेवाती मातृभाषा असणाऱ्या लोकांची संख्या ही सुमारे तेरा लाख आहे. यातील बहुसंख्य भाषक अलवरमधले आहेत. मेव म्हणून मुसलमान जातींचे फाळणीमुळे स्थलांतर झाले त्यामुळे ही घट झालेली दिसते. जयपूर आणि अजमेर येथे मेवाती भाषक पुरुषांपेक्षा मेवाती भाषक स्त्रिया खूपच जास्त असलेल्या दिसतात. राजस्थानच्या लोकसंख्येत मेवाती भाषक अल्प संख्य असून त्यातील निम्म्याहून अधिक लोक ग्रामीण भागात राहतात.

मेवातीमधील नामांचे व्याकरण जयपूरीतील नामांच्या व्याकरणाप्रमाणे आहे. घोडो हे एकवचन तर घोडा हे बहुवचन. मेवातीमधील विशेषणे बहुधा ओ-कारान्त असतात. उदा., अच्छो घोडो म्हणजे ‘चांगला घोडा’. हिंदीतील ह मेवातीत म्ह होतो. (हमारा-म्हारा). मेवातील क्रियापदे मात्र उ-कारान्त लिहितात. उदा., मराठी ‘मारणे’ हे क्रियापद मारणु असे लिहितात. हिंदीमध्ये तो आणि ती यांना वह हा एकच शब्द आहे मेवाती मध्ये मात्र अनुक्रमे या आणि वा असे वेगळे शब्द आहेत. मेवाती बोलीमध्ये साहित्य फारसे उपलब्ध नाही पण अठराव्या शतकाच्या अखेरीस लालदासी आणि चरणदासी या प्रसिद्ध संत संप्रदायातील लोकप्रिय साहित्य मेवातीमध्ये रचलेले आढळते.

पहा : राजस्थानी भाषा.

संदर्भ :

  • Grierson, G.A. Ed. Linguistic Survey of India, Vol.IX, Part II, (Reprint), Delhi, 1968.
  •  माहेश्वरी, हिरालाल, राजस्थानी भाषा और साहित्य, कलकत्ता, १९६०.