हेंडरसन, रिचर्ड : (१९ जुलै १९४५). स्कॉटिश जीवभौतिकशास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञ. त्यांनी अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीचा सर्वप्रथम वापर अणू-स्तरीय वियोजनावर जैव रेणूंची त्रिमितीय प्रतिमा यशस्वीपणे तयार केली. या कार्यासाठी त्यांना २०१७ मधील रसायनशास्त्र विषयातील नोबेल पारितोषिक जीवभौतिकशास्त्रज्ञ झाक ड्युबोशे आणि योआकिम फ्रँक यांसोबत विभागून देण्यात आले.
हेंडरसन यांचा जन्म स्कॉटलंड येथील एडिंबर्ग येथे झाला. त्यांनी एडिंबर्ग विद्यापीठातून भौतिकशास्त्र विषयात बी.एस्सी (१९६६) आणि केंब्रिज येथील कॉर्पस क्रिस्टी महाविद्यालयातून एम.एस्सी. पदव्या संपादन केल्यात. पुढे काही दिवस त्यांनी केंब्रिज विद्यापीठातील मेडिकल रिसर्च काउन्सिलच्या लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये कायमोट्रिप्सीन विकराच्या संरचनेचा अभ्यास केला. नंतर त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून डेव्हिड ब्लो यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. (१९६९) पदवी मिळविली. येल विद्यापीठात संशोधनानंतर अधिछात्र म्हणून काही काळ काम केल्यानंतर १९७३ मध्ये ते मेडिकल रिसर्च काउन्सिलच्या लॅबोरेटरी ऑफ मॉलिक्युलर बायोलॉजीमध्ये परतले. पुढे तेथेच त्यांनी संरचनात्मक अभ्यास विभागाचे सह-प्रमुख (१९८६–२०००) आणि संचालक (१९९६–२००६) पदांची जबाबदारी सांभाळली.
इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीत जैव पदार्थांतील नमुन्यांवर इलेक्ट्रॉन आदळण्याऐवजी त्यातून प्रवास करीत असत, त्यामुळे इलेक्ट्रॉनचे विकिरण खूप कमी होऊन प्रतिमा धूसर तयार होत. तसेच तिचे वियोजन वाढविले असता इलेक्ट्रॉनच्या माऱ्यामुळे जैव नमुने नष्ट होत असत. त्यामुळे जैव पदार्थांच्या अभ्यासासाठी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीची उपयुक्तता मर्यादित होती. संशोधकांनी या अडचणीवर मात करण्यासाठी पार्श्व अभिरंजनसारख्या पद्धती विकसित केल्या, परंतु प्रतिमांमधून केवळ कमी वियोजनाची संरचनात्मक माहिती मिळत असे. हेंडरसन आणि त्यांचे सहकारी नायजेल अनविन यांनी १९७५ मध्ये निर्वात वातावरणात नमुना टिकवून ठेवण्यासाठी ग्लुकोज द्रावणाचा वापर करणारी पद्धत विकसित केली. या पद्धतीमुळे हजारो प्रथिने असलेल्या पेशी-पटलाचे पातळ थर सूक्ष्मदर्शकाच्या पटलावर पसरवणे शक्य झाले. या रचनेचा आकार तुलनेने मोठा असल्याने नमुना नष्ट होण्यापूर्वी त्यासंबंधीची दृश्य माहिती (विवर्तन आकृत्या) मिळवण्याची संधी मिळाली. याव्यतिरिक्त नमुन्याला वेगवेगळ्या दिशांनी कलते करून आणि त्यानंतर फूरिए रूपांतराने गणन करून त्यातील प्रथिनांची त्रिमितीय रचना निश्चित करणे शक्य झाले. अशाप्रकारे त्यांनी आणि अनविन यांनी बॅक्टेरियोऱ्होडॉप्सीन (bacteriorhodopsin) जिवाणू प्रथिनाची त्रिमितीय प्रतिमा तयार केली. त्यानंतरी हेंडरसन यांनी इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीद्वारे जैव रेणूंच्या उच्च-वियोजन प्रतिमा यशस्वीपणे मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक समस्यांवर काम करणे सुरू ठेवले. त्यांनी १९९० मध्ये अतिशीत इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीद्वारे अशा प्रतिमा मिळविता येतात, असे निदर्शनास आणले. एका नमुन्याच्या प्रतिमांच्या असंख्य प्रतींची सरासरी काढून त्यांनी बॅक्टेरियोऱ्होडॉप्सीनची अणू रचना मिळविली. या शोधांमुळे संशोधकांना ऱ्होडॉप्सीन प्रथिनांची यंत्रणा समजण्यास मदत झाली. त्यानंतर त्यांनी सिंगल पार्टिकल इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी आणि मोठ्या अस्फटिकीय प्रथिन समूहांच्या अणू रचना निश्चित करण्यावर लक्ष केंद्रित केले. त्यांच्या स्वतंत्र कणांवरील कार्यामुळे जैव रेणूंच्या संरचनात्मक पैलूंवर नवीन शोध लागले.
हेंडरसन यांना नोबेल पारितोषिकाशिवाय पुढील अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले : रॉयल सोसायटीचे निर्वाचित अधिछात्र (१९८३), यू.एस. नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेसचे परदेशी सहयोगी (१९९८), लंडनच्या ॲकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे अधिछात्र(१९९८), रोझेनस्टील अवॉर्ड फॉर डिस्टिंग्विश्ड वर्क इन बेसिक मेडिकल रिसर्च (१९९१) आणि रॉयल सोसायटीचे कॉप्ली पदक (२०१६) इत्यादी.
कळीचे शब्द : #बॅक्टेरिओऱ्होडोप्सीन #क्रायो-इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपी
संदर्भ :
समीक्षक : मुकुंद बोधनकर
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
