ग्रेट ब्रिटनच्या उत्तरेकडील उत्तर समुद्रात स्थित असणारी बेटे. स्कॉटलंड हा ग्रेट ब्रिटनचा सर्वांत उत्तरेकडील विभाग असून त्याच विभागात ही बेटे समाविष्ट आहेत. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीपीसून उत्तरेस सुमारे ३२ किमी.वर हा द्वीपसमूह आहे. या द्वीपसमूहात सुमारे ७० पेक्षा अधिक बेटांचा आणि द्वीपकांचा समावेश होतो. यांपैकी केवळ २० बेटांवर वस्ती आहे. पेंटलंड फर्थ या सामुद्रधुनीमुळे ही बेटे स्कॉटलंडपासून अलग झाली आहेत. या बेटांचे एकूण क्षेत्रफळ ९९० चौ.
किमी. असून लोकसंख्या २२,०२० (२०२४) होती. त्यांचा अक्षवृत्तीय विस्तार ५८° ४१′ उ. ते ५९° २४′ उ. आणि रेखावृत्तीय विस्तार २° २२′ प. ते ३° २६′ प. असा आहे. मेनलँड किंवा पमोना हे येथील सर्वांत मोठे बेट आहे (क्षेत्रफळ ५२३ चौ. किमी.). या बेटाचे पूर्व मेनलँड व पश्चिम मेनलँड असे दोन भाग असून करक्वॉल व स्कॅप फ्लो यांदरम्यानच्या ३ किमी. रुंदीच्या जमिनीच्या पट्टीने ते दोन भाग एकमेकांना जोडले गेले आहेत. पूर्व मेनलँड बेटाच्या दक्षिणेस बरे व साउथ रोनाल्डसे ही दोन लहान बेटे असून दुसऱ्या महायुद्धकाळात बांधलेल्या मोसमी पुलाने (कॉजवेने) ती एकमेकांना जोडली आहेत. शत्रुंच्या पाणबुड्या स्कॅप फ्लो येथील नौसेना तळाकडे प्रवेश करू नयेत म्हणून या मोसमी पुलाची निर्मिती करण्यात आली होती. ऑर्कनी बेटांमधील हॉइ हे दुसऱ्या क्रमांकाचे मोठे बेट पश्चिम मेनलँड बेटाच्या दक्षिणेस असून त्याच्या लगत ग्रेमसे, फ्लॉट्टा व साउथ वॉल्स ही छोटी बेटे आहेत. मेनलँड बेटाच्या उत्तरेस वाइड फर्थ व शॅपनसे सामुद्रधुनीच्या (साउंड) पलीकडे शॅपनसे, राउझी, एगिलसे, स्ट्रॉनसे, इडे, वेस्ट्रे, सॅनडे, नॉर्थ रोनाल्डसे व इतर अनेक छोटी बेटे आहेत. प्रशासकीय दृष्ट्या स्कॉटलंडची विभागणी ३२ स्थानिक कौन्सिल प्रदेशांमध्ये (प्रशासकीय विभागांत) केलेली असून ऑर्कनी हा त्यांपैकी एक विभाग आहे. येथील स्थानिक प्रशासन ऑर्कनी आयलँड्स कौन्सिलमार्फत चालते. करक्वॉल हे ऑर्कनीमधील सर्वांत मोठे नगर असून तेच या प्रदेशाचे प्रशासकीय केंद्र आहे. ऑर्कनी बेटांच्या उत्तरेस शेटलंड बेटे असून ती फेअर आइल चॅनेलमुळे एकमेकांपासून अलग झाली आहेत.
ऑर्कनी बेटे वेगवेगळ्या सामुद्रधुनींमुळे एकमेकांपासून अलग झाली असून त्या सामुद्रधुनींना साउंड्स किंवा फर्थ्स असे संबोधले जाते. ऑर्कनी बेटांच्या भूकवचातील वालुकाश्म, चुनखडक आणि अग्निजन्य खडक यांचे हिमनद्यांनी खोलवर घर्षण केल्यामुळे तेथे कमी उंचीच्या उंचसखल टेकड्या निर्माण झालेल्या आढळतात. या टेकड्या मोठ्या प्रमाणावर हिमानी गाळाने आच्छादलेल्या आहेत. ही बेटे कमी उंचीची आहेत. केवळ मेनलँड, राउझी, हॉइ या बेटांवर तीव्र उताराच्या वालुकाश्म टेकड्या आढळतात. हॉइ बेटावर वॉर्ड हिल हे ऑर्कनीमधील सर्वांत उंच ठिकाण आहे. काही बेटांच्या पश्चिम किनाऱ्यावर ओबडधोबड कडे आढळतात. बेटांचे किनारे दंतुर आहेत. बेटांवर जे काही प्रवाह आढळतात, ते उंच भागाचे खणन करतात. प्रवाह बरेच आखूड आहेत; परंतु त्यांत ट्राउट मासेमारी चांगली चालते. बेटांदरम्यानच्या सागरी भागांत पाण्याचे भोवरे आढळतात. ऑर्कनी बेटावरील हवामान तुलनेने सौम्य आहे. वार्षिक सरासरी तापमान हिवाळ्यात ४° से., तर उन्हाळ्यात ते १२° से. असते. उबदार गल्फ प्रवाहाचाच विस्तारित भाग असलेल्या नॉर्वेजियन या सागरी प्रवाहामुळे उत्तरेकडील भागात हवामान सौम्य असते. येथील वार्षिक सरसरी पर्जन्यमान ८५ ते १०६ सेंमी. असते. पश्चिमी वारे आणि सोसाट्याचा वारा यांमुळे या बेटांवर सामान्यपणे वृक्षांचा अभावच आढळतो.
