झिमिर नृत्य : झिमिर नृत्य हे सिंधी लोकांचे पारंपरिक लोकनृत्य आहे. हे मुख्यतः विवाह, जन्म, चढती, आकिको, तोहर, मंगणो ( सिंधी उत्सव) इत्यादी सण-समारंभांत सादर केले जाते. पुरुष आणि स्त्रिया दोघेही व्यक्तिगत किंवा समूहात यावेळी नाचतात. नृत्यात हात मंडळाकार फिरवणे, टाळी वाजवणे, पायांची हलकी हालचाल आणि “फेरीयो” म्हणजे चक्राकार फिरणे यांचा समावेश असतो. लाडा, सेहरा, गीच ही सिंधी गाणी गाताना हे नृत्य केले जाते. झिमिर नृत्य आनंद, उत्साह आणि सिंधी संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. लार, थार, कछो इ. पाकिस्तानातील वेगवेगळ्या प्रदेशात त्याची वेगवेगळी शैली आहे. “घोर” म्हणजे नाचणाऱ्यांवर पैसे उधळणे ही प्रथा यात लोकप्रिय आहे. हे नृत्य भारतातील सिंधी समुदायातही प्रचलित आहे.
झिमिर नृत्य सिंध प्रांतात म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात उद्भवले आहे, जो प्रदेश आता पाकिस्तानात आहे. लार, थार, कछो, उत्तर सिंध इत्यादी भागांत याची विविध रूपे प्रचलित आहेत. भारतात सिंधी स्थलांतरित समुदायामध्ये मुख्यतः मुंबई, पुणे, दिल्ली, उल्हासनगर, अहमदाबाद, जयपूर येथील आणि इतरत्र असणाऱ्या सिंधी समुदायात हे नृत्य सक्रिय आहे. चेटीचंद, झूलेलाल जयंती, लग्नसमारंभ, सांस्कृतिक मेळावे आणि राष्ट्रीय उत्सवांत हे नृत्य सादर होते. सिंध प्रांतातील ग्रामीण भागांत विवाह आणि सणांमध्ये हे नैसर्गिकरित्या सादर केले जाते. भारतातील सिंधी संघटना याचे जतन आणि प्रचार करतात. हे नृत्य सिंधी लोकांच्या स्थलांतरित जीवनशैलीतही त्यांची सांस्कृतिक ओळख जपते.
झिमिर नृत्य पुरुष आणि स्त्रिया दोघेही सादर करतात, परंतु विवाह गीतांमध्ये स्त्रियांचा सहभाग अधिक असतो. सिंधी हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांत हे प्रचलित आहे. सिंध प्रांतातील विविध उप-जाती (जसे मोहाना, शेडी इ.) आणि भारतातील सिंधी (अमिल, भावन, खत्री इ.) यात भाग घेतात. व्यावसायिक कलाकार, लोककलाकार आणि सामान्य लोक लग्न, उत्सव किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांत नाचतात. पूर्वी हे मुख्यतः घरगुती आणि ग्रामीण समारंभांत मर्यादित होते, आता शहरी सिंधी तरुण-तरुणी अनेक व्यासपीठावर हे नृत्य सादर करतात.
झिमिर नृत्यात मुख्य वाद्ये म्हणून ढोल, शहनाई आणि मुटो यांचा वापर केला जातो. कधीकधी अन्य पारंपरिक वाद्ये जसे एकतारा, मंजिरा यांचाही वापर होतो. ढोल ताल देतो, शहनाई स्वर साधते. गीते मुख्यतः लाडा, सेहरा आणि गीच स्वरूपात असतात. ही विवाह, जन्म किंवा सणाविषयीची लोकगीते असतात. गाणी सिंधी भाषेत असतात आणि भावपूर्ण, आनंदी स्वरात गायली जातात. गायक आणि नृत्यकार एकत्रित गातात. गीतांत प्रेम, प्रकृती, सिंधू नदी, सौंदर्य आणि सिंधी शौर्याचे वर्णन असते. नृत्य सुरुवातीला मंद गतीने सुरू होते आणि हळूहळू वेगवान होते. हात फिरवणे, टाळी आणि पायांची हालचाल गीतांच्या लयबद्धतेनुसार होते. जहमत झिमिर, मंडी झिमिर, पाली कापणवारी झिमिर, फेरीवारी झिमिर इत्यादी या नृत्याचे प्रकार आहेत. प्रत्येक प्रदेशात गीत आणि चाली वेगळ्या असतात. हे नृत्य केवळ मनोरंजन नसून, सिंधी लोकसाहित्य आणि संगीताचा जीवंत दस्तऐवज आहेत.
१९४७ च्या विभाजनानंतर सिंधी समुदाय भारतात स्थलांतरित झाला, तेव्हा अशा लोककलांनी त्यांची भाषा, परंपरा आणि भावना जिवंत ठेवल्या. चेटीचंद, झूलेलाल उत्सव आणि लग्नसमारंभांत झिमिर नृत्य समूहाला एकत्रित बांधणीचे काम करते.
संदर्भ : जोशी, महादेवशास्त्री (संपा), भारतीय संस्कृतिकोश, खंड ३, पुणे, १९९९.
समीक्षक : प्रकाश खांडगे
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
