महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भातील कोहळी समाजाद्वारे बोलली जाणारी मराठीची एक बोली. कोहळी बोली ही ‘कोहळाऊ’ या नावानेही ओळखली जाते. या बोलीत ‘ळ्’ हा ध्वनी नसल्यामुळे ‘ळ्’ ऐवजी ‘र्’ उच्चारला जातो, त्यामुळे या बोलीला ‘कोहरी’ किंवा ‘कोहराऊ’ असेही म्हटले जाते. कोहळी समाज प्रामुख्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात आढळतो. या समाजातील लोक प्रामुख्याने शेती व तत्सम व्यवसाय करतात. या समाजाच्या मूळ स्थानाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र ते उत्तर भारतातून तलाव बांधकाम आणि शेतीशी निगडीत कामाच्या निमित्ताने झाडीपट्टी प्रदेशात स्थायिक झाले असावेत, असा निष्कर्ष त्यांच्या रूढी आणि भाषिक वैशिष्ट्यांवरून काढला जातो.

स्वनिमव्यवस्था : कोहळी बोलीत पुढील स्वनिम आढळतात:

स्वर : अ, आ, इ, ई, उ, ए, ओ.

स्पर्श ध्वनि: क्, ख्, ग्, घ्, ट्, ठ्, ड्, ढ्, त्, थ्, द्, ध्, प्, फ्, ब्, भ्.

स्पर्श घर्षके : च्, छ्, ज्, झ्.

घर्ष ध्वनी : श्, ष्, स्, ह्.

अर्धस्वर : य्, र्, ल्, व्.

अनुनासिके : ङ्, न्, म्.

कोहळी बोलीत ‘च्’, ‘ज्’ आणि ‘झ्’ यांचे केवळ तालव्य उच्चार असल्याने प्रमाण मराठीप्रमाणे दंतमूलीय उच्चार आढळत नाहीत. तसेच कोहळी बोलीतील काही शब्दात ‘श्’, ‘ष्’ आणि ‘छ्’ यांच्या ऐवजी ‘स्’ चा वापर केला जातो. उदा., सेद (छिद्र), साती (छाती), पिवसी (पिशवी).  प्रमाण मराठीत नासिक्य ध्वनींची महाप्राण रूपे, जसे ‘म्ह्’ आणि ‘न्ह्’ वापरात असतात, परंतु या बोलीत ती केवळ नासिक्य स्वरूपात उच्चारली जातात. उदा., ‘आम्ही’ ऐवजी ‘आमी’. तसेच तालव्य ‘ञ’ आणि मूर्धन्य ‘ण्’ यांच्या ऐवजी दंत्य नासिक्य ‘न्’ चा वापर होतो.

व्याकरणिक वैशिष्ट्ये : कोहळी बोलीत दोनच लिंगे आढळतात — पुल्लिंग आणि स्त्रीलिंग. पुल्लिंगी नामांचे स्त्रीलिंगी रूप तयार करताना ‘ऊली’ हा प्रत्यय लावला जातो. उदा. ‘करसा’ चे ‘करूली’, ‘गाडा’ चे ‘गाडुली’ आणि ‘भाना’ चे ‘भानुली’. या बोलीत एकवचन आणि अनेकवचन अशी दोन वचने आहेत. असे असले तरी वचनव्यवस्था प्रमाण मराठीपेक्षा काहीशी वेगळी आहे. उदा., व्यंजनांत एकवचन ‘झाड’ चे अनेकवचन ‘झाडा’, आकारांत ‘भाना’ चे अनेकवचन ‘भानं’, तसेच उकारांत ‘इचू’ चे ‘इचव’ असे रूप आढळते. विभक्ती प्रत्ययांच्या वापरात एकवचन आणि अनेकवचन यांमध्ये भेद केला जात नाही. उदा., प्रमाण मराठीत चतुर्थी विभक्तीत एकवचनासाठी ‘ला’ आणि अनेकवचनासाठी ‘ना’ हे प्रत्यय वापरले जातात, परंतु कोहळी बोलीत ‘लं’ हाच प्रत्यय दोन्हीं वचनासाठी वापरला जातो. तथापि, सर्वनामांच्या बाबतीत एकवचन आणि अनेकवचन यांमध्ये रूपभेद दिसतो. उदा. ‘मालं’ आणि ‘आमालं’. द्वितीया विभक्तीत नामानंतर ‘लं’ हा प्रत्यय लावला जातो.