ऑर्कनी बेटांवर सुमारे १०,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असावी. पुराणाश्मयुगाच्या अखेरीस आणि मध्याश्मयुगात येथे शिकार आणि फळे व कंदमुळे गोळा करून उपजीविका करणाऱ्या लोकांची वस्ती होती. नवपाषाण आणि ब्राँझयुगात शेतकरी, तर लोहयुगात पिक्ट लोकांची येथे वस्ती होती. येथे आढळलेली इतिहासपूर्वकालीन भूमिगत घरे, गोलाकार स्थलशिल्पे, उभे दगड, मातीची घरे इत्यादी अवशेषांवरून प्राचीन काळी येथे ऑर्कॅडीस लोक राहात होते, हे स्पष्ट होते. मेनलँड बेटाच्या पश्चिम किनाऱ्यावर आढळलेले स्कारा ब्रे हे नवाश्मयुगाच्या अखेरीच्या काळातील भूमिगत खेडे हे याचे एक उत्तम उदाहरण आहे. वर्षानुवर्षे हे वालुकाराशींच्या खाली गाडले गेले होते. इ. स. १८५० मध्ये आलेल्या जोरदार वादळामुळे हे खेडे उघडे पडले. त्यानंतर इ. स. १८६० च्या दशकात विल्यम वॅट यांनी केलेल्या उत्खननात येथे चार घरे सापडली. यूनेस्कोने १९९९ मध्ये हे स्थळ आणि बेटावरील इतर अनेक ठिकाणांचा जागतिक वारसास्थळांत समावेश केला आहे.
आठव्या शतकाच्या अखेरीस या बेटांवर नॉर्स लोकांचे आगमण झाले. त्यांनी नवव्या शतकात या बेटांवर वसाहती केल्या. नॉर्वे आणि डेन्मार्क या देशांनी या बेटांवर राज्य केले. इ. स. सातव्या शतकातच केल्टिक मिशनऱ्यांचे येथे आगमन झाले होते; परंतु नॉर्समन लोकांनी पुढे बराच काळपर्यंत धर्मांतरण स्वीकारले नव्हते. नॉर्समन लोकांनी बाराव्या शतकात करक्वॉल येथे सेंट मॅग्नस हे कॅथीड्रल बांधले. इ. स. १४७२ मध्ये स्कॉटलंडच्या संसदेने ऑर्कनी आणि शेटलंड बेटाचा समावेश स्कॉटलंड राज्यात करून घेतला. मेनलँड बेट वगळता उर्वरित सर्व बेटे उत्तर आणि दक्षिण अशा दोन गटांत विभागली आहेत. येथील स्थानिक लोक ऑर्कॅडियन म्हणून ओळखले जातात. येथील लोक वेगवेगळ्या स्कॉट बोलीभाषा बोलतात. लोकविद्येत हे लोक पारंगत आहेत. यूरोपातील खूप प्राचीन व उत्तमरित्या संवर्धन करून ठेवलेल्या नवाश्मयुगीन सौंदर्यस्थळांपैकी काही स्थळे ऑर्कनीमध्ये आहेत. ʿहार्ट ऑफ निऑलिथिक ऑर्कनीʾ हे यूनेस्कोचे जागतिक वारसास्थळ आहे.
ऑर्कनी हा जरी विखंडित प्रदेश असला, तरी ते एक समृद्ध कृषीक्षेत्र आहे. येथील जमीन खूपच सुपीक असून बहुतांश क्षेत्र लागवडीखाली आहे. शेती हा ऑर्कनीच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार आहे. शेतजमिनी शेतकऱ्यांच्या स्वमालकीच्या आहेत; परंतु त्यांचे आकार लहान आहेत. शेतांचा सरासरी आकार १४ हेक्टर असून उत्पादकता वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. दरवर्षी अधिकाधिक क्षेत्र लागवडीखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असला, तरी बरीच जमीन रिकामी राहते. येथील ९० टक्क्यांपेक्षा अधिक कृषीक्षेत्र मेंढ्या आणि गुरचराईसाठी वापरले जाते. गोमांस उत्पादनासाठी गाईंची पैदास हा प्रमुख कृषीव्यवसाय आहे. चीज उत्पादनासाठी दुग्धोत्पादन करणे हासुद्धा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच अंडी उत्पादन आणि वराहपालनही मोठ्या प्रमाणात केले जाते. ऑर्कनी प्रदेशात मुबलक सागरी जलचर आणि पक्षी आढळतात. ऑर्कनीच्या सागरी भागात हेरिंग, सामन, शेवंडा, पांढरे मासे, खेकडा व इतर कवचधारी मासे पकडले जातात. कृषीव्यवसायाला अधिक महत्त्व दिले जात असल्यामुळे येथे मत्स्योद्योगाचा विशेष विकास झाला नाही, जो विकास नजिकच्या शेटलंड बेटांवर मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.
पवन ऊर्जा आणि सागरी ऊर्जा संसाधनाचे महत्त्व वाढत आहे. ऑर्कनी येथे उत्पादित होणारी नवीकरणीय वीज स्थानिक मागणीपेक्षा जास्त आहे. उत्तर समुद्रात समृद्ध खनिज तेल साठे सापडले आहेत. येथील पायपर आणि क्लेमोर तेल
क्षेत्रातील खनिज तेलाची साठवणूक, त्याचे शुद्धीकरण, शुद्धीकृत तेलाची साठवणूक आणि त्याची निर्यात करणे इत्यादी सुविधा स्कॅप फ्लो बेटावरील फ्लॉट्टा बंदरात मोठ्या प्रमाणावर निर्माण केलेल्या आहेत. फ्लॉट्टा हे जसे प्रसिद्ध केंद्र (टर्मिमल) आहे, तशाच प्रकारचे दुसरे केंद्र शेटलंड बेटावरील सूलोम व्हो येथे आहे. खनिज तेलासंबंधित वेगवेगळ्या उद्योगांमुळे या प्रदेशात रोजगाराच्या खूप संधी आहेत; परंतु या प्रदेशातील लोकसंख्या घटताना दिसते. ऑर्कनी बेटांवरील करक्वॉल येथे मर्यादित प्रमाणात हेलिकॉप्टर दुरुस्ती आणि इंधन भरण्याच्या सुविधा आहेत.
करक्वॉल (लोकसंख्या ७,५०० – २०२०) आणि स्ट्रॉमनेस (१७९०) ही मेनलँड बेटावरील प्रमुख नगरे आहेत. करक्वॉल हे व्यापारी दृष्ट्या महत्त्वाचे नगर आणि बंदर आहे. दोन्ही नगरे सृष्टीसौंदर्याने नटलेली असून त्यांवरील मुख्य रस्ते अरुंद आहेत. करक्वॉल नगरात सेंट मॅग्नस कॅथीड्रल, अनेक जुनी सुंदर घरे, बिशप आणि अर्लच्या राजवाड्यांचे अवशेष आढळतात. ऑर्कनी बेटे आणि स्कॉटलंडची मुख्य भूमी यांदरम्यानची वाहतूक व्यवस्था उत्तम आहे. स्कॉटलंडच्या मुख्य भूमीवरील ग्लासगो, एडिंबरो, अॅबर्डीन आणि इन्व्हर्नेस या शहरांपासून करक्वॉलपर्यंत दररोज हवाई व फेरी वाहतूक उपलब्ध आहे. अशीच वाहतूक व्यवस्था स्ट्रॉमनेस ते स्क्रॅबस्टर, अॅबर्डीन व शेटलंड बेटांदरम्यानही आहे.
ऑर्कनी बेटांचे स्थान उच्च अक्षांशात असल्यामुळे येथे रात्रविरहित उन्हाळे पाहायला जाणे, हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असते. उच्च अक्षांशामुळे ऋतुनुसार येथे दिनमान आणि रात्रिमानात खूपच तफावत असते. सर्वांत मोठे दिनमान असणाऱ्या दिवशी ब्रिटिश स्थानिक वेळेनुसार (ब्रिटिश समर टाइम) सूर्योदय ४.०० वाजता आणि सूर्यास्त २२.२९ वाजता होतो. त्यावेळी दीर्घकाळ संधिप्रकाश असतो, पूर्ण अंधार असा नसतोच. ब्रिटिश स्थानिक वेळ ग्रिनिच वेळेपेक्षा एक तासाने पुढे असते. हिवाळ्यात रात्री दीर्घकाळ असतात. सर्वांत कमी दिनमानाच्या दिवशी सूर्योदय ९.०५ वाजता आणि सूर्यास्त १५.१६ वाजता होतो. कधीकधी येथून उत्तर ध्रुव प्रदेशावर ध्रुवीय प्रकाश (ऑरोरा बोरिअॅलिस) हा वैशिष्ट्यपूर्ण बहुरंगी प्रकाश दिसतो.
संदर्भ :
- Little, Erich, Orkney Islands : A Visitors Guide, USA, 2026.
- Thomson, William, P. L., The new History of Orkney, Birllin, 2017.
समीक्षक : संतोष ग्यानिदास गेडाम
Discover more from मराठी विश्वकोश
Subscribe to get the latest posts sent to your email.