संयुक्त क्रियापदांच्या वापरात कोहळी बोलीवर हिंदीचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. उदा. ‘देणं पडते’ (हिंदी : देना पड़ेगा), ‘देऊन चुकलो’ (हिंदी : दे चुका). नकारार्थी वाक्यरचनेवरही हिंदीचा प्रभाव आढळतो. उदा., ‘मी नाही या’ (हिंदी : मैं नहीं आऊंगा). अशा प्रकारे नकारार्थी शब्द क्रियापदाच्या आधी येतो.

शब्दसंग्रह: कोहळी बोली ही व्याकरणाच्या दृष्टीने मराठीची बोली असली तरी तिचे शब्दभांडार हिंदीपासून समृद्ध झालेले आहे. तसेच या बोलीने स्वतःचे असे अनेक शब्द निर्माण केले आहेत. उदा.,

शेतीची अवजारे: इरूली, उबारी, कुदरी, जुवाडा, तुतारी, दावा.

घरातील वस्तू: उकर, उसी, चाटू, जाता, पाटा, टाटी, भाना, बोतरी.

व्यक्तींची नावे: गोदी, ठमी, सटू, भुरकी, सकरू, दिवारू, सुगनी, सोगू.

सणांची नावे: मांडो अवस, तीज, अकाडी, जिवती, मोहोबल, मारबत, कडूपाणी, इत्यादी.

पुरुष व्यक्तीनामापुढे ‘जी’ हा आदरसूचक प्रत्यय लावण्याची पद्धत या बोलीत आहे. उदा., ‘दामाजी’, ‘भिकाजी’. तसेच स्त्रीयांच्या नावांपुढे ‘बाई’ हा संबोधनात्मक प्रत्यय लावला जातो. उदा., ‘कासीबाई’, ‘गिरजाबाई’. या बोलीतील पारंपरिक व्यक्तीनामामध्ये स्त्री-पुरुष यांच्या नावांत साम्य दिसते. उदा. ‘जनी’-‘जना’. नातेसंबंध दर्शविणारे शब्द बहुतांशी प्रमाण मराठीप्रमाणेच आहेत; परंतु वडिलांच्या मोठ्या भावाला ‘माहालपा’ आणि त्यांच्या पत्नीला ‘महालपी’ असे संबोधले जाते. तसेच हिंदीप्रमाणे वडिलांच्या बहिणीच्या पतीला ‘फुपा’ किंवा प्रमाण मराठीप्रमाणे ‘मामा’ असे दोन्ही शब्द वापरले जातात. मित्रासाठी ‘संगी’ आणि मैत्रिणीसाठी ‘सखी’ असे शब्द वापरले जातात.

सुशिक्षित कोहळी लोक सार्वजनिक व्यवहारात प्रमाण मराठीचा वापर करीत असल्याने कोहळी बोली ही प्रामुख्याने ग्रामीण भागात आणि वयोवृद्धांपुरती मर्यादित राहिलेली दिसते. कोहळी बोलीत अत्यल्प लेखन झालेले आहे. हरिश्चंद्र बोरकर यांच्या नाटकांतील काही पात्रांच्या संवादांत ही बोली वापरलेली आहे. तसेच हिरामण लांजे यांच्या ‘झाडीपट्टी’ (१९८८) या पुस्तिकेतही या बोलीचे थोडक्यात विवेचन आढळते. हरिश्चंद्र बोरकर यांच्या ‘कोहळी : विदर्भातील कोहळी लोकसमुदायाचा सर्वांगीण अभ्यास’ (१९९७)  या ग्रंथात कोहळी बोलीच्या व्याकरणाविषयी माहिती मिळते.

लोककथा आणि लोकगीतांचा समृद्ध वारसा या बोलीला लाभलेला आहे. अनेक म्हणी आणि वाक्प्रचारांमुळे ही बोली अधिक समृद्ध झाली असून मराठी भाषिक परंपरेत तिने स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केलेली आहे.

संदर्भ:

  • बोरकर, हरिश्चंद्र, ‘कोहळी : विदर्भातील कोहळी लोकसमुदायाचा सर्वांगीण अभ्यास’, अक्षय प्रकाशन, पुणे, १९९७.
  • बोरकर, हरिश्चंद्र, ‘कोहळी’, (संपादक : अरुण जाखडे), ‘भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र’ पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१३.
  • The Districts Project, Flame University, https://indiandistricts.in/cultures/maharashtra/gadchiroli/language/(Accessed: 12/06/2026).

 

समीक्षक: विद्यागौरी टिळक


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.